रखरखीत उण, ओसाड माळरान, खुरटं गवत, काटेरी झाडी झुडपी यामुळे दुष्काळाची जीवावर बेतणारी तीव्रता या सर्वांना तोंड देत तमदलगे येथील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून होते. पण जलयुक्त शिवार अभियानाने तमदलगेच्या या फोंड्या माळरानात खुरटं गवत जाऊन आज ऊस, ज्वारी, मक्का, फुले डोमांने डोलत आहेत. आपण खरच तमदलगेच्या माळरानात आहोत काय याची चिमटा घेऊन खात्री करावी लागते. याच माळरानात जलयुक्त शिवार अभियानातून निर्माण झालेला जलक्रांतीचा लाभ घेऊन शेतकरी महावीर देसाई यांनी खऱ्या अर्थाने हरित क्रांती घडविली आहे.
सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान ही प्राधान्यक्रमाची योजना राबविली. या योजनेमुळे गावागावात शाश्वत जलसाठे निर्माण झाले. कोल्हापूर जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबविले गेले. तमदलगे सारख्या टंचाईग्रस्त गावातही जलयुक्त शिवार अभियानातून अनेक कामे हाती घेतली गेली. यामध्ये गावच्या थोरल्या ओढ्यावर जलसिंचन विभागाच्यावतीने 5 साखळी सिमेंट बंधारे बांधून जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा थेंब अन् थेंब अडविला गेला. यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत 2 ते 3 फुटाने वाढ झाली. याच योजनेचा लाभ मिळालेले तमदलगेचे शेतकरी महावीर दादा देसाई यांनी आपल्या फोंड्या माळरानात दोन वर्षात नेत्रोद्दीपक शेती पिकविली आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाचे त्यांनी मुक्त कंठाने कौतुक केले.
सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन इ.स. 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याच्या दिशेने राज्य शासनाने दमदार पाऊल टाकले. जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचा थेंब न थेंब अडवून तो जमिनीत मुरविण्याच्या जलयुक्त शिवार अभियानावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत करून या अभियानाला गती दिली. पहिल्या वर्षी 69 गावांची निवड केली. त्यातीलच तमदलगे हे एक गाव आहे. तमदलगे हे गाव कोल्हापूर सांगली रस्त्यावर वसले असले तरी दुष्काळाच्या छायेत असणारे गाव आहे. पिढ्या न् पिढ्या पावसावर अवलंबून शेती करणारे येथील शेतकरी जीवनात नवी आशा येईल या अपेक्षेने जीवन जगत होते. शेती ही उजाड चड उताराची काठेरी झुडपांची कोरडवाहू डोंगराळ हलक्या प्रतीची होती. मात्र या जमिनीमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची प्रणाली राबविल्याने दुष्काळात होरपळणाऱ्या या शेतीला आधार मिळाला.
तमदलगे गावात जलयुक्त शिवार अभियानातून गावच्या 1972 च्या दुष्काळात काढलेला तलाव गाळ मुक्त करण्याच्या प्रमुख कामाबरोबरच गावच्या थोरल्या ओढ्यावर साखळी सिमेंट बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या ओढ्यावर माथा ते पायथा या प्रणालीनुसार 5 सिमेंट बंधारे बांधून चांगला पाणीसाठा केला गेला. यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत 2 ते 3 फुटाने वाढ झाली. या थोरल्या ओढ्यालगत गावातील शेतकरी महावीर दादा देसाई यांची शेती आहे. पण पूर्वापार दुष्काळी छायेत असलेल्या या शेतीतून शेती उत्पन्न निघत नव्हती. मात्र जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रणालीमुळे विहिरींची पाणीपातळी वाढल्याने शेतीपीके घेणे श्री. देसाई यांना शक्य झाले.
श्री. देसाई यांनी आपल्या शेतामध्ये कोरडवाहू शेती अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून 2 हजार घनमीटर क्षमतेचे 100 टक्के अनुदानातून शेततळेही घेतले आणि या शेततळ्यामध्ये आपल्या विहिरीतील पाणी साठवून ते ठिबक सिंचनाद्वारे ऊसशेती, फुलशेतीस देऊ लागले. जलयुक्त शिवार अभियानाने श्री. देसाई यांच्या शेता शेजारी बंधाऱ्यामुळे तसेच शेततळे व विहीर यामुळे शाश्वत पाणी साठे निर्माण झाल्याने त्यांनी आपल्या शेतात फुलशेती, ऊसशेती व भाजीपाला शेती विकसीत करण्यावर भर दिला. त्यामुळे फोंड्या माळरानात डोंगर कपारीतही आज फुलशेती लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे.
कोरडवाहू अभियानातून 50 टक्के अनुदानातून श्री. देसाई यांनी पाईपलाईन, 5 एकरासाठी ठिबक सिंचन, इलेक्ट्रीक मोटर पंप असे शेतीपुरक साहित्य उपलब्ध करून घेतले. कृषी विभागाकडून शेती विकासासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि शेतीची पद्धती याची माहिती घेऊन बागायती शेती करण्यावर भर दिला. जलयुक्त शिवार अभियानामुळे थोरल्या ओढ्याशेजारी त्यांच्या विहिरीला पाण्याचा चांगला स्त्रोत निर्माण झाल्याने त्यांच्या स्वमालकीच्या शेतामध्ये ऊसशेती अतिशय दर्जेदारपणे केली आहे. त्यामुळे डोंगर कपारीत ऊसशेतीचा त्यांचा प्रयोग इतरांच्या दृष्टीने कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरला आहे. याबरोबरच डोंगर कपारी फुलशेती विकसित करून आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. त्यांनी विकसित केलेली माळरानातील फुलशेती लोकांचे लक्ष केंद्रीत करत आहे.
महावीर देसाई यांनी थोरल्या ओढ्याशेजारी असणाऱ्या आपल्या शेतीमधील 15 गुंठे क्षेत्रात गलांडा फुलशेती विकसीत केली. ऑक्टोबरपासून गलांडा फुलशेतीचा हंगाम सुरू झाला असून आजपर्यंत जवळपास 5 टन गलांडा फुलाची विक्री केली असून या फुलविक्रीतून त्यांना 1 लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले. आयुष्यभर शिक्षकीपेशा इमाने इतबारे करून सेवा निवृत्तीनंतर फोंड्या माळरानात फुलशेती करून नव्या विश्वात किमया घडविण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची साथ लाभली. आणि बघताबघता ओसाड, डोंगराल माळरानात गलांडा फुलाची शेती फुलली. हीच त्यांची सेवा निवृत्तीची कमाई आणि सेवानिवृत्ती काळातील समाधान मानावे लागेल. यापुढेही आणखीन 10 गुंठे शेतातही फुलशेती विकसीत करण्यावर भर दिला आहे. तसेच नजिकच्या काळात कृषि पर्यटन वाढीसाठी नवा प्रयोग करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
वाहते पाणी अडवूया-शेतीमळे फुलवूया या उक्तीप्रमाणे तमदलगे सारख्या दुष्कळी छायेतील गावामध्ये शासनाची जलयुक्त शिवार अभियानातून कष्ट आणि जिद्दीने महावीर देसाई यांनी सेवानिवृत्तीनंतरही आपली चिकाटी आणि प्रयत्न शेती विकासाला अर्पण केले. त्यांच्या कष्टाला आणि जिद्दीला जलयुक्त शिवार अभियानाच साथ मिळाली आणि बघता बघता तमदलगेच्या फोंड्या माळरानात ऊसशेती आणि फुलशेती बहरली.
लेखक - एस.आर.माने
माहिती अधिकारी,
कोल्हापूर
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 3/8/2024
कणखरपणामुळे गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते; मात...
नगर जिल्ह्यातील वाकी या आदिवासी गावात प्रभाताई फलक...
ऍस्टर हे वर्षभर भरपूर विविधरंगी फुले देणारे आणि कम...
तुकाराम लोंढे यांच्या वडिलोपार्जित 17 एकर शेतीत दी...