टाकळा
शास्त्रीय नाव - Cassia tora (कॅसिया टोरा)
कूळ - Caesalpinaceae (सिसालपिनेसी)
टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला काही भागांत ‘तरोटा’ किंवा ‘तरवटा’ अशी स्थानिक नावे आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो.
- खोड व फांद्या - गोलाकार. खोडाच्या तळापासून अनेक फांद्या तयार होतात.
- पाने - संयुक्त प्रकारची, एकाआड एक, ७.५ ते १० सें. मी. लांब. पर्णिका ६, त्यांच्या उपजोड्या. खालच्या दोन पर्णिकांच्या जोड्यांमध्ये प्रत्येक एक शंखाकृती ग्रंथी. पर्णिकेची सर्वांत खालची जोडी लहान, तर वरच्या जोडीतील पर्णिका आकाराने मोठ्या. पर्णिका रात्री मिटतात. पर्णिका लांबट-गोल किंवा अंडाकृती-आयताकृती, तळ तिरपा.
- फुले - पिवळसर रंगाची, थोडीशी अनियमित, द्विलिंगी, पानांच्या बेचक्यात जोडीने येतात. पाकळ्या पाच, वरची पाकळी आकाराने थोडी मोठी, द्विखंडित. पुंकेसर सात, असमान लांबीचे. बीजांडकोश एक कप्पी.
- शेंगा - १० ते १६ सें.मी. लांब, कोवळ्या असताना वक्र, बिया २५ ते ४० तपकिरी - काळसर किंवा करड्या रंगाच्या, त्यांचे टोक आडवे कापल्यासारखे, कठीण कवचाच्या.
-ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोवर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात.
टाकळा ही वनस्पतीला उग्र वास किंवा दुर्गंधी असली तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. औषधात पंचांग वापरतात.
औषधातील उपयोग -
- टाकळ्याच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो. या वनस्पतीत ‘एमोडीन’ ग्लुकोसाइड आहे. टाकळा आनुलोमिक असून, याची क्रिया त्वचेवर होते. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोगांत देतात. त्वचा जड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग होतो. त्वचारोगात पानांची भाजी देतात व बिया वाटून लोप करतात. बिया लिंबाच्या रसातून वापरण्याचा प्रघात आहे.
- मुळे उगाळून लिंबाच्या रसात बनविलेली पिष्टी गजकर्णासाठी वापरतात. पाने व बियांमध्ये ‘क्रायझोजेनिक आम्ल’ असून, ते त्वचारोगात मौल्यवान आहे.
- पाने कृमिघ्न आणि सौम्य विरेचक आहेत.
- पानांचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर निर्देशित करतात.
- पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात.
टाकळ्याची भाजी -
टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे.
पाककृती -
कृती १
- फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने भाजीसाठी वापरावीत.
साहित्य - कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, तेल, आले, मीठ, ओले खोबरे, हळद, गूळ इ.
कृती - पाने स्वच्छ धुऊन, पाणी गळून जाऊ द्यावे. कढईत तेल टाकून कांदा परतून घ्यावा, मग त्यात ओली मिरची व हळद टाकावी. नंतर त्यावर बारीक चिरलेली भाजी टाकून ती वाफेवर शिजू द्यावी. भाजी शिजत आली, की त्यात थोडा गूळ आणि मीठ घालावे. त्यावर ओले खोबरे घालावे. या भाजीत भिजवलेली तूरडाळ किंवा फणसाच्या आठळ्यांचे बारीक तुकडे ती शिजत असताना टाकल्यास भाजी अधिकच चवदार बनते.
कृती २
साहित्य - दीड वाटी टाकळा पाला (कोवळा पाला देठे काढून चिरावा), अर्धी वाटी चिरलेला कांदा, ५ ते ६ ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, मीठ, तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ इ.
कृती - जरा जास्त तेलावर कांदा, लसूण परतावे, त्यावर चिरलेली भाजी घालून झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारावा. तिखट, मीठ, गूळ घालून शिजवून घ्यावे.
कृती ३
टाकळ्याचे रायते -
साहित्य - एक वाटी टाकळ्याची पाने, चिंचेचा कोळ व गूळ, हिरवी मिरची, मोहरी पूड, पाणी, मीठ इ.
कृती - पाने व मिरच्या सोबत वाटावे. त्यात गूळ, चिंचेचा कोळ, मीठ घालावे. मोहरी पूड पाण्यात फेसून घालावी.
कृती ४
टाकळ्याची तंबळी साहित्य- एक वाटी टाकळ्याची पाने, एक वाटी ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, दीड वाटी ताक, चिंच, मिरे, जिरे, तूप, मीठ इ.
कृती - कढईत तुपावर मिरची व पाने परतावीत. त्यात मिरे, जिरे घालून दोन मिनिटे परतावे. मग अन्य साहित्य मिक्सरमध्ये घालून वाटावे आणि नंतर ताकात मिसळावे. पोटाच्या विकारासाठी तंबळी उपयुक्त आहे.
-डॉ. मधुकर बाचुळकर
---------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन