दुधड (जि. औरंगाबाद) येथील नारायण चौधरी यांनी बाजारपेठेची गरज आणि आर्थिक नफा लक्षात घेऊन डाळिंबाची लागवड केली. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्येही शेततळे आणि प्लॅस्टिक आच्छादनातून बागेचे चांगले व्यवस्थापन करून दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड परिसराने डाळिंब लागवडीमुळे स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. सन 2000 मध्ये केवळ एक ते दोन हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब आता सुमारे 1000 हेक्टरच्याही पुढे पोचले आहे. दुधड (जि. औरंगाबाद) येथील नारायण भीमराव चौधरी यांनी बाजारपेठेची मागणी ओळखून चार वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केली. या डाळिंब शेतीनेच त्यांना आर्थिक प्रगतीकडे नेले आहे.
पीकबदल ठरला महत्त्वाचा....
दुधड येथील नारायण चौधरी आणि त्यांचे बंधू विजय चौधरी यांचे आठ एकर क्षेत्र आहे. दोघे बंधू पारंपरिक पद्धतीनेच शेती करीत होते; परंतु म्हणावा तसा या शेतीमध्ये आर्थिक फायदा मिळत नव्हता. दोन एकर क्षेत्रावर मोसंबीची लागवडही होती; परंतु पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जेमतेम उत्पादन हाती यायचे. दरम्यान, परिसरात डाळिंबाने चांगलाच जोम धरला होता. परिसरातील डाळिंब उत्पादकांशी चर्चा केली. अभ्यास करून 2009 मध्ये डाळिंबाची लागवड केली. पहिल्या टप्प्यात दोन एकर क्षेत्रावर भगवा डाळिंबाची लागवड 12 फूट बाय 12 फूट अंतराने लागवड केली. कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार बागेची चांगली जोपासना केली. लागवडीपूर्वीच ठिबक सिंचनाचे नियोजन केले होते. वाढीच्या काळात झाडांची शिफारशीनुसार टप्प्याटप्प्याने छाटणी करून योग्य आकार दिला. डाळिंबाच्या अठराव्या महिन्यातच पहिला बहर घेतला. त्या वेळी प्रत्येक झाडावर 10 किलोपेक्षा जास्त फळे घेतली नाहीत. फळांचेही चांगले उत्पादन मिळू लागल्याने सन 2012 मध्ये पुन्हा दोन एकर डाळिंबाची लागवड 15 फूट बाय 9 फूट अंतराने केली. यामुळे यांत्रिक पद्धतीने मशागत करणे सोपे जाणार आहे.
असे केले डाळिंब बागेचे व्यवस्थापन
1) डाळिंब हे पीक कमी पाण्यात येणारे असले तरी अधिकाधिक उत्पादनासाठी पाणी हा घटक महत्त्वाचा आहे. चौधरी यांच्याकडे विहीर आणि कूपनलिका आहे; परंतु या परिसरात पाऊस कमी झाल्याने पाण्याची कमतरता जाणवणार होती, त्यामुळे त्यांनी शेततळ्याचे नियोजन केले.
2) माती परीक्षणानुसार बागेतील झाडांसाठी खतांचे नियोजन व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नियोजनही अतिशय काटेकोर केले आहे. रासायनिक खतांबरोबरच कंपोस्ट खत (प्रति झाड 40 ते 50 किलो), निमपेंड (प्रति झाड तीन किलो) यांचाही वापर चौधरी करतात, त्यामुळे जमिनीचा पोत व झाडाचे आरोग्यही नीट राखता आले. निंबोळी पेंडीमुळे सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जाणवला नाही.
3) डाळिंबाचा बहर धरण्यासाठी ऑक्टोबरच्या शेवटी छाटणी केली. लगेचच बोर्डो मिश्रणाची फवारणी केली. डाळिंबाला डिसेंबरच्या शेवटी ताण द्यायला सुरवात केली. पहिले पाणी 26 जानेवारीला सोडले. ठिबक सिंचनानेच पाणी आणि विद्राव्य खतांचे नियोजन केले. योग्य खत मात्रा, पाणी नियोजन, झाडांचे योग्य व्यवस्थापन ठेवल्याने डाळिंबाची कळी जोमदार निघाली व डाळिंबाचे सेटिंगही चांगले झाले. सध्या एका झाडावर सरासरी 125 ते 150 फळे आहेत.
4) पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागताच जानेवारी महिन्यात डाळिंब बागेत प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन केले. आच्छादनासाठी 40 मायक्रॉन जाडीचा प्लॅस्टिक कागद वापरला. यासाठी दोन एकरांसाठी 25,000 रुपये खर्च झाला. आच्छादनासाठी कृषी विभागाकडून 10 हजाराचे अनुदानही मिळाले. आच्छादन आणि ठिबक सिंचन केल्याने सिंचनाच्या पाण्यात किमान 40 टक्के बचत झाली.
5) चौधरी यांच्याकडे सहा जनावरे आहेत. जनावरांचे शेण व मूत्र तसेच गोठा स्वच्छ करताना वापरलेले पाणी बायोगॅस संयंत्रात जाईल अशी व्यवस्था केली आहे. बायोगॅसवर घरचा स्वयंपाक होतो, शिवाय स्लरीचा उपयोग गांडूळ खत तयार करण्यासाठी केला जातो. तसेच, गरजेनुसार डाळिंब झाडांना स्लरी दिली जाते.
शेततळे ठरले फायदेशीर
डाळिंब बागेसाठी पाणी व्यवस्थापनासाठी चौधरी यांनी सन 2010 मध्ये शेततळे घेतले. या शेततळ्याचा यंदाच्या दुष्काळात डाळिंब बागेला पाणी देण्यासाठी चांगला फायदा झाला. याबाबत चौधरी म्हणाले, की राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत संरक्षित पाण्याच्या सोईसाठी 30 मीटर बाय 30 मीटर बाय तीन मीटर खोल आकाराचे शेततळे घेतले. यासाठी तीन लाख रुपये खर्च आला. शेततळ्यासाठी एक लाख 40 हजार रुपये अनुदान मिळाले, त्यामध्ये प्लॅस्टिक कागद वापरला आहे. शेततळ्यात सध्या 65 लाख लिटर पाणी साठते. पावसाळ्यात शक्य तेवढे पाणी भरून घेतले होते; पण यंदा पाऊसच अत्यंत कमी झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच टॅंकरने पाणी विकत घेऊ लागलो. मेपर्यंत गरजेनुसार शेततळ्यात टॅंकरद्वारे पाणी भरून घेतले. बागेची जोपासना चांगली झाल्यामुळे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून गरजेनुसार बागेला पाणी दिले. एका टॅंकरसाठी 3000 रुपये एवढा खर्च झाला. आतापर्यंत किमान 30 टॅंकर लागले आहेत. शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हावे म्हणून लिंबोळी तेलाचा तवंग पाण्यावर सोडला होता. या संरक्षित पाण्यामुळे यंदा डाळिंबाचा बहर धरता आला. अजून पाणी शिल्लक आहे. अजून काही दिवस पाणी पुरणार आहे.
जागेवरच होते डाळिंब विक्री
मागील वर्षी दोन एकर क्षेत्रातून 22 टन डाळिंब उत्पादन निघाले होते. 60 हजार रुपये प्रति टन भाव मिळाला. या वर्षीही चांगले उत्पन्न अपेक्षित असले तरी खर्च पाच लाख रुपयांच्या जवळपास झाला आहे. गेल्या वर्षीपासून त्यांनी डाळिंबाची विक्री बागेमध्येच सुरू केली. चौधरी म्हणाले, की सुरवातीला डाळिंबाची विक्री नाशिक मार्केटमध्ये केली. डाळिंबाचा आकार व आकर्षक रंग यामुळे बाजारभाव चांगला मिळाला; परंतु वाहतूक, आडत, मजुरीमुळे खर्च वाढला, त्यामुळे नफा कमी शिल्लक राहू लागला. माझ्याकडील डाळिंबाचा दर्जा चांगला असल्याने व्यापारी आता बागेत येऊन फळांची खरेदी करतात. डाळिंब काढल्याबरोबर त्याची प्रतवारी वजनानुसार केली जाते, त्यामुळे अधिक चांगला भाव मिळतो. जागेवरच माल विक्री केल्यास वजनात घट होत नाही, शिवाय वाहतुकीचे भाडे वाचते.
संपर्क - नारायण चौधरी, मोबाईल - 7588044475
(लेखक औरंगाबाद येथे कृषी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन