करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय पीक असून, मुख्यतः कुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते. झाडाच्या फांद्यांना काटे असल्यामुळे गुरे खात नाहीत. करवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. ते हलक्या, मुरमाड, तसेच कातळ असलेल्या जमिनीतही चांगले येते. बियांपासून रोपे तयार करून अभिवृद्धी करता येत असली तरी इच्छित प्रकारच्या जाती, प्रकाराची अभिवृद्धीसाठी गुटी किंवा जून फांद्यांच्या छाट कलमांद्वारा करणे चांगले असते.
करवंदाच्या जाती फळाच्या आणि गराच्या रंगावरून ठरविल्या जातात. विद्यापीठाने "कोकण बोल्ड' नावाची नवीन जात प्रसारित केली आहे. या जातीची फळे मोठी (12-16 ग्रॅम) व घोसाने लागतात, तसेच फळाची प्रत उत्कृष्ट आहे. फळे गोलाकार असून, गराचे प्रमाण 92 टक्के आहे. फळांचा टिकाऊपणा (चार दिवस) चांगला आहे. फळे गडद काळ्या रंगाची असून, त्यात 361 मिली ग्रॅम "क' जीवनसत्त्व प्रति 100 ग्रॅम गरात आहे. फळातील बिया मृदू असून, चावून खाता येतात. कच्च्या व पक्व फळांपासून विविध प्रक्रिया केलेले टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.
कुंपणासाठी लागवड करताना दोन रोपांतील अंतर 90 ते 150 सेंमी ठेवावे, सलग लागवड करताना तीन ते चार मीटर अंतरांवर कलमे लावून लागवड करावी, लागवड केल्यावर कलमांना आधार द्यावा. लागवडीसाठी एप्रिल-मे महिन्यात 45 x 45 x 45 सेंमी आकाराचे खड्डे खणून माती, चांगले कुजलेले शेणखत (दोन किलो) आणि 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर भरून ठेवावे. कलम लावल्यानंतर हिवाळ्यात 15 दिवसांच्या अंतराने व उन्हाळ्यात आठवड्याच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या लागवडीच्या पहिल्या वर्षी द्याव्यात म्हणजे कलमांची वाढ जोमदारपणे होईल व कलमांचे जगण्याचे प्रमाण वाढेल. प्रति कलमास सुमारे 20 लिटर पाणी प्रत्येक पाळीस द्यावे. दुसऱ्या वर्षापासून कलमास पाणी देण्याची आवश्यकता नाही.
कलमाच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी चौथ्या वर्षापासून प्रत्येक कलमास ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात 25 किलो शेणखत, 100 ग्रॅम युरिया आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खत घालावे. फुले व फळधारणा लवकर होण्यासाठी खताच्या रिंगामध्ये 10 ते 15 लिटर गोमूत्र जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दोन ते तीन वेळा ओतावे. कलमांच्या सभोवती तणांची वाढ होऊ नये म्हणून 15 सेंमी जाडीचे पालापाचोळ्याचे आच्छादन द्यावे. पाचव्या वर्षापासून दर वर्षी फळे काढणीनंतर मे-जून महिन्यात फांद्यांची छाटणी करावी.
संपर्क - 02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...