सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा वापर करीत बुलडाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा) येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन जवळपास दुपटीने वाढवण्यात यश मिळवले आहे. कृषी विभागाच्या प्रकल्पाचा लाभ घेत गटशेतीतून साकारलेला हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ गावात कपाशी व सोयाबीन ही मुख्य पिके घेतली जातात. कपीला नदीवर लघू सिंचन प्रकल्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात भुईमुगासारखे पीक घेणे शक्य होते. मात्र या पिकाचे अर्थशास्त्र मात्र समाधानकारक नव्हते. याचे कारण म्हणजे एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंतच उत्पादन त्यांना मिळायचे. काळानुरूप पीक तंत्रज्ञानात बदल करण्याची त्यांची धडपड सुरू झाली. त्यासाठी समूहाने एक होणे गरजेचे होते.
त्या दृष्टीने गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आनंदस्वामी शेतकरी गटाची स्थापना केली. पुरुषोत्तम गायके गटाचे अध्यक्ष आहेत. पदवीधर असलेल्या पुरुषोत्तम यांनी या माध्यमातून गावातील युवकांची फळी उभारली. गटात 25 जणांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या गळीत धान्य विकास कार्यक्रमाची मदत या शेतकऱ्यांना झाली. सन 2013-14 या वर्षात 100 हेक्टर क्षेत्रावर राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमात गटातील सर्वांनी म्हणजे 25 जणांनी सहभाग नोंदवला.
कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना 1800 रुपये प्रति बॅग (वीस किलोची) बियाणे देण्यात आले. खते, सूक्ष्म मूल्यद्रव्ये, पीएसबी, रायझोबियम आदी निविष्ठाही देण्यात आल्या. कार्यक्रमात पॉली मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर होता. गटातील सर्व जणांनी या तंत्राचा फायदा घेतला.
पूर्वी गटातील शेतकरी सलग पद्धतीने पेरणी करायचे. आता गादी वाफ्यावर लागवड करण्याचे ठरवण्यात आले. प्रत्येकाचे सरासरी क्षेत्र दीड एकर होते. शेतकऱ्यांना बैलचलित "बेडमेकर'चा पुरवठा विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमातून करण्यात आला होता, परंतु लागवड क्षेत्र मोठे असल्याने ट्रॅक्टरचलित बेडमेकरचाही वापर झाला. एक मीटर रुंदीचे गादी वाफे उभारून त्यावर मल्चिंग पसरवण्यात आले. मल्चिंग पेपरला छिद्र पाडण्यासाठी संयंत्र स्थानिक पातळीवर तयार करण्यात आले. पूर्वी दोन ओळींतील अंतर एक फुटापर्यंत असायचे. आता ते नऊ इंच ठेवण्यात आले. पूर्वीच्या एकरी 55 ते 60 हजार झाडांची संख्या आता 80 हजार झाडांपर्यंत पोचली. गटातील बहुतांश शेतकरी पूर्वी टीएजी 24 हे बियाणे वापरायचे. सुधारित प्रयोगातही हाच वाण ठेवण्यात आला. गटातील काहींनी मात्र हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्थेने विकसित केलेल्या आयसीजीव्ही 91114 या वाणाचा वापर केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतशील भुईमूग उत्पादक कृषिभूषण जयकुमार गुंडे यांनी गटातील शेतकऱ्यांच्या शेताला दिलेली भेट महत्त्वाची ठरली. त्यांनी भुईमूग पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अर्थात मागील वर्षी पुणे येथील एका कृषी प्रदर्शनातच गुंडे यांच्यासोबत या शेतकऱ्यांनी बैठकही घेतली होती. त्यामुळे त्यांच्याशी दृढ परिचय होण्यास मदत झाली.
गादी वाफा पद्धत, लागवडीचे सुधारित अंतर, खतांच्या शिफारशिीप्रमाणे मात्रा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी बाबींमधून एकरी उत्पादन वाढण्यास मदत झाली. गटातील सुमारे 60 टक्के शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाचे एकरी 18 ते 19 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. पूर्वीच्या तुलनेत हे उत्पादन दुपटीने अधिक होते. गावासाठी ही वाढ महत्त्वाची होती.
गटाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गायके म्हणाले, की गेल्या वर्षी खरे तर भुईमुगाला चार हजार रुपये प्रति क्विंटलचा दर गतवर्षी होता. या वर्षी खामगाव (जि. बुलडाणा) बाजारात भुईमुगाची विक्रमी आवक झाली. त्यामुळे दरात घसरण दिसली. हे दर 3100 ते 3200 रुपयांवर आले. परंतु एकरी उत्पादकता वाढल्याने दरातील घसरणीचा प्रतिकूल परिणाम तेवढा जाणवला नाही. 18 क्विंटल भुईमुगापासून सुमारे 55 हजार 800 रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकरी 16 हजार रुपयांचा खर्च वजा जाता 39,800 रुपयांचा नफा झाला. पारंपरिक पद्धतीच्या आठ क्विंटल उत्पादनापासून एकूण उत्पन्न केवळ 24 हजार 800 रुपये मिळाले असते.
शिवणी- अरमाळ हे तालुक्यापासून 40 किलोमीटरवरील आडवळणावरचे गाव. त्यामुळे गावात वृत्तपत्र पोचण्यात अडचणी येतात. मात्र इच्छाशक्तीच्या बळावर येथील शेतकरी इंटरनेटवर ऍग्रोवन वाचन करण्याचा प्रयत्न करतात.
पुरुषोत्तम गायकी यांच्या संगणकामुळे हे शक्य झाले आहे.
गावातील शेतकऱ्यांनी मोबाईलवरून कृषिपंप चालू- बंद करण्याची यंत्रणा कार्यान्वित करून घेतली आहे. त्यावर साडेचार हजार रुपयांचा खर्च होतो. पूर्वी या कामासाठी दुचाकीवरून शेतात यावे लागे. त्यामुळे इंधन खर्च व्हायचा. आता त्या खर्चाबरोबर वेळ आणि श्रमही वाचण्यास मदत झाली. असे छोटे बदलदेखील शेतकऱ्यांच्या विकासाचे स्रोत होत आहेत.
भुईमूग पिकासाठी बेड करण्यासाठी बैलचलित बेडमेकरचा वापर करण्यात आला. मल्चिंगवर छिद्रे पाडण्यासाठी लागणारे संयंत्र मी कल्पकतेतून तयार केले. एका वर्कशॉपमधून ते तयार करून घेतले. त्याचा वापर इतर शेतकऱ्यांनी केला. एकरभर क्षेत्रावर माझी लागवड होती. 60 किलो बियाणे वापरले. उत्पादन 18 क्विंटल मिळाले.
- कैलास नागरे
9049816090
एक एकर क्षेत्रावर मी इक्रिसॅट पद्धतीने लागवड केली होती. एकरी 17 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले.
दीपक गायके
9404549064
संवादाच्या माध्यमातून एकमेकांकडून पीक व्यवस्थापनविषयक बारकावे जाणून घेण्यावर आमचा भर राहिला. आमच्या गटाचे विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बॅंकेत खाते उघडण्यात आले आहे. बचतीच्या बळावर भविष्यात प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार आहे.
- ज्ञानेश्वर गायके
9764047756
संपर्क - पुरुषोत्तम गायके - 9767928742
---------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस हे आपले प्रमुख नगदी पीक असून करार शेती असल्याने...
उत्पादनसंस्थेला वस्तूचे उत्पादन करण्यासाठी निरनिरा...
अभ्यास, ज्ञान मिळवण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि...
भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, बिया वेगवेगळया जीवनोप...