(हिं. केला; केळ; क. बाळेहण्णू; सं. कदली, रंभा, दीर्घपत्रा, ऊरुस्तंभ; इं. बनाना, प्लँटेन, अॅडॅम्स फिग; लॅ. म्यूझा पॅरॅडिसियाका म्यूझा सॅपिएंटम; कुल-म्यूझेसी). या पिकाचे मूलस्थान आशिया खंडाच्या आग्नेय भागात असून आधुनिक शास्त्रज्ञांच्या मते ते भारतातील आसाम राज्याच्या दक्षिणेस आहे. अनादिकालापासून भारताच्या आग्नेय व पश्चिम भागांत ही वनस्पती आढळते. पुरातन संस्कृत ग्रंथांमध्ये केळे या फळाचा उल्लेख सापडतो.
आशिया खंडाच्या उष्णकटिबंधातील सर्व प्रदेशात केळीची लागवड पुरातन काळापासून होत असल्याचे दिसून येते. पाश्चात्त्य देशांतील उष्णकटिबंधांत मात्र या ओषधीची [→ ओषधि] लागवड आधुनिक आहे. व्यापारी दृष्ट्या मध्य अमेरिका, कॅरिबियन बेटे आणि वेस्ट इंडीज हे देश केळीच्या लागवडीबाबत अग्रगण्य आहेत.
ह्या सर्वपरिचित, उपयुक्त, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), मोठ्या ओषधीचा अंतर्भाव ज्या वनस्पति-वंशात (म्यूझा) होतो, त्याचा प्रसार उष्णकटिबंधातील दमट प्रदेशात फार मोठा (पश्चिमेत आफ्रिकेपासून ते पूर्वेस पॉलिनेशियन बेटापर्यंत) आहे. भारतात ह्या वंशातील एकूण १४ जाती असून त्यांपैकी ३-४ विदेशी जाती शोभेकरिता बागेत लावलेल्या आढळतात; तथापि जातींच्या संख्येबद्दल एकमत नाही.
म्यूझा वंशाच्या वर्गीकरणाबद्दल मतभेद आहेत. त्यातल्या भिन्न जातींत आढळणाऱ्या रंगसूत्रांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संख्या व काही शारीरिक लक्षणे (छदे, फुले, बिया इ.) विचारात घेऊन फायसोकॉलीस एसेंटे, (रंगसूत्रे, ९ x २) व म्यूझा असे दोन उपवंश केले असून म्यूझा या व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या व मोठ्या उपवंशाचे चार विभाग केले आहेत.
(१)म्यूझा: (रंगसूत्रे, ११ x २; यूम्यूझा). केळफुलांवरची छदे फिकट, फुले अनेक व दोन रांगांत; प्रसार-भारत ते जपान व सामोआ; व्यापारी दृष्ट्या सर्व महत्त्वाच्या जाती.
(२) ऱ्होडोक्लॅमीस : (रंगसूत्रे, ११ x २ ). छदे भडक लाल, फुले थोडी व एकाच रांगेत; प्रसार – भारत ते आग्नेय आशिया.
(३) आस्ट्रॅलिम्यूझा : (रंगसूत्रे, १० x २). बिया गोलसर किंवा चपट्या; प्रसार – क्वीन्सलँड ते न्यू गिनीतून फिलिपीन्स बेटे; उदा., मॅनिला हेंप व म्यूझा फेही जाती.
(४) कॅलिम्यूझा : (रंगसूत्रे, १० x २). बिया लांबट गोल किंवा भोवऱ्यासारख्या; प्रसार – आग्नेय आशिया. ह्या दुसऱ्या विभागातल्या जाती विशेषेकरून शोभादायक.
यांपैकी पहिल्या विभागाची भौगोलिक मर्यादा मोठी असून बहुतेक सर्व खाद्य फळांच्या जाती व प्रकार त्यात येतात व ते सर्व संकरज असून त्यांचे पूर्वज (म्यूझा अॅक्युमिनॅटा वम्यूझा बाल्बिशियाना भारतात सापडतात; ह्यांच्या संकरामुळे द्विगुणित, त्रिगुणित व चतुर्गुणित (ज्यांच्या पेशींतील रंगसूत्रांची संख्या जननपेशींतील रंगसूत्रांच्या नेहमीच्या संख्येच्या दुप्पट, तिप्पट व चौपट असलेले व त्याद्वारे इच्छित गुणधर्म आणलेले) असे लागवडीचे प्रकार मिळाले आहेत.
खाद्य केळ्यांच्या जाती व प्रकार आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे असून त्यांच्या उत्क्रांतीमध्ये मुख्यतः वंध्यत्व, ⇨बहुगुणन, शाकीय प्रजोत्पादन (खोड, कंद इत्यादींसारख्या एरवी फक्त पोषणाचे कार्य करणाऱ्या इंद्रियांपासून होणारे प्रजोत्पादन) व अनिषेक फलन (फलनक्रिया न घडता व फळात बियांची वाढ न होता फळ तयार होणे) या घटनांचा प्रभाव पडला आहे [→ आनुवंशिकी; प्रजोत्पादन].
म्यूझा अँक्युमिनॅटा :केळीची ही जंगली अनेक अधश्चरयुक्त (बुंध्यापासून निघणारे धुमारे असलेली, मुनवेयुक्त) असून जमिनीवर अनेक मोठ्या पानांच्या परस्परांभोवती वेढून राहणाऱ्या आवरक (खोडाला वेढणाऱ्या) पर्णतलामुळे बनलेले आभासी खोड सु. ३ - ७ मी. उंच असते व त्यावर तपकिरी किंवा पिंगट डाग असतात. आवरक व पन्हाळीदार देठावर पांढुरकी छटा; पानांची पाती मोठी (२ - २.५ मी. X ४० - ६० सेंमी.), आयत, छेदित टोकांची, हिरवी किंवा जांभळट हिरवी; फुलोरा खोडाशी काटकोनात किंवा लोंबता, द्विलिंगी फुले तळाशी आणि पुं-पुष्पे टोकास छदांनी झाकलेली; फुलांची रचना ⇨सिटॅमिनी गणात वर्णिल्याप्रमाणे.
271
फळांच्या फण्यात दाटीने, टोकदार, साधारण गोलसर, लांबट, आखूड देठांची केळी (८ - १३ X १.५० - ३.० सेंमी.) असतात. बिया (असल्यास) काळसर असून पांढरट किंवा मलईसारख्या अथवा पिवळट मगजाने (गराने) वेढलेल्या असतात. यामध्ये एकूण पाच उपजाती (सबीज न निर्बीज आणि द्विगुणित व त्रिगुणित) असून त्यांचा प्रसार आसाम, द्वीपकल्पीय भारत, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सामोआ, फिलिपीन्स, थायलंड, श्रीलंका, ब्रह्मदेश इ. प्रदेशांत आहे.
त्यामध्ये खुजे, उंच व मध्यम उंच प्रकार असून ते लागवडीत आहेत. ‘बसराई’ प्रकार मुंबई, तमिळनाडू व इतरत्र सामान्यपणे लागवडीत असून तो खुजा व खाद्य केळ्यांपैकी आहे. ‘लाल केळ’, ‘हरी साल’ हे प्रकार [→ कृत्तक] भारतात लागवडीत आहेत, शिवाय अनेक संकरज प्रकार पिकविले जातात.
म्यूझा X पॅरॅडिसियाका म्हणजेच म्यूझा X सॅपिएंटम : (संकरज प्रकार X या खुणेने दर्शवितात). बहुतेक सर्व निर्बीज खाद्य प्रकारांच्या केळ्यांच्या जातींचा अंतर्भाव या सदरात करतात व लागवडीतील सर्व प्रकार बव्हंशी आरंभी म्हटल्याप्रमाणेच संकरज आहेत. त्यांचे द्विगुणित किंवा चतुर्गुणित कृत्तक आहेत. त्यांचे स्वरूप, फळांचा आकार, रंग व चव यांत विविधता आढळते. भारताइतके खाद्य कृत्तक जगात इतरत्र पिकविले जात नाहीत. ते बहुतेक (सु. ३४) यूम्यूझा विभागातले आहेत.
यांशिवाय खालील विशेष प्रकार नमूद करण्यासारखे आहेत.
(१)म्यूझा कॉक्सिनिया :उंची सु. १.५ मी., छदे शेंदरी, फळे नारिंगी पिवळी, बिया लांबट व काळ्या; शोभेकरिता लावतात.
(२) म्यूझा टेक्स्टिलिस : (इं.मॅनिला हेंप; अबाका). उंची २.५ - ४ मी., अधश्चरयुक्त, भक्कम व मूळचे फिलिपीन्समधील पानांच्या आवरकातल्या धाग्याकरिता करण्यात आलेले भारतातील लागवडीचे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत. फिलिपीन्समध्ये मोठ्या प्रमाणात लागवड करतात. गांजा व सण (सनहेंप) यांच्यापेक्षा धागा बळकट असून दोरा, दोर, केबल व कागदाकरिता उपयुक्त; फळे अखाद्य.
(३) म्यूझा रोझेशिया : (म.रानकेळ). झाडे लहान, तिरश्चरयुक्त (मुख्य खोडापासून निघून जमिनीत आडवे वाढणारे कमकुवत खोड असलेली); पाने लांबट व अरुंद, फळे बोटाएवढी व अखाद्य. आवरकापासून धागा मिळतो. प्रसार - कोकण, पूर्व हिमालय, पश्चिम घाट.
(४) म्यूझा सुपर्बा : (म.चवेणी). झाडे उंच व मोठी, तिरश्चरहीन; पान मोठी; फळे लहान, पिकल्यावर शुष्क. आवरकापासून धागा काढतात व पाने भोजनास वापरतात. सह्याद्रीवर भरपूर आढळते.
(५) म्यूझा सुमात्राना : झाडे मध्यम उंच, पानांवर शेंदरट तपकिरी डाग; मूळची सुमात्रातील असून बागेत शोभेकरिता लावतात.
(६) म्यूझा झेब्रिना : झाडे उंच व पानांवर गर्द रंगी पट्टे व खाली लालसर; मूळची मलायातील असून बागेत शोभेकरिता लावतात.
उपयोग : पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून कच्ची फळे, खोडाचा गाभा व केळफुले (कोका) भाजीकरिता वापरतात. फळांपासून टिकाऊ पूड (पीठ), मुरांबे, टॉफी, काचऱ्या, जेली इ. पदार्थ बनवितात. पिकलेली केळी उन्हात वाळवून सुकेळी बनवितात. स्टार्च, शर्करा, प्रथिन, मेद (स्निग्ध पदार्थ), खनिजे व जीवनसत्त्वे (विशेषतः ब-गट) पक्व फळात असतात. कच्च्या फळात टॅनीन व स्टार्च अधिक असून फळ पिकताना साखरेचे प्रमाण वाढते व टॅनीन कमी होते; तसेच वास व चवही बदलतात. बसराई केळ्याच्या खाद्य भागाचे पृथक्करण केल्यास त्यात जलांश ७९.६%, प्रथिन ०.७%, मेद ०.४% खनिजे ०.७%, तंतू ०.४%, अन्य कार्बोहायड्रेटे १८.२% आढळतात व त्यापासून ७९ कॅलरी मिळतात. शुष्क आवरक पर्णतलाचा उपयोग फुले, फळे, विड्याची पाने, तपकीर वगैरेंसारख्या वस्तू बांधण्यास आच्छादन व दोरासारखा करतात. फळ सारक असते; मधुमेह, मूत्रपिंडदाह, संधिवायू, मूत्रविषरक्तता (रक्तात यूरिया राहिल्यामुळे निर्माण होणारी स्थिती) व हृदयविकार यांवर ते गुणकारी असते. राख कृमिनाशक. पक्व फळांपासून मद्य व शिर्का (व्हिनेगार) बनवितात.
परांडेकर, शं.आ.
हे पीक समशीतोष्ण हवामानात चांगले येते. परंतु ज्या ठिकाणचे उन्हाळ्यातले सरासरी तापमान ३०० से. पेक्षा जास्त नसते व हिवाळ्यातील कमीतकमी तापमान १०० से. पेक्षा खाली जात नाही तेथेही घेता येते. या पिकाला कडक थंडी सोसवत नाही. जास्त पर्जन्यमान चांगले पण कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशांतही लावतात व तेव्हा त्याला विहिरीचे अगर कालव्याचे पाणी लागते. या पिकाला हवेतील आर्द्रता चांगली मानवते.
केळीला ६० ते ७० सेंमी. खोल व जास्त प्रमाणात जैव पदार्थांचा पुरवठा असलेल्या जमिनी चांगल्या. गाळाच्या रेताड जमिनी या पिकाला फार मानवतात. परंतु खताचा भरपूर पुरवठा केल्यास कोणत्याही जमिनीत केळीची लागवड करता येते. केळीला भरपूर पाणी लागत असले, तरी मुळांजवळ ते सोचून राहिल्यास हानिकारक ठरते म्हणून बऱ्याच देशांमध्ये भरपूर प्रमाणात जैव पदार्थांचा भरणा असलेल्या आणि पाण्याच्या निचरा चांगला असलेल्या पडीक जमिनीत लागवड करतात.
समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात केळीची लागवड केणत्याही महिन्यात करता येते. कोकणपट्टीत वर्षभर केळीची लागवड करता येते. ज्या ठिकाणचे हिवाळ्यातील तापमान १२० से. खाली जाते तेथे हिवाळा संपताच लागवड करतात म्हणजे झाडांची वाढ जोमात होऊन जास्त उत्पन्न मिळते. भारताच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या दिवसांत केळीची लागवड करतात. तमिळनाडू भागात वर्षातील बहुसंख्य दिवसांमध्ये पक्व केळी मिळावी म्हणून २-३ हंगामांत लागवड केली जाते. तंजावर जिल्ह्यात बहुवर्षायू पिकाच्या लागवडी सामान्यतः जानेवारी ते जुलै महिन्यांत करतात.
पश्चिम समुद्र किनारपट्टीच्या भागात सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये, केरळ राज्यात डिसेंबरमध्ये आणि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एप्रिल, जून, ऑगस्ट किंवा ऑक्टोबरमध्ये आणि जळगाव व धुळे जिल्ह्यांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला मे-जूनमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये केळीची लागवड करतात. जळगाव व धुळे भागात ‘बसराई’ जातीची लागवड फेब्रुवारीमध्ये करण्याचे प्रयत्न केले जात आहेत कारण असे गैरहंगामी केळ्याचे पीक काढल्यामुळे त्याच्या फळांना मिळणाऱ्या चढत्या भावामुळे ते किफायतशीर ठरते. ऑक्टोबर महिन्यात केलेल्या लागवडीमध्ये सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ न होता ती पुढे फेब्रुवारी महिन्यापासून खरी सुरू होते. सर्वसाधारणपणे केळांच्या लागवडीचा हंगामा अद्याप जून-जुलैमध्येच असतो.
लागवडीसाठी जमीन नांगरून, ढेकळे फोडून, तणांची बुडखी वेचून घेऊन कुळवून भुसभुशीत करतात. जमीनीत हेक्टरमध्ये ५० - ७५ टन चांगले कुजलेले शेणखत घालून कुळवाने मिसळून घेतात. पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जैव पदार्थ आणि नायट्रोजनयुक्त खताचा भरपूर पुरवठा करणे जरूरीचे असते. खत मिसळल्यानंतर केळीच्या जातीप्रमाणे लागणीमधील अंतर ठरवून आखणी करतात. काही ठिकाणी ठराविक अंतरावर सऱ्या काढतात. काही ठिकाणी २५ X ४५ X ३० सेंमी. मापाचे खड्डे घेऊन त्यांच्यात चांगली माती आणि शेणखत मिसळून भरतात व त्यांत बेणे लावतात. सर्व जमिनीत खत मिसळीत नाहीत.
हे पीक स्वतंत्रपणे एकटेच किंवा मिश्रपीक म्हणूनही लावतात. सामान्यतः एकटेच लावतात. मिश्रपीक म्हणून ते नारळी सुपारीच्या बागांमधून, पानमळ्यांमधून, आंब्याच्या बागांमधून वगैरे लावतात. काही पिकांच्या सुरुवातीच्या ३-४ वर्षांत पोटपीक म्हणूनही लावतात. कॉफीच्या मळ्यांमधून पहिल्या ३-४ वर्षांत कॉफीच्या रोपांना सावली मिळावी म्हणूनही केळी लावतात.
जमिनीची प्रतवारी, लागवडीचा प्रकार, पिकांची जात यांच्यानुसार भारतात गोदावरी नदीच्या दुआबामधील काही भागांत केळीच्या लागवडी ५० - १०० वर्षे इतक्या दीर्घ मुदतीपर्यंत उत्पन्न देत असल्याचे आढळते.
केळीची लागवड सामान्यतः जमिनीत वाढणाऱ्या त्यांच्या गड्ड्यांच्या द्वारे आणि कधीकधी मुनवे लावूनही करतात. पीक संपल्यानंतर गड्डे जमिनीतून खणून काढतात. त्यांच्या मुळ्या कापून ते योग्य प्रकारे तासून तयार करतात. डोळ्याला अपाय होऊ देत नाहीत. गड्डे अर्धा ते एक किग्रॅ. वजनाचेच निवडून घेतात. जास्त वजनाचे घेत नाहीत. लागवड करताना डोळे शाबूत व निरोगी असलेले गड्डेच घेतात आणि डोळे वरच्या बाजूला राहतील असे लावतात. मुनवे म्हणजे केळीच्या बुंध्यापासून निघालेले धुमारे. ते खणून काढून लागवडीसाठी तयार करण्याकरिता त्यांची बुंध्यावरील मुळे कापून काढतात.
हे मुनवे दोन प्रकारचे असतात. एका प्रकारात त्याची पाने तलवारीच्या पात्याप्रमाणे निमुळती असतात व दुसऱ्यात ती रुंद व पसरट असतात. पहिल्या प्रकारात मुनव्याचा बुंधा दणकट असतो आणि शेंड्याकडे खोड निमुळते होत जाऊन टोकाला लहान आकाराची अरुंद पाने आलेली असतात. दुसऱ्या प्रकारात मुनव्याचे खोड किरकोळ असून वरची पाने पसरट असतात. लागवडीसाठी नेहमी पहिल्या प्रकारचे मुनवे वापरतात. त्यांच्यापासून येणार्या झाडांची वाढ जोमदार होऊन उत्पन्नही चांगले येते. कोरड्या हवामानात लागवड करताना मुनव्यांची उंची १२ - १५ सेंमी. ठेवून वरचा शेंड्याचा भाग कापतात. दमट हवामानात शेंडा कापण्याची जरूरी नसते. मुनवे सरळ लावतात म्हणजे झाड सरळ वाढते.
दोन झाडांत ठेवावयाचे हमचौरस अंतर जमिनीची सुपीकता आणि केळीची जात यांच्यावर अवलंबून असते. कमी पसरणाऱ्या बसराईसारख्या जातीकरिता १.५ x १.५ मी . किंवा २ x २ मी. अंतर ठेवतात. अंतर जास्त ठेवल्यास फळांची प्रत सुधारते परंतु हेक्टरी उत्पन्न कमी येते. अंतर कमी केल्यास झाडांची संख्या वाढून उत्पन्न जास्त येते परंतु फळांची प्रत बिघडते. घड तयार होण्यास काळ जास्त लागतो. उंच जाती २.७ x ३.०० मी. अंतरावर लावतात.
लागवड नेहमी खोल कारण लावलेल्या गड्याच्या किंवा मुनव्याच्या मुळच्या गड्यावर नवीन गड्डा तयार होत असतो. याच्या खालच्या भागावर म्हणजे जुन्या गड्ड्याच्या वरच्या भागातून मुळे फुटत असतात. त्यामुळे उथळ लागवडीत नवा गड्डा जमिनीवर येतो आणि झाड वाऱ्याने पडण्याची शक्यता असते म्हणून लागवड २० – २५ सेंमी. खोल करतात.
पाणी : लागवडीनंतर लगेच पाणी देतात. पुढील पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर हे हवामान, जमिनीचा मगदूर यांच्यावर अवलंबून असते. एक पीक घेण्याकरिता सामान्यतः पावसाचे पाणी सोडून ४० ते ८० वेळा पाणी भरावे लागते. एका पाळीत हे. ५ ते ७.५ सेंमी. पाणी भरतात. उन्हाळ्यात दोन पाळ्यांमधील अंतर ४ - ८ दिवस आणि हिवाळ्यात ८– १५ दिवसांचे ठेवतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हवामान परिस्थितीप्रमणे हा काळ कमीजास्त होतो. पाण्याची उपलब्धता व लागवडीची पद्धत यांच्यावर पाणी देण्याची पद्धत अवलंबून असते. नेहमी पाणी खोडाला भिडणार नाही असे देणे चांगले.
आंतर मशागत : पिकातील गवत काढून जमीन नेहमी स्वच्छ ठेवल्यामुळे झाडांचे आरोग्य चांगले राहून तणांमुळे होणारा खताचा आणि पाण्याचा अपव्यय थांबतो. केळीच्या झाडांमधील मोकळ्या जागेत पालापाचोळ्याचा किंवा अन्य प्रकारच्या गबाळाचा थर पसरवून ओल टिकवितात. यासाठी हल्ली काही ठिकाणी पॉलिथीन कागदही वापरतात. केळीची झाडे वाढल्यावर पाने फाटून अपाय होतो म्हणून मशागतीसाठी कोणतेही बैल अवजार पिकात वापरता येत नाही.
जमीन हलक्या कुदळीन २-३ वेळा कुदळून मोकळी करतात. पिकाच्या मुळ्या तुटून अपाय होतो म्हणून खोल मशागत करीत नाहीत. झाडाच्या बुंध्यापासून येणारे मुनवे नेहमी तीक्षण हत्याराने काढून टाकतात त्यामुळे केळींची वाढ जोमात होते. लागवडीपासून चार महिन्यांनी हलकी खांदणी किंवा चाळणी करून खोडाभोवती मातीची भर घालतात.
लागणीपूर्वी दिलेल्या भरखताशिवाय केळीच्या पिकाच्या सुरुवातीच्या पाच महिन्यांच्या आत नायट्रोजनयुक्त वरखते दिल्यास त्यामुळे झाडांपासून जास्त केळ्यांचे मोठे घड पडतात. लागणीपासून सहाव्या महिन्यात केळीच्या खोडात फळसंख्या आणि आकारमान यांची आखणी तयार होत असते म्हणून वरखत त्या आधी देतात.
नायट्रोजनप्रमाणे पोटॅश आणि फॉस्फरस यांची सुद्धा केळीच्या वाढीसाठी जरूरी असते. त्यांचा पुरवठा जमिनीत उपलब्ध असलेल्या त्या घटकांचे प्रमाण पाहून करावा लागतो. वरखते झाडांच्या बुंध्यापासून दूर पण मुळांच्या परिसरात घालणे आवश्यक असते. दक्षिण भारतात लागणीनंतरच्या पहिल्या, पाचव्या आणि नवव्या महिन्यांत प्रत्येक वेळी हेक्टरला २० किग्रॅ. अमोनियम सल्फेट द्वारे नायट्रोजन देतात. पश्चिम भारतात प्रत्येक खोडाला २ किग्रॅ. पेंड लागणीनंतरच्या पहिल्या तीन महिन्यांत देतात.
केळीची पाने रुंद असल्यामुळे वाऱ्याने फाटतात व त्याचा झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पन्न घटते. म्हणून सुरुवातीलाच पिकाला वाऱ्यापासून संरक्षण देण्यासाठी बागेभोवती शेवरी, ग्लिरीसीडिया किंवा इतर झाडांची कुंपण तयार करतात. त्यांच्यामुळे नुकसान कमी होऊन उत्पन्न वाढते.
फुले येण्यास लागणारा काळ आणि पुढे फळे तयार होण्यास लागणारा काळ हवामानावर अवलंबून असतो. लागणीनंतर साधारणतः ६ महिन्यांनी खोडात फुलोरा तयार होऊ लागतो व तो साधारणपणे ९ ते १० महिन्यांनी खोडाबाहेर पडतो. सदर फुलोरा बाहेर पडल्यानंतर सामान्यतः १०० ते १५० दिवसांत त्यापासून केळ्यांचा घड तयार होतो. हिवाळ्यात घड तयार होण्यास थोडा जास्त काळ लागतो. दमट उष्ण हवामानात त्याला थोडा कमी काळ लागतो.
घडाने आकार घेतला म्हणजे त्याच्या टोकाला असलेले वांझे केळफूल त्या घडातील केळ्यांच्या शेवटच्या फणीपासून थोड्या अंतरावर कापून काढून घेतात. त्या केळफुलाचा भाजीसाठी उपयोग होतो. शिवाय ते काढून घेतल्यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्यांचे वजन वाढते. केळफुले विकल्यामुळे थोडे उत्पन्नही मिळते. केळ्यांवर प्रखर सूर्यप्रकाशामुळे अपाय होऊ नये म्हणून घडावर केळीच्या वाळलेल्या पानांचे आच्छादन घालून तो झाकतात. क्वीन्सलँड (ऑस्ट्रेलिया) मध्ये प्रखर ऊन, थंडीचा कडका, पाखरे वगैरेंपासून फळांना उपद्रव पोहोचू नये म्हणून सबंध घडच पिशवीत घालून झाकून ठेवण्याची प्रथा आहे.
घड पक्व होत असताना केळ्यांचा गडद हिरवा रंग बदलत जाऊन तो फिकट हिरवा दिसू लागतो. त्यांच्यावरील शिरा (धारा) अस्पष्ट होत जाऊन त्या गोल आकार धारण करतात. पक्व केळ्यावर नखाने टिचकी मारल्यास धातूवर आघात केल्यासारखा आवाज निघतो. क्वचित अगदी वरच्या फणीतील एखाददुसरे केळ पिकलेले आढळते, त्यावरून घड पक्व झाल्याचे समजते. तयार झालेला घड दांडा थोडा लांब ठेवून तीक्ष्ण धारेच्या हत्याराने कापून घेतात.
नंतर ते झाड जमिनीसपाट कापतात. चांगल्या प्रकारे तयार झालेला घड काढल्यानंतर ३-४ दिवसांत संपूर्णपणे पिकतो म्हणून विक्रीकरिता दूर पाठविता येत नाही. परदेशी किंवा देशातच दूरच्या ठिकाणी पाठवावयाचे घड पूर्ण पक्व होण्याला १० - १५ दिवसांचा अवधी असताना काढतात त्यामुळे वाहतुकीच्या काळात त्यांतील केळी न पिकता टणक राहतात व नुकसान होत नाही.
कापलेले घड शेतातून किंवा रेल्वेस्थानकापर्यंत वाहून आणतात आणि ट्रक किंवा रेल्वेच्या डब्यात, तळाला आणि बाजूंना केळीची पाने लावून, काळजीपूर्वक रचतात. काही वेळा घडातील केळ्यांच्या फण्या सुट्या करून प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून त्या जाड पुठ्ठ्याच्या खोक्यांमधून विक्रीकरिता पाठविण्यात येतात. केळी जास्त दिवस चांगली टिकविण्याकरिता शीतगृहांचा उपयोगही केला जातो. केळी परदेशी पाठविताना आगबोटीत १२० से. तापमानाच्या कोठडीत ती साठवितात. २०० ते २२० से. तापमानामध्ये पिकविलेल्या केळ्यांना चांगला रंग येतो. चांगला रंग येण्यासाठी एथिलीन वायू वा २, ४ डी सारखे रसायनही वापरतात.
या जातीची महाराष्ट्रात इतर जातींपेक्षा सर्वांत जास्त प्रमाणात लागवड होते. झाड ठेंगणे, वाऱ्यामुळे पडण्याची भीती कमी. पनामा नावाच्या गाभा सडविण्याऱ्या रोगाला प्रतिकार करणारी असल्यामुळे या जातीचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. सर्वसाधारणतः झाडांची उंची १.५ - १.८ मी. असून पाने रुंद व आखूड आणि खोड जोमदार असते. फळांचा आकार मोठा असून साल हिरवी असते. फळ पिकल्यावर सालीवर काळे ठिपके येतात आणि तिचा रंग हिरवट पिवळा होतो.
गराच रंग मळकट पांढरा असून तो मऊ आणि गोड असतो. उत्तर भारतात या केळ्यांना चांगली मागणी असते. घड मोठा असून चांगला भरलेला असतो आणि त्याचे वजन २० - ३० किग्रॅ.पर्यंत भरते. फण्यांची संख्या ७ - १० असून एकंदर केळी १०० - १३० असतात. या जातीला वामनकेळ, काबुली, मॉरिशस व गव्हर्नर अशी दुसरी नावे आहेत.
महाराष्ट्रात कोकणपट्टीतील वसई भागात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. केळ्यांचा आकार सर्वसाधारणतः बसराईसारखाच असतो पण ती थोडी जास्त जाड असतात. केळी पिकल्यावर देखील त्यांची साल हिरवीच राहते म्हणून या जातीला हरी साल केळी म्हणतात. फळांचा आकार जरी बसराईसारखा असला, तरी झाड मात्र बसराईपेक्षा खूप उंच वाढणारे असते.
पिकलेल्या केळ्यांचा गर मऊ, रुचकर आणि गोड असतो. झाडाची पाने अरुंद व लांब असतात. घड २५ - ३५ किग्रॅ. वजनाचा असतो. त्यात १५० - १६० पर्यंत केळी असतात. ही जात बसराईपासून निपजली अशी समजूत आहे. तिची इतर नावे पेद्दापाचया, आरती, जायंट गव्हर्नर आणि लॅक्टॉन.
या जातीखाली भारतात जास्त क्षेत्र आहे. ती तमिळनाडू, प. बंगाल व आसाम या राज्यांतील केळीची मुख्य जात समजली जाते. महाराष्ट्रातील समुद्रकिनारपट्टीत तिची लागवड होते. झाड उंच. खोडावर व पानांवर तांबूस रंगाची छटा. केळ्याचा आकार लहान, अर्ध फुगीर, साल पातळ. पिकल्यावर फळाचा रंग सोनेरी पिवळा बनतो. घडाचे वजन १५ - २० किग्रॅ. पर्यंत भरते.
घडातील फण्यांची रचना दाट असते. सर्वसाधारणपणे घडात १० - १४ पर्यंत फण्या असून केळी २०० - २५० पर्यंत असतात. केळ्यातील गर तांबूस पांढरा असून चवीला आंबटगोड असतो म्हणून काही ठिकाणी ही जात आंबट वेलची म्हणून ओळखतात. वेस्ट इंडीज बेटांत ही जात‘फिलबॉस्केट’ या नावाने आणि तमिळनाडूमध्ये पूवन तर प. बंगाल व आसाममध्ये चंपा या नावांनी ओळखतात.
केळ्यांचा गर पांढरा असतो; साल फार पातळ असते. झाड उंच वाढणारे आणि नाजूक असते. केळ्याचा आकार फार लहान असून गोल असतो. सर्वसाधारणपणे १०-१२ किग्रॅ. वजनाचे घड येतात. घडात १२ - १४ फण्या असून केळी १५० - २०० पर्यंत असतात. या जातीला कागदी वेलची, नेपूवन, लेडिज फिंगर अशी दुसरी नावे आहेत.
या जातीची लागवड प. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. झाड उंच वाढणारे व नाजूक. केळी आकाराने मध्यम जाड आणि आखूड असतात. मध्यभागी थोडी फुगीर. केळे पिकल्यावर साल पिवळी जर्द बनते. तिला चकाकी असते. पिकलेल्या केळ्याचा गर घट्ट, पिष्टमय आणि रुचकर असतो. घड मध्यम आकाराचा, वजन साधारणपणे १० - २० किग्रॅ., घडात १०० - १२५ केळी असतात. या जातीमध्येच ‘सहस्रफळी’ म्हणून एक जात आहे.
तिच्या घडाच्या (लोंगराच्या) अखेरीपर्यंत केळी धरतात. अखेरची केळी आकाराने फार लहान राहिल्यामुळे त्यांना व्यापारी दृष्ट्या महत्त्व नसते. तिची रस्थाळी, मार्तमान आणि अॅपल अशी दुसरी नावे आहेत. ही जात पनामा रोगाला लवकर बळी पडते
या जातीमध्ये उंच व ठेंगणी अशी दोन प्रकारची झाडे असतात. ही दोन्ही प्रकारची झाडे जोमदार असतात. ही जात थंड प्रदेशातसुद्धा चांगली येऊ शकते. घड मध्यम आकाराचा, केळीही मध्यम आकाराची आणि टोकाला निमुळती होत गेलेली असतात. त्याच्यावरील धारा स्पष्ट दिसतात.
केळ्यांचा गर मळकट पांढरा आणि चवीला आंबटगोड असतो. घडाचे वजन १८ - २० किग्रॅ., केळ्यांची संख्या १०० - १२५ असते. या जातीची दुसरी नावे देशी, कुल्लन, राजापुरी, बटर-बनाना, हिल-बनाना अशी आहेत.
झाड उंच वाढणारे. केळे आकाराने लांब, टोकाला निमुळते. त्याच्यावर धारा असतात. केळे पिकल्यावर साल पांढरट पिवळी बनते. गर खूप घट्ट आणि तांबूस रंगाचा, चवीला मध्यम गोड. ही केळी सुकेळी करण्याकरिता मुख्यतः वापरतात. गरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे ही केळी चांगली टिकतात. ती शिजवून खातात.
झाड उंच वाढणारे. घड मोठा पण त्यात केळ्यांची संख्या कमी. केळी आकाराने मोठी व धारा असलेली. या केळ्यांचा उपयोग जास्त करून भाजी, काप, पीठ वगैरे तयार करण्यासाठी मोठ्या प्रामाणावर केला जातो. केळे पिकल्यावर त्याची साल पिवळी बनते. केळ्यातील गर नरम व पांढरा, चवीला स्टार्चसारखा. वेस्ट इंडीजमध्ये या केळ्यांना आइस्क्रिम बनाना म्हणतात. साबरबोंडी, अनाबाळे, मॉन्थन ही या केळीची दुसरी नावे.
उत्पादन : भारतामधील केळ्यांचे प्रतिहेक्टरी उत्पादन २६ - ५५ टन आहे. केळ्यांचे जागातिक वार्षिक उत्पादन सु. २.५ कोटी टनांपर्यंत होते. त्यापैकी ५० टक्के आफ्रिका खंडात, २५ टक्के दक्षिण अमेरिकेत आणि २५ टक्के इतर देशांत होते. यांपैकी बहुतेक उत्पादनाचा खप ज्या त्या उत्पादक देशातच होतो. भारतामधील वार्षिक उत्पादन अदमासे ४० - ५० लाख टनांपर्यंत येते. त्यातील बहुतेक माल देशातच खपतो.
काही थोडे उत्पादन भुकटी करणे, सुकेळी करणे वगैरेंसाठी वापरले जाते आणि काही बहरीन, सौदी अरेबिया, कुवेत, रशिया वगैरे देशांना पाठविले जाते.
विक्री : केळ्यांचे उत्पादन सामान्यतः घडांच्या दर शेकडा नगांवर त्याच्या आकारमानाचा, त्यांतील केळ्यांच्या सर्वसाधारण संख्येचा विचार करून घाऊक व्यापारी जागेवरच विकत घेत. सध्या सर्व मोठ्या पेठांत
त्यांची वजनावर विक्री होते. किरकोळ विक्रते भट्टीचा तयार माल घेऊन डझनावर विक्री करतात. स्थानिक बाजारात विक्रीसाठी तयार घड काढतात. लांबच्या गावी किंवा परदेशी रवाना करण्याचे घड केळी पूर्ण पोसून तयार झाल्यावर परंतु पिकण्याच्या अवस्थेच्या आधी १०-१५ दिवस काढतात.
पिकविणे व साठवण : बंद गुदामामध्ये सामान्य तापमानाला केळी हळू व कमीजास्त पिकतात. मुंबई व मद्रासमध्ये सर्वसाधारणतः बंदिस्त कोठीत धूर देऊन केळी पिकवितात. कोठी लोंगरांनी ३/४ भरून केळ्यांच्या वाळलेल्या पानांनी झाकतात व एका कोपऱ्यात गोवऱ्या किंवा भाताच्या काडांचा धूर करतात. नंतर कोठी बंद करून घेतात. उन्हाळ्यात १८ - २४ तास व हिवाळ्यात सु. ४८ तास धुरी देतात. ह्या अवधीत हिरव्या केळ्यांचा रंग बदलून फिकट हिरवट पिवळा होतो. कोठी उघडून लोंगराचे हवेशीर जागी ढीग लावून ठेवतात. २-३ दिवसांत त्यांचा रंग पिवळा जर्द होतो.
शीतगृहात १५.५० - २१० से. ह्या नियमित तापमानात हळूहळू पिकविलेली केळी, धुरी देऊन अगर तापवून मुद्दाम पिकविलेल्या केळांपेक्षा गोड असतात.
नुकतीच धाडलेली बसराई केळी २०० से. तापमानात तीन आठवडे ठेवली असता हळूहळू व एकसारखी पिकून त्यांना आकर्षक पिवळा रंग येतो व त्यांच्यावर काळे ठिपके येत नाहीत. ती १३० से. ला खराब होतात. मुठेळी वेळी २१०, २०० व १३० से. ला ठेवल्यास अनुक्रमे दोन, तीन व चार आठवड्यांत समाधानकारक पिकतात. अतिशित तापमानात केळी पिकत नाहीत व ती गोठतात, काळी पडतात आणि खाण्यास अयोग्य होतात.
फडणीस, ना. अ.
कीड : केळीवर मुळावरील सोंडे (कॉस्मॉपोलायटिस सॉर्डिडस), पाने खाणाऱ्या अळ्या, मावा (पेंटोलोमिया मायग्रो नर्व्होसा) वगैरे कीटकांचा किरकोळ उपद्रव होतो.
दोरगे, सं. कृ.
रोग :मर:फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम प्रभेद क्युबेन्स या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) होणाऱ्या रोगामुळे पनामातील केळींचा संपूर्णपणे नाश झाल्याने त्याला पनामा रोग म्हणतात. भारतात तमिळनाडू, महाराष्ट्र व पश्चिम बंगालमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. या रोगामुळे जून पानावर पिवळ्या रेषा दिसतात व नंतर पाने मलूल होऊन देठापासून कोलमडतात व नुसते खोडच उभे राहते. खोडावरही लांब काळ्या रेषा दिसतात. खोड कापल्यास वाहकवृंद (अन्नरसाची व पाण्याची ने-आण करणारे पेशीसमूह) काळसर झालेले आढळतात. कवकाचे विश्राम बीजाणू (लाक्षणिक प्रजोत्पादक अंगे) जमिनीत जिवंत राहतात. खोडास सूत्रकृमी अथवा अन्य कारणामुळे होणाऱ्या इजेमधून कवकाचा खोडात प्रवेश होतो. सोनकेळ व तत्सम वाण रोगास बळी पडतात. बसराई वाण प्रतिकारक आढळले आहे. तेच रोग निवारण्यासाठी लावतात.
(बंची टॉप). या रोगाचा प्रादुर्भाव केरळात १९०४ सालापासून आढळून येत आहे. तो श्रीलंकेमधून रोगट खुंट आणून लावल्याने झालेला आहे. हा रोग व्हायरसामुळे (अतिसूक्ष्मजीवामुळे) होतो. त्याच्यामुळे झाडाच्या शेंड्यावर अनेक लहान, खुजी, पिवळसर पाने गुच्छासारखी ताठ येतात. रोगट झाडे खुजी होतात, त्यांना घड येत नाहीत. रोगप्रसार माव्याद्वारा होतो म्हणून बागेतील निरोगी झाडांवर कीटकनाशकांचा वेळावेळी
फवारा मारतात. रोगग्रस्त बागेतील खुंट लागवडीसाठी वापरीत नाहीत.
मोझेक : केळीवर मोझेक हाही एक व्हायरसजन्य रोग पडत असून त्यामुळे पानांवर गर्द हिरवे चट्टे दिसतात. यावर उपाय केळीच्या पर्णगुच्छ रोगाप्रमाणे. रोगग्रस्त बागेतील बेणे लागवडीकरीता वापरीत नाहीत. वेळोवेळी रोगट झाडे खणून काढून बाग रोगमुक्त करतात.
करपा : हा रोग ग्लिओस्पोरियम म्यूझॅरम या कवकामुळे होतो.
पर्णडाग : हा सर्कोस्पोरा म्यूझी या कवकामुळे होतो. करपा व पर्णडाग रोगावर उपाय म्हणून ताम्रयुक्त कवकनाशके वेळोवेळी फवारतात. (चित्रपत्र १९).
कुलकर्णी, य. स.
संदर्भ : 1. Haarer, A. E. Modern Banana Production, London, 1964.
2. Hayes, W. B. Fruit Growing in India, Allahabad, 1960.
3. Sham Singh; Krishnamurthi, S.; Katyal, S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.
4. Simmonds, N. W. Bananas, New York, 1959.
5. Von Loesecke, H. W. Bananas: Chemistry, Physiology, Technology, New York, 1959.
6. Wardlaw, C. W. diseases of Bananas, New York, 1961.
|
मुनव |
|
---|---|---|
|
|
अंतिम सुधारित : 10/7/2020
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...