नगर जिल्ह्यातील राहुरी तालुका हा सधन तालुका म्हणून ओळखला जातो. ऊस, फळबाग, भाजीपाला ही या परिसरातील मुख्य पिके. मात्र या भागातील शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके, अवजारे, माती-पाणी परीक्षणासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे पैसा, वेळ वाया जातो. एकाच कामासाठी काही वेळेस वारंवार चकराही माराव्या लागतात. त्यामुळे शेतीकामाचा खोळंबा होतो तो वेगळाच. परिसरातील शेतकऱ्यांची ही गरज ओळखून जोगेश्वरी आखाडा (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर कविता जाधव यांनी शेतीसाठी सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
कविता जाधव यांनी कृषीचे शिक्षण घेऊन शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांची इच्छा आणि शेतीची आवड यामुळे कविता जाधव यांनी पुणे कृषी महाविद्यालयातून 2005 मध्ये बी.एस्सी कृषी पदवी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर गाव परिसरात कृषी क्षेत्रामध्येच काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शेतीमधील शिक्षण आणि पीक प्रात्यक्षिकांच्या अनुभवामुळे त्यांनी कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
जोगेश्वरी आखाडा परिसरात ऊस, भाजीपाला, फळबाग उत्पादकांचे मोठे क्षेत्र आहे. या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कविता जाधव यांनी सन 2006 मध्ये कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. वडिलांकडे फक्त दीड ते दोन लाख रुपये एवढेच भांडवल उपलब्ध होते. अधिक भांडवलाची आवश्यकता असल्याने, त्यांनी जवळच्या बॅंकेकडे कर्जाची मागणी केली; परंतु कृषी सेवा केंद्र सुरू करण्याकडे महिला वळत नाहीत आणि महिलेला कर्ज दिले तर परतफेड कशी करणार, हे कारण देत तेथील अधिकाऱ्यांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जाधव यांना उपलब्ध भांडवलावरच घरच्या शेतीच्या निविष्ठा ठेवण्यासाठी बांधलेल्या गोदामामध्येच कृषी सेवा केंद्र सुरू केले.
कृषी सेवा केंद्र सुरू केल्यानंतर निविष्ठांची विक्री करतानाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काही वेळेस प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकावरील रोग, किडींच्या प्रादुर्भावाची पाहणी करून नेमके कोणते कीडनाशक फवारायचे आणि कोणते नाही, याची माहिती जाधव शेतकऱ्यांना देऊ लागल्या. पीक उत्पादनवाढीसाठी नेमके काय करावे लागेल, याचा सल्ला शेतावरच मिळू लागल्याने शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. याच दरम्यान त्यांनी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रातून "ऍग्री क्लिनिक अँड ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट' हा कोर्स पूर्ण केला. शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे त्यांनी 2008 मध्ये राहुरी येथे कृषी सेवा केंद्राची दुसरी शाखा सुरू केली. 2010 मध्ये कविता यांचा विवाह राहुरी येथील हॉटेल उद्योजक प्रवीण नारायण जाधव यांच्याशी झाला.
पुणे, मुंबई शहरातील मॉल संकल्पना त्यांना आवडली होती. या संकल्पनेच्या आधारावरच त्यांनी शेतकऱ्यांसाठी "ऍग्री मॉल' तयार करण्याचे ठरविले. पीक व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी जोगेश्वरी आखाडा येथील कृषी सेवा केंद्राचे रूपांतर "ऍग्री मॉल'मध्ये केले. यासाठी पती प्रवीण यांची चांगली साथ मिळाली. हा मॉल उभारताना कविता यांना आर्थिक भांडवल, खते व बी-बियाणे मिळण्यास सुरवातीला अडचण आली. त्याचबरोबरीने मॉलमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षित कामगारही मिळत नव्हते; परंतु परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. नगर येथील बी.पी.एच.ई. सोसायटीच्या "इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज'चा आदर्श उद्योजक पुरस्काराने नुकतेच कविता जाधव यांना गौरविण्यात आले आहे.
1) ऍग्री मॉलमध्ये जाधव यांनी माती-पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू केली. आत्तापर्यंत या परिसरातील सुमारे 2200 शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतले आहे. या तपासणीमध्ये विविध घटक तपासले जातात. जाधव यांना या परिसरातील जमिनींमध्ये चुनखडी, सामू, क्षारता वाढलेली दिसून आली, तर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यंत कमी आढळून आले. हे लक्षात घेऊन एकात्मिक खत व्यवस्थापन सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो.
2) पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा नेमका कसा वापर करावा, पाण्यातील उपयुक्त घटक कोणते, हे शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी पाण्याचा नमुनाही तपासून दिला जातो. आत्तापर्यंत सुमारे 1750 शेतकऱ्यांना पाणीनमुन्याची तपासणी त्यांनी करून दिली आहे.
3) जाधव स्वतः शेतावर जाऊन माती-पाण्याचा नमुना कसा घ्यायचा, त्यासोबत माहिती कशी भरायची, याचे मार्गदर्शन त्या करतात. अहवालानुसार पीक व्यवस्थापन कसे केले पाहिजे, याचाही सल्ला तातडीने देतात.
4) मातीच्या साध्या तपासणीसाठी 200 रुपये, मातीच्या विशेष तपासणीसाठी 500 रुपये आणि पाणीतपासणीसाठी 150 रुपये, अशी फी त्यांनी ठेवली आहे.
योग्य मार्गदर्शन मिळाले...
"" डाळिंब लागवड करायची असल्याने, मी जाधव यांच्या प्रयोगशाळेतून माती, पाणी परीक्षण करून घेतले. तसेच इतर निविष्ठांची खरेदी केली. त्यामुळे वेळ आणि प्रवासखर्चामध्ये बचत झाली, योग्य मार्गदर्शन मिळाले.''
- किरण शिंदे, टाकळीमिया, ता.राहुरी, जि.नगर
"" यंदा मी ऊसलागवड केली आहे. त्यासाठी मातीपरीक्षण केले. त्यानुसार आता रासायनिक आणि सेंद्रिय खतमात्रा देत आहे. यामुळे पिकाला योग्य खते मिळतात. यामुळे माझी आर्थिक बचतही झाली.''
- बापूसाहेब जाधव, येवले आखाडा, ता. राहुरी, जि. नगर,
संपर्क - कविता जाधव - 9860118980
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नगर जिल्ह्यातील वाकी या आदिवासी गावात प्रभाताई फलक...
नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील...
कवी श्री सुरेश श्रीधर भट यांची कविता
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...