অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तणांचे एकात्मिक नियंत्रण

शेतीत कीटक व रोगांव्यतिरिक्त तणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पीक उत्पादनात नैसर्गिक घटकांमुळे येणारी घट लक्षात घेता सर्वाधिक घट ही पिकांबरोबर वाढणाऱ्या तणांमुळे येते. विविध पिकांच्या सुरवातीच्या वाढीचा कालावधी पीक तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनक्षम असतो. या कालावधीत तणनियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. एकात्मीक पद्धतीतून तणनियंत्रण प्रभावीपणे करता येते.
कमी होत चाललेले मजूर बळ, त्यांचे वाढते दर, अनियमित पाऊसकाळ, आंतरमशागतीस मिळणारा कमी वेळ किंवा विविध कारणांमुळे वेळेवर तणनियंत्रण करणे अलीकडील काळांत शेतकऱ्यांना अशक्‍य होत आहे. बहुवार्षिक उदा. हराळी, कुंदा, नागरमोथा आदी तणांचे प्रभावी नियंत्रण करणे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरते. सध्याच्या परिस्थितीत एकात्मिक तणनियंत्रण व्यवस्थापनाला म्हणूनच महत्त्व आले आहे. सध्या खरीप मध्यावर आहे;तर रब्बी हंगाम जवळ येत आहे. त्यामुळे या रब्बीसाठी अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येण्याच्या दृष्टीने या लेखातील माहिती उपयुक्त ठरेल.
रब्बी हंगामातील तणे- ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल, भाजीपाला आदी पिकांमध्ये चंदन बटवा, चांदवेल, रानमोहरी, गाजर गवत, पाथर, पिसोळा, पिवळा धोत्रा, रानएरंडी इ. द्विदल तणे;तर हराळी, कुंदा, नागरमोथा, शिप्पी, लोना, भरड, घोड कातरा इ. एकदल तणे आढळून येतात.

एकात्मिक तण नियंत्रणाचे उपाय

तणनियंत्रण दोन प्रकारे करता येते.
1) प्रतिबंधात्मक उपाय, 2) निवारणात्मक उपाय.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे शेतात तणांची कमीत कमी उगवण होईल याकडे लक्ष देणे;म्हणजेच पुढील प्रसारास आळा कसा बसेल याची खबरदारी घेणे होय.
1) पेरणीसाठी वापरावयाचे बियाणे तणविरहित असावे.
2) पाण्याचे पाट, शेतातील बांध किंवा धुरे, कंपोस्टचे खड्डे इ. जवळ तणे उगवू देऊ नयेत व उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावेत.
3) पूर्ण कुजलेलेच शेणखत किंवा कंपोस्ट वापरावे.
4) पीक पेरणीपूर्वी उगवलेली तणे वखराने काढून टाकावीत.
5) सतत स्वच्छता मोहीम राबवावी.
6) शक्‍य असल्यास आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

निवारणात्मक उपाय

अ) मशागतीय/ पीकनियोजन पद्धत - यामध्ये योग्य मशागत, वेळेवर व योग्य खोली व अंतरावर पेरणी करणे, खतांची योग्य मात्रा योग्य पद्धतीने देणे, हेक्‍टरी योग्य रोपांची संख्या राखणे, नेमके पाणीव्यवस्थापन व निचरा पद्धतीचा वापर करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, कीड व रोगनियंत्रण यांचा समावेश होतो.
ब) कायिक/ यांत्रिक पद्धत - यामध्ये मानवी, पशुधन किंवा यांत्रिक शक्तीचा वापर करून तणांना शेतातून काढून टाकतात किंवा नष्ट करतात. उदा. यात खुरपणी, कोळपणी यांचा प्रामुख्याने समावेश होतो;तसेच खंदणी, तण उपटणे, छाटणी, जाळणे इत्यादींचाही त्यात समावेश होतो.
क) जीव जिवाणूंचा वापर - कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही तणनियंत्रण करता येते. उदा. गाजरगवताचे नियंत्रण मेक्‍सिकन भुंगे वापरून करता येते किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा गवत घेऊन त्याच्या वाढीवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येते.
ड) रासायनिक पद्धत - यामध्ये तणांना समूळ नष्ट करणारी निवडक व बिननिवडक रासायनिक द्रव्ये म्हणजेच तणनाशकांचा वापर करून तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते.

तणनाशके वापरताना घ्यावयाची दक्षता

1) विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत अचूकपणे वापरावीत.
2) मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत. तणनाशके खरेदी करताना याची काळजी घ्यावी.
3) तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा नॅपसॅक पंप वापरावा.
4) तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
5) तणनाशके ही नेहमी जोराचे वारे नसताना;तसेच फवारल्यानंतर दोन-तीन तास स्वच्छ सूर्यप्रकाश राहील आणि पाऊस न येण्याची शक्‍यता पाहूनच फवारावीत.
6) फवारा जमिनीवर मारताना फवारा मारणाऱ्याने मागे मागे सरकत जावे जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडत नाहीत.
7) ग्लायफोसेटसारखे बिनानिवडक तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 21 दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.
9) तणनाशकांची फवारणी सर्वत्र समान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
10) उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना फवारा त्या किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी हूडचा वापर करावा.
11) तणनियंत्रणासाठी परिस्थितीनुसारच तणनाशकांचा शिफारशीनुसार वापर करावा. त्याच्या वारंवार वापराचा अतिरेक टाळावा किंवा तणनाशके फवारलेल्या जमिनीत दर वर्षी शेणखत/ कंपोस्ट खत/ गांडुळ खतांचा वापर करावा.


स्त्रोत- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate