অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्राक्ष कलम

द्राक्ष कलम काडी पूर्णपणे पक्व असावी तसेच काडीवरील डोळे फुगीर असावेत. कुठल्याही परिस्थितीत कलम काडी लवकर फुटून येण्यासाठी हायड्रोजन सायनामाईडचा वापर करून नये. कलम काडी व खुंटाची काडी यांची जाडी सारखी असावी. 

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष लागवड ही खुंटावर करणे आता सर्वमान्य झाले आहे. सर्वसाधारणपणे खुंटांची लागवड फेब्रुवारी - मार्च महिन्यांत केली जाते. पावसाळ्यातील अनुकूल वातावरण व योग्य व्यवस्थापन असल्यास लागवड झालेली खुंट रोपे सप्टेंबर - ऑक्‍टोबरपर्यंत करण्यास योग्य होतात. खुंटांच्या काडीची जाडी साधारणपणे आठ मि.मी. तयार होते. त्यामध्ये पुरेसा अन्नसाठा तयार होतो.

द्राक्ष खुंटावरील कलम यशस्वी होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती असणे गरजेचे असते. त्यामध्ये प्रामुख्याने खुंट काडीतील रसरशीतपणा, कलम केल्यानंतर बागेतील वातावरण व कलम करणाऱ्या व्यक्तीची कार्य कुशलता या गोष्टींचा समावेश होतो. हवेतील आर्द्रता व तापमानाचा कलम यशस्वी होण्यावर परिणाम होतो. ज्या वेळी हवेतील आर्द्रता 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आणि तापमान 30 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल असे वातावरण कलम बांधण्यासाठी योग्य मानले जाते. ही परिस्थिती ज्या कालावधीमध्ये असते त्या कालावधीत कलम करणे योग्य ठरते. सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती राज्यात दिसून येते. तसेच या कालावधीपर्यंत मातृवेलीवरील काडीदेखील परिपक्व झालेली असते. त्यासाठीच ऑगस्ट - सप्टेंबरमधील कालावधी कलम करण्यास योग्य मानला जातो.

असे करा खुंटावर कलम

खुंटाची तयार झालेली फूट बांबूपासून अलग करावी. जमिनीपासून दीड फूट उंचीवर आडवा काप घ्यावा. त्यानंतर फुटीवरील सर्व पाने व इतर फुटी काढून घ्याव्यात. कलम 100 टक्के यशस्वी होण्याची खात्री देता येत नसल्याने एका खुंटावरील दोन फुटींवर एकाच वेळी कलम करून घेणे फायदेशीर ठरते. कापलेल्या खुंट काडीच्या वरच्या बाजूस धारदार चाकूने चार ते पाच सें.मी.पर्यंत उभी खाच घ्यावी. कलम करण्यासाठी खुंट काडीच्या (फुटीच्या) जाडीची कलम काडी निवडावी. कलम काडी परिपक्व आणि कमीत कमी दोन डोळ्यांची असावी. अशी काडी निवडून ती काडी रात्रभर (12 तास) कार्बेन्डाझिमच्या द्रावणात बुडवून ठेवावी. त्यानंतर खुंट काडीला जुळणारी कलम काडी निवडून कॅम्बियमला इजा न करता धारदार चाकूच्या साहाय्याने पाचरीसारखा आकार तयार करावा. ही काडी कलम करण्यास वापरण्यापूर्वी ज्या ठिकाणी काप घेतलेला असतो तो भाग 15-20 पीपीएम 6-बीएच्या द्रावणात बुडवून घ्यावा. त्यानंतर खुंटावर घेतलेल्या उभ्या खाचेमध्ये कलम काडीचा पाचरीसारखा आकार व्यवस्थित बसवून त्यावर पॉलिथिन पट्टी घट्ट बांधावी. कलम काडी व खुंट काडीची साल एकमेकांना योग्य पद्धतीने जुळेल याची दक्षता घ्यावी.

कलम करताना 6 बी.ए.चा वापर केल्यामुळे कॅम्बियम पेशींच्या विभाजनाची प्रक्रिया जलद घडून येते. त्यामुळे कलम व खुंट काडी लवकर जुळून येते. तसेच पेशींची वाढ जलद गतीने झाल्यामुळे कलम लवकर फुटून येण्यास मदत होते.

कलम करताना घ्यावयाची काळजी

1) कलम काडी पूर्णपणे पक्व असावी तसेच काडीवरील डोळे फुगीर असावेत.
2) कुठल्याही परिस्थितीत कलम काडी लवकर फुटून येण्यासाठी हायड्रोजन सायनामाईडचा वापर करून नये.
3) कलम काडी व खुंटाची काडी यांची जाडीसारखी असावी.
4) कलम करताना धार असलेला चाकूचा वापरावा.
5) कलम काडी कार्बेन्डाझिमच्या द्रावणात बुडवून घ्यावी. तसेच कलम करण्यापूर्वी 6 बीएच्या द्रावणात बुडवावी.
6) कलम केल्यानंतर प्लॅस्टिकच्या पट्टीने जोड घट्ट आवळून बांधावा, जेणेकरून हवाबंद जोड निर्माण होईल.
7) मातृवेलीवरील काडी काढण्यापूर्वी पानगळीसाठी संजीवकांचा वापर केलेला नसावा. जर संजीवकाचा वापर झालेला असेल तर ती कलम काडी लवकर फुटून येण्याची शक्‍यता असते. अशी काडी कलम जुळणीपूर्वी फुटून निघत असल्याने असे कलम अयशस्वी होऊ शकते.
8) बऱ्याच वेळा द्राक्ष बागायतदार कलम करण्यासाठी आयबीए संजीवकाचा वापर करतात, आयबीए हे संजीवक काडीला लवकर मुळ्या येण्यासाठी मदत करते, त्यामुळे आयबीए संजीवक कलम रोपे तयार करतेवेळी वापरावे. कलम करण्यासाठी त्याचा उपयोग करू नये.

 

 

लेखक -डॉ. एस.डी. रामटेके, रवींद्र कोर

स्रोत-मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate