অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दर्जेदार डाळिंब रोप

डाळिंबाची रोपे तयार करताना मातृवृक्षाची निवड अतिशय महत्त्वाची आहे.

  • मातृवृक्षाचे वय साधारणपणे 3 वर्षे असावे.
  • मातृवृक्ष निरोगी व तजेलदार असल्यास फांद्यांची साल सहजासहजी निघते.
  • रोपे तयार करण्यासाठी गुटी बांधावयाच्या मातृवृक्षांना दीड ते दोन महिने अगोदर रासायनिक खत व शेणखताची मात्रा देणे आवश्‍यक आहे.
  • मातृवृक्षाची संपूर्ण इतिहास विशेषतः त्याचा स्रोत, जात, झाडाची वाढ, फळांची संख्या, फळाचा आकार, फळाचा रंग, कीड व रोग प्रतिकारकक्षमता अशा बाबींची तीन वर्षांची माहिती जमा केलेली असावी. त्यातून चांगल्या प्रतीची फळे देणारी, निरोगी व सर्व दृष्टिकोनातून उत्तम ठरलेली मातृवृक्षाची निवड करावी.
  • मातृवृक्षाची नामवंत प्रयोग शाळेत सेरॉलॉजिकल किंवा मॉलिक्‍युलर मार्कर अथवा बॅक्‍टेरिया फेजेस इ. पद्धतीने मातृवृक्ष निरोगी तसेच विषाणूयुक्त असल्यासंबंधीची चाचणी करून घ्यावी.

गुटी बांधण्याची पद्धत -

 

डाळिंबाची 90 टक्के रोपे ही गुटी कलम पद्धतीने बनवली जातात.

  • पावसाळ्यात (जून ते ऑगस्ट) गुटी बांधल्यास अधिक आर्द्रतेमुळे चांगल्या मुळ्या फुटतात. त्याच प्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबर महिनादेखील गुटी बांधण्यास पोषक आहे.
  • मातृवृक्षावरती गुटी कलम बांधण्यासाठी पेन्सिलच्या जाडीच्या आकाराच्या व एक वर्ष वयाच्या सुदृढ फांद्याची निवड करावी. निवडलेल्या फांदीवरील डोळे नसलेल्या भागातून 2 ते 2.5 सें.मी. वर्तुळाकार भागातील साल आंतरभागाला इजा न होता काढावी. साल काढण्यासाठी धारधार चाकूचा वापर करावा.
  • साल काढलेल्या भागावर शेवाळ (spnagnmmoss) गोलाकार लपेटावे. या शेवाळाची पाणी शोषण क्षमता जास्त असते. 200 ते 300 गेज जाडीच्या 5 इंच x 6 इंच पॉलिथीनच्या तुकड्याने गुंडाळून बारीक सुतळीने बांधावे. सुतळीने बांधताना संपूर्ण शेवाळ झाकले जाईल याची काळजी घ्यावी. ओल्या शेवाळामुळे कापलेल्या भागावरती ओलावा टिकून राहतो.
  • गुटी बांधताना मातृवृक्षावरील पाने काढावी लागतात, त्यामुळे मातृवृक्षास इजा झालेली असते. गुटी बांधून झाल्यानंतर बोर्डो मिश्रण (1 टक्का)ची फवारणी करावी.
  • 30 ते 45 दिवसांत पॉलिथीनच्या आतील शेवाळामध्ये पांढऱ्या मुळ्या फुटलेल्या दिसतात.

रोपासाठी/गुटी लागवडीसाठी मातीचे मिश्रण -

मिश्रणाचे गुणधर्म -

  • रोपांना घट्ट आधार देणारे असावे.
  • मिश्रणांची पाणी धारण क्षमता चांगली असावी.
  • मिश्रण सच्छिद्र म्हणजेच हवा खेळते राहणारे असावे.
  • मिश्रणात अन्नद्रव्याची उपलब्धता असावी.
  • मिश्रणे तणाच्या बिया व हानिकारक जीवजंतूंपासून मुक्त असावीत.
  • रोपे बनवण्यासाठी पोयटा मातीचा वापर अधिक प्रमाणात होतो.
  • 40 टक्के वाळू, 40 टक्के सील्ट व 20 टक्के चिकन मातीचे कण असणारी माती सर्वोत्तम समजली जाते.
  • या मातीवर प्लॅस्टिक कागद अंथरून सौर ऊर्जेच्या साह्याने किंवा बाष्प जल प्रक्रियेद्वारा निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्यात ऍझोस्पिरीलम, पीएसबी, ट्रायकोडर्मा व्हीरीडी किंवा ट्रायकोडर्मा हरजीयानम 1 किलो, निबोंळी पेंड 5 किलो, व्हॅम 200 ग्रॅम प्रति 100 किलो मिश्रणामध्ये मिसळावे.
  • गुट्याची लागवड करण्यासाठी 200 गेज जाडीच्या काळ्या रंगाच्या छिद्र असलेल्या 4'' x 6'' x 2'' आकाराच्या पॉलिथीन पिशव्या वरील मिश्रणाने भरून घ्याव्यात.
  • 1 मीटर रुंदीचे व तीन मीटर लांबीचे 30 सें.मी. खोलीच्या वाफ्यात मातीने भरलेल्या पिशव्या ठेवाव्यात. मातीचे मिश्रण संपूर्ण ओले होईल अशा प्रकारे भरपूर पाणी द्यावे.

गुटी कट करणे व पिशवीत भरण-

  • साधारणपणे गुटी बांधल्यापासून 45 ते 50 दिवसांनंतर मातृवृक्षावरील गुटीतील मुळ्यांना तांबूस रंग येतो. त्यानंतर गुटीच्या खालील बाजूंनी (खोडाच्या बाजूने) शेवाळ बांधलेल्या जागेच्या लगत सिकेटरने कट करावा.
  • लागवड करण्यापूर्वी शेवाळावरील पॉलिथीन पेपर काढून गुटी कलमाची मुळे 10 ते 15 सेकंद कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडाझीम 1 ग्रॅम प्रति लिटर द्रावणात बुडवावी.
  • माती मिश्रणाने भरलेल्या पॉलिथीन पिशव्या पाण्याने चांगल्या प्रकारे भिजवून घ्याव्यात.
  • गुटीकलम लागवड करताना शेवाळाच्या वरील बाजूने तीन बोटाचा आधार देत गुटी कलम हलक्‍या हाताने शेवाळ पूर्ण मातीत झाकले जाईल, अशा प्रकारे व्यवस्थित लावावे. अन्यथा मुळे तुटण्याची शक्‍यता असते.
  • गुटी कलम लागवड केल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावे.
  • 15 दिवसांनी 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग करावे. लागवड केल्यानंतर साधारणपणे 15 दिवसांनी नवीन फुटवे फुटतात. गरजेनुसार कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या डाळिंब कलमांचा वापरच लागवडीसाठी करावा.

संपर्क -
दीपक गायकवाड : 08275472982
: 02426- 243335

(लेखक मध्यवर्ती रोपवाटिका, बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)

----------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत:अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate