कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ-मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते. नारळाची लागवड 7.5 x 7.5 मीटर अंतरावर करावी. या चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेल लावावेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार नारळ, तसेच मिश्र पीक म्हणून मसाला पिकांची लागवड करावी. नारळ, जायफळ यांच्या लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे, तर दालचिनी लागवडीसाठी 0.60 x 0.60 x 0.60 मीटर आणि काळी मिरी लागवडीसाठी 0.30 x 0.30 x 0.30 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यांच्या तळाशी वाळवी व हुमणी प्रतिबंधक कीटकनाशके धुरळावीत.
खड्ड्याच्या तळाशी कुजलेला पालापाचोळा किंवा गिरिपुष्पाचा पाला, दोन ते तीन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि शिफारशीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. खड्डा भरताना माती जमिनीच्या पृष्ठभागाच्या थोडी वर ठेवावी, जेणेकरून पाणी झाडाच्या बुंध्याशी साठणार नाही. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर किंवा मध्यभागी खुणेसाठी खुंट ठेवावी.
पहिल्या वर्षी विद्यापीठाने शिफारस केलेल्या प्रताप, टी x डी यांसारख्या नारळ जातींच्या जोमदार रोपांची निवड करून जून किंवा जुलैमध्ये लागवड करावी. त्याचबरोबर दालचिनीची लागवडही करावी. कोकणात सूर्यप्रकाशाचा दालचिनीच्या झाडांवर तितकासा विपरीत परिणाम होत नाही, त्यामुळे पहिल्या वर्षी फक्त नारळ आणि दालचिनी या दोनच पिकांची लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. पहिली दोन वर्षे दालचिनीला सावली करावी. पाचव्या वर्षी जायफळ लागवड करावी. जायफळाला पहिली तीन वर्षे सावली करावी.
ऑक्टोबर व पहिल्या उन्हाळ्यात नारळाच्या झाडांनाही सावली करावी. बागेमध्ये सुरवातीच्या काळात केळी किंवा पपईची मिश्र पीक म्हणून लागवड केल्यास मसाला पिकांना सावली तर मिळतेच; शिवाय केळी, पपईच्या उत्पादनामधून बागेच्या व्यवस्थापनावर होणारा खर्चही काही प्रमाणात भागविता येतो. मिश्र पीक म्हणून सुरवातीच्या काळात अननसाचीही लागवड करणे शक्य आहे. सातव्या वर्षी नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ मिरीच्या वेलांची लागवड करावी.
तिसऱ्या वर्षाच्या सुरवातीला प्रथमतः दालचिनीच्या झाडांपासून उत्पादन मिळण्यास सुरवात होईल. जायफळाचे झाड जरी तिसऱ्या वर्षी फुलोऱ्यावर येत असले, तरी उत्पादन हे अतिशय मर्यादित असते. अतिउत्कृष्ट व्यवस्थापन असणाऱ्या बागेमध्ये तिसऱ्या वर्षापासून उत्पादन अपेक्षित आहे. तथापि, सर्वसाधारणतः पाचव्या वर्षापासून नारळ (टी x डी) आणि दालचिनी यांचे उत्पादन मिळू शकते.
जायफळाची लागवड पाचव्या वर्षी असल्याने जायफळाचे उत्पादन आठव्या वर्षापासून मिळू लागते; तसेच मिरीचे वेल सातव्या वर्षी लावल्यामुळे त्याच्या वेलीचा विस्तार झाल्यावर किफायतशीर उत्पादन मात्र लागवडीपासून तिसऱ्या वर्षी मिळते. बागेतील सर्व झाडे ही निरोगी आणि उत्पादनक्षम राहण्यासाठी योग्य खतांच्या मात्रा, पाणीपुरवठा; तसेच पीक संरक्षणाकडे लक्ष द्यावे. त्यापैकी झाडास लागणारी अन्नद्रव्ये एकाच माध्यमातून न देता ती रासायनिक, तसेच सेंद्रिय खतांच्या माध्यमातून द्यावीत. बागेसाठी अन्नद्रव्ये योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे.
संपर्क -02358 - 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नारळाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात प्रत्येक झाड...
उंच आणि ढेंगू अशा दोन जाती आढ्ळून येतात. नारळामध्य...
वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - या जातीचे आयुष्यमान 80 ...
तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नारळ लागवड आणि...