অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंबा विक्री व्यवस्थापन

राज्यात मागील काही वर्षांत फळपिकांच्या क्षेत्रातील बदलाची पाहणी करता आंबा फळपिकाच्या क्षेत्रात होणारी वाढ उल्लेखनीय आहे. त्यादृष्टीने उत्पादनवाढीबरोबरच विक्री व्यवस्थापनही यो ग्य प्रकारे व्हायला पाहिजे. निर्यातीतून परकीय चलन मिळविण्याच्या हेतूने इंग्लंड, सौदी अरे बिया, अरब अमिरातसारख्या चांगला दर देणाऱ्या देशांना जास्त निर्यात करण्याची गरज आहे. हे गणित समजण्यासाठी विक्रीचे पणन मार्ग, निर्यात आणि निर्यातीमधील आव्हानांविषयी माहिती करून घ्यायला हवी.

डॉ. दादाभाऊ यादव, डॉ. हनुमंत शिंदे

आंब्याचा उत्पादन खर्च तुलनेने कमी असून, त्यास मिळणारी किंमत उत्पादन खर्चाच्या जवळ जवळ दुप्पट असते. त्यामुळे तृणधान्ये, कडधान्यांच्या तुलनेत अधिक उत्पादन देण्याची क्षमता या फळपिकात आहे. देशाचे आंबा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनातील सन 1990-91 च्या तुलनेतील प्रगती तक्ता क्र. 1 मध्ये दाखविली आहे.देशातील आंबा फळपिकाखालील क्षेत्र व उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. क्षेत्राचा विचार करता 1991-92 मध्ये असलेले क्षेत्र 10.77 लाख हेक्‍टरवरून 2008-09 मध्ये 23.09 लाख हेक्‍टर झाल्याचे निदर्शनास येते, तर उत्पादन हे 1991-92 च्या तुलनेत दीडपट अधिक वाढल्याचे आढळते, मात्र निसर्गाची अनिश्‍चितता, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या संकटामुळे उत्पादकता कमी जास्त होताना दिसते.

देशातील एकूण आंबा पिकाखालील क्षेत्रापैकी 2009 या वर्षातील उपलब्ध आकडेवारीनुसार देशाच्या 19.79 टक्के क्षेत्र महाराष्ट्रात असले तरी उत्पादन मात्र देशातील एकूण उत्पादनाच्या 5.59 टक्के इतके कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे निसर्गाचा लहरीपणा व कमी उत्पादकता हे होय.

विक्री व्यवस्थापन


शेतीमध्ये उत्पादित झालेला माल ग्राहकांपर्यंत पोचविण्याच्या प्रक्रियेस बाजार अथवा विक्री व्यवस्था असे म्हणता येईल. त्यामध्ये उत्पादक, मध्यस्थ, हुंडेकरी, कमिशन एजंट, व्यापारी व ग्राहक यांचा समावेश होतो, तर बाजारसेवांमध्ये मालाचे एकत्रीकरण, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक, साठवणूक, प्रक्रिया, प्रीकुलिंग, विक्री यांचा समावेश होतो.

विक्रीचे पणन मार्ग


बागेत उत्पादित झालेला आंबा ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी विविध पणन मार्गाचा वापर केला जातो. त्यापैकी प्रमुख पणन मार्ग खालीलप्रमाणे : 1) उत्पादक - ग्राहक, 2) उत्पादक - किरकोळ विक्रेता - ग्राहक, 3) उत्पादक - काढणीपूर्व कंत्राटदार - घाऊक विक्रेता - किरकोळ विक्रेता - ग्राहक, 4) उत्पादक - निर्यातदार - परदेशातील ग्राहक. 5) उत्पादक - घाऊक विक्रेता - प्रक्रिया उद्योग - किरकोळ विक्रेता - ग्राहक

विक्री व्यवस्थेची कार्यक्षमता ही उत्पादक व ग्राहक यांच्या दरम्यान असणाऱ्या मध्यस्थांच्या स ंख्येवर अवलंबून असल्याने जेवढे मध्यस्थ कमी, तेवढी विपणनक्षमता अधिक कार्यक्षम स मजली जाते, कारण अशा वेळी ग्राहकांच्या किमतीमधील उत्पादकाचा वाटा जास्तीत जास्त असतो.

आवक व किमती


आंब्याच्या मालाची देशातील निवडक बाजारपेठेतील आवक व त्यानुसार ठरणाऱ्या किमती या तक्ता क्र. 3 मध्ये दर्शविल्या आहेत.
देशातील प्रमुख बाजारपेठांमधील आंब्याची आवक व किमती यांच्या अभ्यासावरून असे निदर्शनास येते, की आंब्याला सर्वाधिक किंमत ही पुणे बाजारपेठेत मिळाली आहे. तर मे महिन्यात सर्वच बाजारपेठांमध्ये आंब्याची आवक ही सर्वाधिक नोंदविण्यात आली आहे.

निर्यात


देशातून होणाऱ्या निर्यातीचा तपशील तक्ता क्र. 4 मध्ये दिला आहे. देशातून अरब अमिरात, बा ंगलादेश, इंग्लंड, सौदी अरेबिया, नेपाळ इ. देशांना आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. निर्यातीपैकी आकारमान व मूल्यानुसार सर्वाधिक निर्यात अरब अमिरात या देशाला होते व ती एकूण निर्यातीच्या जवळ जवळ 50 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे; मात्र आंब्याला परकीय बाजारपेठेत मिळालेला दर हा इंग्लंड या बाजारपेठेत सर्वाधिक (रु. 55520/ मे. टन) प्राप्त झाला आहे, तर सर्वांत कमी दर नेपाळ या देशाला झालेल्या निर्यातीतून प्राप्त झाला आहे. परकीय चलन मिळविण्याच्या दृष्टिकोनातून इंग्लंड, सौदी अरेबिया, अरब अमिरात यांसारख्या चांगला भाव देणाऱ्या देशांना जास्तीत जास्त निर्यात करण्याची गरज आहे.

उत्पादन व निर्यातीमधील प्रमुख आव्हाने

हवामानात वारंवार होणारे बदल, त्यामुळे होणारी फळगळती व रोग किडींचा प्रादुर्भाव, आधु निक व कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अभाव हे उत्पादन वाढीसाठीचे प्रमुख अडसर आहेत. यामुळे निर्यातीसाठी चांगल्या गुणवत्तायुक्त मालाची निर्मिती होत नाही. याशिवाय अनियंत्रित पुरवठा, आधुनिक साठवण गृहांचा व तंत्रज्ञानाचा अभाव, प्रक्रियायुक्त उत्पादनाचा अभाव, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहतूक, हाताळणी, प्रमाणीकरण सुविधांचा अभाव यामुळे मालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते व परिणामी त्याचा फटका उत्पादकांना बसतो.

निर्यातीत वृद्धी करावयाची असेल तर या बाबतीत सुधारणा करणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आंबा काढणीपश्‍चात अधिक काळ टिकून राहत नसल्याने त्याची साठवणुकीच्या व काढणीपश्‍चात प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या साह्याने विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच बंद अवस्थेतील निर्यातीच्या पायाभूत सुविधांच्या अडचणी दूर करणे गरजेचे आहे. केवळ उत्पादन तंत्रात बदल न करता त्याच्या विपणनातही सुधारणा आवश्‍यक आहेत. योग्यवेळी काढणी, शास्त्रोक्त पद्धतीने प्रतवारी, मूल्यवर्धनासाठी प्रक्रियायुक्त उत्पादनाला चालना देणे गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून देशातील आंबा निर्यातीमध्ये वृद्धी व्हावी, याकरिता आवश्‍यक सोयी-सुविधा व एकात्मिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याने अपेडा संस्थेमार्फत आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील आंबा उत्पादन क्षेत्रात आंबा कृषी निर्यात क्षेत्र स्थापन करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात हापूस आंब्यासाठी कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी व ठाणे या जिल्ह्यांना, तर केशर आंब्यासाठी औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, लातूर व नाशिक या जिल्ह्यांना कृषी निर्यात क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.


डॉ. दादाभाऊ यादव, डॉ. हनुमंत शिंदे - 02426 - 243236
(लेखक कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate