राज्यात मॉन्सून काळात अन्यत्र पाऊस पडून गेला तरी नगर जिल्हा दरवर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असतो. इतके पाऊसमान सध्या घटत चालले आहे. त्याचा शेतीवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असो वा नसो येथील शेतकरी पाण्याच्या वापराबाबत काटेकोर होत आहेत.
याच जिल्ह्यातील मल्हारवाडी (ता. राहुरी) हे गाव राहुरीपासून आठ किलोमीटरवर राहुरी ते ताहाराबाद मार्गावर आहे. इथली जमीन मध्यम प्रतीची व पाण्याचा निचरा होणारी आहे. अनेक वर्षांपासून हे गाव नाशिक, गुजरात, पुणे जिल्ह्याला ओळखीचे आहे. याचे कारण म्हणजे इथली उन्हाळ्यातील वांगी शेती. इथली वांगी या बाजारपेठांत नेहमी विकली जातात.
याच मल्हारवाडीचे नारायण जाधव यांची तीन भावांत मिळून सुमारे 25 एकर शेती आहे. त्यात ऊस, कांदा व वांगी ही त्यांची मुख्य पिके असतात. प्रतिकूल हवामानामुळे आता उसाचे उत्पादन घटत चालले आहे. वांगी पीक दहा ते पंधरा वर्षापासून ते घेत होते. तोडणीचा खर्च वाढत होता.
साहजिकच कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या शोधात जाधव होते. पाहुण्यांचा कलिंगडाचा प्लॉट व त्याचे अर्थशास्त्र त्यांच्या पाहण्यात आले. ते समाधानकारक वाटल्याने आपणही या पिकाला सुरवात करूया, असे त्यांनी ठरवले. सुमारे 70 ते 75 दिवसांत येणारे हे पीक असून वर्षभरात खरीप व उन्हाळ्यातही घेता येते. अलीकडील वर्षांतील दरांचा विचार करता दरही बऱ्यापैकी राहिले आहेत. या गोष्टींचा विचार त्यांनी केला.
कलिंगडाच्या लागवडीसाठी प्रथम उभी-आडवी नांगरट करुन घेतली. दोन एकरांसाठी अडीच ट्रेलर शेणखताचा वापर केला. (घरी सहा ते सात गायी असल्याने शेणखत उपलब्ध होते.) तीन फुट रुंदीचे गादीवाफे (बेड) तयार केले. दोन बेडमधील अंतर सात फुटाचे ठेवले. लागवड यंदाच्या 14 मार्च च्या सुमारास केली. शेतीला ठिबक सिंचन केले. त्याचबरोबर पॉली मल्चिंगचा वापर केला. जमिनीतून बेसल डोस दिल्यानंतर पुढील बहुतांश सर्व खते ठिबकद्वारेच दिली. सुरूवातीच्या काळात 19-19-19 तर फुले आल्यानंतर 12-61-00 या खताचा वापर सुरू केला. वातावरणाचा अंदाज घेत पीक कालावधीत कीडनाशकांच्या एकूण सहा ते सात फवारण्या केल्या. दिवसाआड पाणी ठिबक सिंचनातून दिले. फळे काढणीच्या आधी बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट ठिबकमधून दिले. फळाचा आकार व गुणवत्ता चांगली मिळाली.
सुमारे सत्तर दिवसांनी फळे काढण्यास तयार झाली. प्रत्येक वेलीस तीन ते चार फळे आली होती. एकरी सुमारे पाच पाकिटे (प्रति 100 ग्रॅम) एवढे बियाणे लागले होते. काही टक्के रोपांची मरतूक झाली होती. मात्र एकूण व्यवस्थापनातून दोन एकरांत सुमारे 55 टन तर एकरी 27 टनांपर्यंत उत्पादन घेण्यास जाधव यशस्वी झाले. सरासरी फळाचे वजन चार ते पाच व काही प्रसंगी ते सहा-सात किलोपर्यंत मिळाले. सुरेश भोसले, सचिन वने यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
औरंगाबाद व वाशी मार्केटला फळांची विक्री केली. त्याला प्रतिकिलो आठ रुपयांपासून ते 11 रुपयांपर्यंत दर मिळाला. कलिंगडाचे वजन मध्यम प्रमाणात असल्याने एका कुटुंबासाठी ते पुरेसे होऊ शकते. दोन एकरांत खर्च वजा जाता तीन लाख रुपये म्हणजे एकरी दीड लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळाले. जाधव यांचे सुमारे 10 ते 12 सदस्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या घरातील सर्वजण शेतीत राबतात. साहजिकच मजुरीवरील खर्च त्यांनी कमी केला आहे. भारत व हरिभाऊ या दोन भावांची त्यांना शेतीत मोठी मदत मिळते. कुटुंबातील किशोर व नंदकिशोर या नव्या पिढीच्या सदस्यांनी पिकाचे व्यवस्थापन पाहिले. पहिल्याच प्रयोगातून जाधव यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर आणखी दोन एकरांत त्यांनी भाद्रपद महिन्यात कलिंगड आणण्याच्या इराद्याने लागवड केली. त्याला एक महिना झाला आहे.
भाद्रपद महिन्यात उन्हाचे दिवस असतात. त्या काळात कलिंगडाला दर चांगले मिळतात. या काळात आवकही कमी असते. आपल्या पाहुण्यांचा हा अनुभव त्यांना पाहिला असल्याने त्याचाच अवलंब त्यांनी केला आहे. यंदाच्या खरीपात त्यांच्या गावात अजून तरी पावसाने हजेरी लावली नाही. मात्र बोअरच्या पाण्यावर कलिंगड, ऊस जगवणे सुरू आहे. धरण प्रकल्पाचा फायदा म्हणून बोअरचे पाणी टिकत असल्याचे जाधव म्हणाले.
जाधव म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ऊस घेतो. सुरू व आडसालीमध्ये लागवड असते. सुरू हंगामात एकरी 40 ते 50 टन तर आडसालीचे 70 टनांपर्यंत उत्पादन मिळते. साखर कारखाना प्रतिटन दोनहजार रुपये दर देतो. एकरी 50 टन उत्पादनाप्रमाणे उसापासून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यातील 40 हजार रुपयांचा खर्च वजा जाता सुमारे वर्ष ते दीड वर्षांत 60 हजार रुपयांचेच उत्पन्न हाती पडते. त्या तुलनेत कलिंगडाची देखभाल चांगल्या प्रकारे केल्यास सुमारे 70 दिवसांत एक लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.
जाधव गावातील अन्य शेतकऱ्यांप्रमाणे उन्हाळी वांगी घेतात. दरांप्रमाणे त्याचे अर्थशास्त्र बदलते. सध्या 10 किलोमागे 150 रूपये दर सुरू आहे. हाच दर मागील काही दिवसांपूर्वी प्रति 15 किलोला 400 रुपयांपर्यंत होता, असे जाधव म्हणाले. कांद्याची ते रब्बीमध्ये लागवड करतात. त्याचे एकरी 10 ते 15 टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते.
आम्ही 25 एकरांपैकी सुमारे 10 ते 15 एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. पाण्याची बचत केल्याशिवाय व त्याचा काटेकोर वापर केल्याशिवाय पर्याय नाही, तरच शेती फायदेशीर होऊ शकते.
नारायण जाधव
संपर्कः
नारायण जाधव-
9850361493
किशोर जाधव -९२०९२४३०१९
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...