1) पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. फुलांचे बुके/गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात.
2) लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्टरी 15 टन कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर लागवडीसाठी तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी वरंब्यावरदेखील लागवड करता येते.
3) याची अभिवृद्धी सहजगत्या रोपाच्या कडेला फुटणाऱ्या फुटव्यांद्वारा करण्यात येते. फुटव्यांची लागवड 30 x 30 सें.मी. किंवा 50 x 50 सें.मी. अंतरावर करावी. सरी वरंब्यावर लागवड करताना 45 ते 50 सेंमी अंतर ठेवून रोपांतील अंतर 30 सेंमीपर्यंत ठेवावे. शक्यतो संध्याकाळच्या वेळी मुनवे लावावेत. मुनवे आणताना ते गोणपाटात गुंडाळून आणावेत आणि लगेच शेतात लावावेत.
4) सुरवातीला तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. कालांतराने रोप वाढून सर्व जागा व्यापते व त्यामुळे तण फारसे वाढत नाहीत. मात्र रोपाभोवती येणारे मुनवे वेळोवेळी काढावेत. फुलदांडा उंच वाढल्यानंतर प्रत्येक रोपाभोवती एक किंवा दोन मुनवे राखावेत. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
5) रोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दर वर्षी हेक्टरी 80 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून लागवडीनंतर चार महिन्यांच्या अंतराने द्यावी. दर चार महिन्यांनी पिकाची खांदणी करून नत्र खताची मात्रा द्यावी.
6) लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी फुले येण्यास सुरवात होते. वर्षभर फुले येत राहतात. डेझीची फुले दांड्यासह काढावीत. दांड्याच्या खालील भागातील फुले उमलण्यास सुरवात झाल्यावर तुरे दांड्यासहित तोडावीत. दांडा जमिनीपासून खोडावर चार डोळे ठेवून कापावा. दांडा काढण्यासाठी चाकू किंवा सिकेटर वापरावे. काढलेल्या दांड्याचे कापलेले टोक पाण्यात बुडवून ठेवावे.
संपर्क - 020 - 25693750
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...