करवंद हे काटेरी व सदापर्णी झुडूप अॅपोसायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅरिसा करंडास असे आहे. ते भारतातील वनांत विशेषत: शु्ष्क व खडकाळ भागांत आढळते. याशिवाय श्रीलंका, जावा, तिमोर येथेही ते आढळते. याची उंची सु. २ मी. पर्यंत असते. खोड आखूड असून फांद्या व लांब काटे द्विभक्त असतात. पाने साधी, समोरासमोर, लंबगोल, चिवट, गुळगुळीत आणि चकचकीत दिसतात. फूल किंवा फळ तोडल्यास पांढरा चीक येतो. फुले पांढरी, अपछत्राकृती व लवदार असतात.
एप्रिल-मे महिन्यात करवंदाला फळे येतात. फळे हिरवी, लंबगोल, मृदू व गोटीसारखी असून पिकल्यावर जांभळट काळी होतात. ही फळे चवीला आंबट-गोड असतात. फळात बहुधा चार बिया असतात.
करवंदाचे कच्चे फळ स्कर्व्हीनाशक तसेच स्तंभक आहे. पिकलेली फळे शीतकारक व भूक वाढविणारी असतात. मूळ कडू व कृमिनाशक आहे. पाळीच्या तापावर पानांचा काढा गुणकारी ठरतो, असे आयुर्वेदात वर्णन आहे. करवंदाच्या कच्च्या फळांपासून लोणचे तयार करतात. लाकूड कठीण व गुळगुळीत असते. त्यापासून चमचे, फण्या व इतर कातीव वस्तू तयार करतात.
स्त्रोत - कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय प...
ज्वर, पटकी, कुष्ठ, संधिवात इत्यादींवर हे गुणकारी अ...
भोकर ही वनस्पती भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान...
चीक मूळव्याध व अतिसार यांवर गुणकारी आहे