खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील अण्णासो कुरुंदवाडे यांनी केळी पिकाला दोन्ही बाजूस लॅटरल अंथरूण पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. दर्जेदार रोपांची निवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, विद्राव्य खतांचा योग्य वापर आणि वेळीच रोग नियंत्रणामुळे त्यांना केळीचे चांगले उत्पादन मिळाले आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर असणारं खिद्रापूर (ता. शिरोळ) हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील केळीच्या उत्पादनात "मिनी जळगाव' म्हणून ओळखलं जातं. सन 2005 पूर्वी गावच्या एकूण क्षेत्राच्या सुमारे सत्तर टक्के क्षेत्रावर केळीची लागवड असायची. या गावच्या तिन्ही बाजूस कृष्णा नदी आहे, त्यामुळे या गावाला पाण्याची फारशी टंचाई नाही; पण 2005 ला मात्र चित्र बदलले. या वर्षी आलेल्या महापुरात केळीचे प्रचंड नुकसान झाले. पण, त्यानंतर हळूहळू गाव सावरू लागले. 2005 नंतर दोन ते तीन वर्षे महापुराच्या भीतीने कोणीच केळी घेतली नाही; पण गेल्या दोन वर्षांपासून हे गाव पुन्हा केळीच्या नकाशावर येत आहे. याच गावातील अण्णासो कुरुंदवाडे या प्रयोगशील शेतकऱ्याने यंदा सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून केळीचे चांगले उत्पादन घेतले आहे. केळी पिकाला एका बाजूलाच ठिबकची लॅटरल करण्याऐवजी रोपांच्या दोन्ही बाजूस लॅटरल अंथरूण पाणी आणि विद्राव्य खतांचे योग्य नियोजन त्यांनी केले. दर्जेदार रोपांची निवड, सेंद्रिय खतांचा वापर, पाणी आणि विद्राव्य खतांचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य नियोजन केल्यामुळे झाडांची चांगली वाढ होऊन एकसारख्या घडांचे त्यांना उत्पादन मिळत आहे. केळीची प्रतही चांगली आहे.
नावीन्यपूर्ण बदल स्वीकारले
केवळ सातवी शिकलेले अण्णासो यांनी अनुभव आणि बाजारपेठेच्या अभ्यासातून संपूर्ण शेतीचे नियोजन केले आहे. त्यांची सात एकर शेती आहे. यामध्ये चार एकर ऊस, एक एकर केळी आणि दोन एकर ढोबळी मिरचीची लागवड आहे. गरजेनुसार पीक व्यवस्थापनात बदल आत्मसात केले. सन 1990 पासून ते केळीचे उत्पादन घेत असून, दरवर्षी एक ते दीड एकर क्षेत्रात केळी लागवड असते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत केळीला पाटपाण्यानेच नियोजन होते. पाटपाण्याने घेतलेल्या केळीचे उत्पादन एकरी 30 टन इतके होते. यंदाच्या वर्षी मात्र त्यांनी केळीला ठिबक सिंचन केले. त्यांच्याकडे नदीवरून पाणीपुरवठा करणारा दहा अश्वशक्तीचा विद्युत उपसा पंप आहे, तर ठिबकला उपसा करणारा विद्युत उपसा पंप सात अश्वशक्तीचा आहे. दोन्ही विद्युत पाणी उपसा पंपांचा समन्वय राहावा या उद्देशाने त्यांनी केळी पिकाला डबल लॅटरलचा पर्याय निवडला. गरजेतून आलेल्या या पर्यायाचा त्यांना इतर ठिकाणीही फायदा झाला. झाड तसेच घडांची एकसारखी वाढ झाली, त्यामुळे दरही चांगला मिळतो आहे. झाडे पडू नयेत यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्लॅस्टिकच्या पट्ट्यांचा त्यांनी वापर केला.
केळी लागवडीबाबत कुरुंदवाडे म्हणाले, की मी लागवडीसाठी ग्रॅंड नैन जातीची रोपे निवडली आहेत. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून चार फुटांच्या अंतराने सऱ्या पाडल्या. लागवड करताना एक आड एक सरीमध्ये लागवडीचे नियोजन केले. दोन रोपांत चार फूट अंतर ठेवून गेल्यावर्षी 22 मे रोजी लागवड केली. अशा पद्धतीने दोन रोपांतील अंतर चार फूट तर दोन ओळींतील अंतर आठ फूट असे आहे. लागवडीच्या योग्य आकाराचा खड्डा करून त्यामध्ये सेंद्रिय खत, निंबोळी पेंड, करंज पेंडीचे मिश्रण मातीत मिसळून त्यानंतर रोप लावले. एकरी 100 किलो सेंद्रिय खत, 100 किलो निंबोळी पेंड आणि 100 किलो करंज पेंड लागली. एकरी 1500 रोपे लागली. यंदाच्या वर्षी पाण्याचे नियोजन करताना ठिबकच्या लॅटरल मांडणीत बदल केला. दुहेरी लॅटरल पद्धतीचा अवलंब केला. सिंगल लॅटरल पद्धत असती तर दररोज एक तास पाणी द्यावे लागले असते; पण दुहेरी लॅटरल पद्धतीने दररोज अर्धा तास पाणी दिले, यामुळे वेळेची बचत झाली. पहिले दोन महिने सिंगल लॅटरल पद्धतीने पाणी दिले, त्यानंतर दोन्ही बाजूंनी लॅटरल पद्धतीने पाणी आणि विद्राव्य खते देत आहे. केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. या रोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मी तज्ज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशकांची फवारणी करतो.
केळी पिकाला तज्ज्ञांच्या सल्ल्याने 12ः61ः0, 13ः0ः45, 0ः0ः50, पांढरे पोटॅश आणि गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. केळी वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांची मात्रा तज्ज्ञांच्या सल्ल्याने बदलली, त्यामुळे खतांचा योग्य वापर झाला. खर्चात बचत झाली. वाढीच्या अवस्थेनुसार खते मिळाल्याने झाडांची तसेच घडांची चांगली वाढ झाली. डबल लॅटरल केल्यामुळे मुळांच्या दोन्ही बाजूंनी पाणी मिळाल्याने झाडांचा आकार, घडांचा आकार यामध्ये एकसारखी वाढ झाली, मनुष्यबळात चाळीस टक्के बचत झाली. चांगल्या वाढीमुळे एकरी दहा ते पंधरा टनांपर्यंत वाढ मिळाली. ठिबक सिंचन संच पुढे पाच ते सहा वर्षे चालणार आहे, त्यामुळे ही गुंतवणूक पुढील पिकांना फायदेशीर ठरणार आहे. 15 जूनपर्यंत केळीची काढणी संपणार आहे. मी केळीचा खोडवा ठेवणार आहे. घडाच्या पक्वतेनुसार केळी घडांची काढणी केली जाते. एक घड पस्तीस ते चाळीस किलो इतक्या वजनाचा आहे. केळी काढल्यानंतर व्यापारी लगेचच वजनानुसार शेतावरच पैसे देतात. कोल्हापूर, इचलकरंजी, चिक्कोडी बाजारपेठेतील व्यापारी केळी खरेदी करतात. सध्या माझा मुलगा अमर या बागेचे व्यवस्थापन पाहतो आहे.
पहिल्यांदा "ऍग्रोवन'चं वाचन मगच शेतात पाऊल...
कुरुंदवाडे "ऍग्रोवन'चे पहिल्या अंकापासूनचे वाचक आहेत. त्यांनी विविध विषयांवरील कात्रणे संग्रही ठेवली आहेत. घरात ते फक्त "ऍग्रोवन' घेतात. सकाळी "ऍग्रोवन'चे सखोल वाचन करूनच शेतातील कामासाठी ते बाहेर पडतात. "ऍग्रोवन'मधील यशकथा प्रेरणादायी असल्याचे कुरुंदवाडे यांनी सांगितले.
केळीबरोबर ऊस व ढोबळी मिरचीतही सातत्य
कुरुंदवाडे यांनी केळीबरोबरच उसातही ठिबक सिंचन यंत्रणा बसविली आहे. तीन फुटांवरून अंतर वाढवत वाढवत त्यांनी आता आठ फुटांवर उसाची लावण केली आहे. को- 86032, फुले- 265 जातीचे त्यांना एकरी 70 टनांपेक्षा जास्त उत्पादन मिळते. उसाबरोबर ते ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतात. कर्नाटकात मागणी असणाऱ्या बेळगाव पोपटी जातीच्या ढोबळी मिरचीचे उत्पादनही त्यांनी गेल्या काही वर्षांत फायदेशीर करून दाखविले आहे. भविष्यात शेडनेट शेतीचे त्यांचे नियोजन आहे.
केळी ठरतेय फायद्याचे पीक
केळी व्यवस्थापनाच्या खर्चाबाबत कुरुंदवाडे म्हणाले, की रोपे, खते, कीडनाशके, केळी रोपांसाठी पट्ट्या, ठिबक सिंचन आणि पीक व्यवस्थापन मजुरी असा एकरी एक लाख 22 हजार रुपये खर्च आलेला आहे. सध्या 38 टन केळीचे उत्पादन हाती आले आहे. अजून चार ते पाच टन केळीचे उत्पादन मिळेल. 15 जूनला संपूर्ण क्षेत्रातील काढणी संपेल. यंदा सरासरी आठ हजार रुपये प्रति टन असा दर मिळाला आहे. खर्च वजा जाता सरासरी दोन लाखांचे निव्वळ उत्पन्न केळीतून मिळणार आहे.
कुरुंदवाडे यांच्याकडून शिकण्यासारखे
* पाण्याच्या उपलब्धतेनुसार ठिबकच्या माध्यमातून ऊस, केळी, ढोबळी मिरची पिकाला पाणी नियोजन
* गरजेनुसार सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब
* केळीबरोबर ऊस व ढोबळी मिरचीचे सातत्याने फायदेशीर उत्पादन
* बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास
* कृषी तज्ज्ञांशी सातत्याने संपर्क
* गावातील इतर शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
फारसा शिकलो नसल्याने मला बदल स्वीकारणे पहिल्यांदा कठीण गेले; पण आता ती अडचण येत नाही. मी कृषी विभागाचे, विविध कंपन्यांचे अधिकारी यांच्याशी सातत्याने चर्चा करून पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानात बदल करतो. याचा फायदा आता मला होत आहे. माझ्या पुढच्या पिढीलाही मी ही शिकवण देत आहे.
- अण्णासो कुरुंदवाडे
संपर्क -
अण्णासो कुरुंदवाडे - 9420886517
माहिती संदर्भ : अॅग्रोवन