पपईच्या चांगल्या उत्पादनासाठी साधारण फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पपईची रोपे शेतात लावली पाहिजेत. एक एकरासाठी किमान हजार रोपे गरजेची असतात. अलीकडे शेतकरी संकरित पपई जातींची लागवड करताहेत. या जातीचे बियाणे महागडे आहे. त्यामुळे बियाण्याची किंमत पाहता दर्जेदार रोपनिर्मितीसाठी आपल्यालासुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे.
पपईच्या रोपांच्या निर्मितीसाठी थंडीच्या काळात बियाण्याची लागवड रोपांसाठी करत असल्यास पॉलिहाऊसचा वापर गरजेचा आहे. अन्यथा, 15 जानेवारीनंतर गारठा कमी झाल्यावर पपईच्या बियाण्याची रोपांसाठी लागवड करावी.
लागवडी अगोदर बियाण्यास सर्वांत प्रथम आठ तास “जी.ए.3′ च्या (100 पी.पी.एम.साठी एक लिटर पाण्यात 100 मि.लि. जी.ए.-3 मिसळावे) द्रावणात भिजवून घ्यावे. आठ तासांनंतर बियाणे द्रावणातून काढून पांढऱ्या कपड्यात 15 मिनिटे घट्ट बांधून ठेवावे. यानंतर सावलीत बियाणे कागदावर वाळवावे. बियाणे पूर्णपणे वाळल्यानंतर प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी.
बियाण्याचे अंकुरण व्यवस्थित व दर्जेदार रोपे मिळण्यासाठी 150 ते 200 गेजच्या 6 ु 4 इंचाच्या पॉलिथिन पिशव्यांचा वापर करावा. या पॉलिथिन पिशव्यांना सहा छिद्रे करावीत. गारठ्यात रोपांची निर्मिती करत असल्यास काळ्या पॉलिथिन पिशव्यांचा वापर करावा. अन्यथा, पांढऱ्या पारदर्शक पिशव्या वापरल्या तरी चालतात. पॉलिथिन पिशव्यांत वापरण्यात येणाऱ्या माध्यमांचा निचरा अत्यंत उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील घटकांचा वापर गरजेचा आहे.
* पोयटा/ लाल माती-4 पाटी
* शेणखत (चांगले कुजलेले असल्यास तरच वापर करावा)-1 पाटी
* सिंगल सुपर फॉस्फेट पावडर- 200 ग्रॅम
* वाळू-अर्धी पाटी
* कार्बेन्डाझीम-10 ग्रॅम
साधारण – एवढ्या माध्यमात 6 ु 4 इंचाच्या 100 पिशव्या सहज भरल्या जातात.
पिशव्या भरल्यानंतर साधारणतः एक सें.मी.च्या खोलीवर बियांची लागवड करावी. यापेक्षा जास्त खोलीवर लागवड केल्यास बियाण्याच्या अंकुरणावर विपरीत परिणाम होत असतो. लागवडीनंतर वातावरणात गारठा नसल्यास 13 ते 18 दिवसांत बियाण्याचे अंकुरण होत असते; मात्र गारठा असल्यास 18 ते 25 दिवसांचा कालावधी बियाण्याच्या अंकुरणासाठी लागतो. बियाण्याचे अंकुरण होईपर्यंत पॉलिथिन पिशव्यांना नियमित पाणी द्यावे. मात्र बियाण्याच्या अंकुरणानंतर पाण्याच्या पाळ्या सांभाळून देणे गरजेचे आहे.
अंकुरण झाल्यानंतर पिशव्या कायम वाफसा स्थितीतच ठेवाव्यात. पाण्याची पाळी एक ते दोन दिवस लांबली तरी चालेल, परंतु जास्त पाण्यामुळे पिथीयमचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिथीयमच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर रोपे दगावतात. साधारणतः 45 ते 60 दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. साधारणपणे 12 ते 15 सें.मी.चे आठ पानांची मजबूत सशक्त खोड/ दांडा असलेली रोपे लागवडीसाठी योग्य असतात.
* मातीचे फॉर्मेलिनच्या द्रावणाने (प्रमाण एक लि. पाण्यात 25 मि.लि. फॉर्मेलिन) निर्जंतुकीकरण करून घ्यावे. फॉर्मेलिनचे द्रावण फवारल्यानंतर माती दोन दिवस पॉलिथिन पेपरने झाकून ठेवावी. त्यानंतर 15 दिवसांनी या मातीचा वापर सुरू करावा.
* गारठ्यात रोपे तयार करत असल्यास पॉलिहाऊसमध्ये रोपे तयार करावीत, अन्यथा 50 टक्के शेडनेटचा वापर करावा.
* रोपे सशक्त होण्यासाठी 35 ते 40 दिवसांनंतर दोन ते तीन दिवस शेडनेटच्या बाहेर ठेवावीत.
* पॉलिथिन पिशवीत बियाण्याची लागवड केल्यानंतर पहिले पाणी देताना कॉपर ऑक्सिक्लोराईड (दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी) त्यामध्ये मिसळावे.
* पिशव्या कायम वाफसा स्थितीत ठेवाव्यात. अंकुरणानंतर पाण्याचा एक ते दोन दिवस ताण पडल्यास चालेल, परंतु कोणत्याही परिस्थितीत पाणी जास्त देऊ नये.
* रोपांची उगवण झाल्यानंतर 10-15 दिवसांनी मेटॅलॅक्झील अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति लिटरची आळवणी (ड्रेंचिंग) करावी.
* रोपावस्थेत नत्रयुक्त खते टाळा. आवश्यकता असल्यास 00ः52ः34 आणि ह्युमिक ऍसिडची आळवणी करावी.
* वाढ नियंत्रणात नसल्यास 35 ते 40 दिवसांनी क्लोरमेक्वाट क्लोराईड तीन मि.लि. प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* पपई पिकात फोरेटचा वापर टाळावा.
संदर्भ : ग्राम संसाधन केंद्र
अंतिम सुधारित : 7/4/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...