अननस लागवडीसाठी क्यू, क्वीन या बिगरकाट्याच्या जाती आहेत. फळे साधारणतः 1.5 ते 2.5 किलो वजनाची असतात. या जातीच्या फळांवरील डोळे खोलवर गेलेले नसतात. या जाती प्रक्रिया उद्योगासाठी चांगल्या असून, व्यापारीदृष्ट्या लागवडीसाठी योग्य आहेत. याचबरोबरीने जायंट क्यू, मॉरिशिअस या जातीसुद्धा लागवडीसाठी वापरल्या जातात.
लागवड करताना जमीन चांगली नांगरून, कुळवून 30 ते 40 सें.मी. खोल भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. या पिकाची लागवड ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात चरात केली जाते. त्यासाठी 30 सें.मी. खोलीचे, तीन ते चार मीटर लांब चर तयार करावेत. दोन चरांतील अंतर 90 सें.मी. ठेवावे. चरातील दोन रांगांतील अंतर 60 सें.मी. ठेवावे. दोन झाडांतील अंतर 15 सें.मी. ठेवावे. विरळ लागवडीमध्ये 30 ते 45 सें.मी.पर्यंत ठेवावे. लागवड जवळ केल्यास लहान आकाराची फळे मिळतात.
लागवड करताना झाडाच्या आतील पोंग्यांत माती जाणार नाही याची काळजी घ्यावी. हे पीक बागायती असल्याने कोकणपट्टीत नारळाच्या बागेत लागवड करता येते. अननसाची लागवड फुटवे, फळाचा मूळ दांडा व पाने यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. फुटवे वापरून लागवड केल्यास 18 ते 22 महिन्यांत फळे तयार होतात. फळाखालील कोंब व फळावरील पानाच्या शेंड्याचा वापर लागवडीसाठी केल्यास फळे अनुक्रमे 22 ते 24 महिन्यांत तयार होतात. लागवड करताना रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत. अति पावसात लागवड करू नये.
खते
प्रत्येक रोपाला 12 ग्रॅम नत्र, सहा ग्रॅम स्फुरद, 12 ग्रॅम पालाश या प्रमाणात दोन ते तीन हप्त्यांत खते द्यावीत. पहिला हप्ता लागवडीनंतर तीन महिन्यांनी द्यावा व शेवटचा हप्ता एक वर्षाच्या आत द्यावा. हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांनी व उन्हाळ्यात सहा दिवसांनी जमिनीच्या मगदुरानुसार पाणीपुरवठा करावा. पावसाळ्यात चरात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाला अधूनमधून भर द्यावी.
खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर देणे गरजेचे आहे. चरामध्ये वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे. एप्रिल-मे महिन्यात फळे काढणीस येतात. अननसाचे खोडवा पीक घेता येते. मुख्य पीक तयार होण्यासाठी 20 ते 24 महिन्यांचा कालावधी लागतो, तर खोडवा पीक तयार होण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी लागतो. खोडव्याचे उत्पादन मुख्य पिकाच्या निम्मे येते. फळांच्या काढणीनंतर एक जोमदार फुटवा ठेवून बाकीचे फुटवे व मूळ झाड काढून टाकावे. खोडवा पिकास शिफारशीप्रमाणे खते द्यावीत. फळे पूर्ण तयार झाल्यावर, फळाच्या खालचे एक व दोन ओळींतील डोळे पिवळे झाल्यानंतर फळे दांड्यासह कापून काढावीत. फळाला इजा करू नये.
महेंद्र काटे, महाड, जि. रायगड
- 02358 - 280238 कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,
दापोली, जि. रत्नागिरी
माहिती संदर्भ :
अॅग्रोवन