অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काळी मिरीची काढणी कधी करावी....

काळी मिरीची काढणी कधी करावी....

1) काळी मिरीची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर उत्पन्न सुरू होते. मे-जून महिन्यामध्ये तुरे येतात. तर साधारणपणे नऊ महिन्यांनंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढण्यासाठी तयार होतात. काढणी करताना योग्य तऱ्हेने काळजी न घेतल्यास मिरीच्या प्रतीवर परिणाम होतो. दाण्यांना आकर्षक रंग येत नाही व साहजिकच बाजारात दर कमी मिळतो. मिरीच्या दाण्याचा रंग हा हिरवा असतो. पिकल्यानंतर त्यांचा रंग जातीप्रमाणे पिवळा अगर नारंगी होतो.

2) मिरीची काढणी करताना लागलेल्या घोसामधील एक ते दोन दाणे पिवळे अगर नारंगी रंगाचे झाल्यानंतर मिरीवरील सर्व घोस काढतात. या वेळी घोसामधील दाण्याचे काटेकोरपणे निरीक्षण करणे आवश्‍यक असते. कोकीळसारखे पक्षी पिकलेल्या मिरीचे दाणे खातात. हे रंग बदललेले दाणे चटकन लक्षात येत नाहीत. 
3) मिरी काढणीचा हंगाम हा शक्‍यतो हिवाळी असतो. सर्वसाधारणपणे या वेळी भरपूर दव पडते. मिरीचे दाणे वाळवताना ते दवात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. मिरीचे दाणे दवात भिजल्यास ते पांढरट होतात व अशा मिरीला किंमत कमी मिळते.

4) मिरीचे घोस काढल्यानंतर या घोसामधील दाणे अलग करून काढावे लागतात. घोस काढल्यानंतर ताबडतोब हे दाणे वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास तसे करणे कठीण जाते, कारण दाणे घोसातल्या मधल्या भागाला घट्ट चिकटून राहतात. त्यासाठी मिरीची काढणी दुपारनंतर करावी. रात्री घोस तसेच ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी या घोसातले दाणे वेगळे करावेत. हे दाणे उन्हात वाळवावेत. सुमारे सात ते दहा दिवस दाणे उन्हात वाळवावे लागतात.

5) मिरी दाणे वाळविण्यापूर्वी उकळत्या पाण्यात एक मिनीट बुडवून काढतात. या पद्धतीचे फायदे म्हणजे मिरीचे दाणे दोन ते तीन दिवसांतच वाळतात. दाण्याचा आकर्षक काळा रंग येतो. साठवण करताना दाण्याचे बुरशीमुळे नुकसान होत नाही. मिरी दाण्याची प्रत सुधारते.

6) एका वेलीपासून सरासरी पाच किलो हिरव्या मिरीचे उत्पादन मिळते, त्यापासून सुमारे दीड किलो वाळलेली मिरी मिळते. 

संपर्क - (02358) 282108 
उद्यानविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate