मराठवाड्यातील आठ ही जिल्ह्यात मागीत तीन-चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले असून कोरडवाहू व हंगामी सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. बारामाही सिंचन असणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यातल्या त्यात बरी आहे.
मराठवाड्यासह राज्यातील सर्व शेतकरी टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जात आहेत. परंतु काही शेतकरी कमी सोयी-सुविधांवर ही शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करून कमी साधन सामग्रीवर चांगले उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करून टंचाईवर मात करीत आहेत.
तुकाराम लोंढे हे असेच एक उपक्रमशील शेतकरी आहेत. हिंगोली शहरापासून 8 ते 10 किलो मीटर अंतरावर देवाळा या गावी त्यांची 17 एकर वडिलोपार्जित खडकाळ माळरानाची जमीन आहे. जमीनकडे पाहिल्यावर यातून जनावराला चारा तरी मिळेल याबाबत साशंकता आहे परंतू कृषि विभागातच काम करीत असताना वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देऊन इतर शेतकऱ्यांसमोर कृतीतून नावीन्यपूर्ण पिके घेऊन चांगले उत्पादन घेण्याचा आदर्श श्री. लोंढे यांनी घालून दिलेला आहे.
‘ॲपल बोर’ हा नावीन्यपूर्ण फळबाग उपक्रम तुकाराम लोंढे यांनी आपल्या माळरानावरील दीड एकरात दिनांक 15 मार्च, 2015 रोजी घेतला. ‘ॲपल बोर’ हे मूळ थायलंड देशातील फळपिक असून भारतात प्रथम पश्चिम बंगाल राज्यात ॲपल बोराचे उत्पादन घेण्यात आले. त्यानंतर हळूहळू देशाच्या सर्व भागात हे फळपिक घेतले जात आहे. विशेषत: उष्ण व कोरडे हवामान ॲपल बोर पिकास पोषक आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या हवामानात या फळपिकातून चांगले उत्पादन मिळू शकते.
उपक्रमशील शेतकरी तुकाराम लोंढे सांगत होते की, दीड एकरात 550 ॲपल बोराची लागवड केली. याकरिता राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतून 50 लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचे सामूहिक शेततळे घेतले. दीड एकर वरील ॲपल बोर बागेला ठिबक सिंचनाव्दारे पाणी देण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये दर दहा दिवसांनी झाडांवर किटकनाशकांची फवारणी केल्यामुळे फळे किडरहित जोपासली गेली आहेत. आज 9 महिन्यानंतर पहिल्या पिकाचा हंगाम आलेला असून प्रत्येक झाडाला किमान 30 ते 40 किलो बोरे लागलेली आहेत. ॲपल बोराचे प्रत्येक झाड फळांनी लगडून गेलेले असून त्यांना तार व रॉडच्या माध्यमातून आधार देण्यात आलेला आहे.
ॲपल बोराचे प्रत्येकी वजन किमान 80 ते 100 ग्रॅम व त्यापेक्षा ही अधिक असून एका किलोमध्ये फक्त 8 ते 10 ॲपल बोरे बसू शकतात. या बागेतून यावर्षी किमान शंभर क्विंटल माल निघू शकतो. परंतू श्री. लोंढे सांगतात की आज ठोक बाजारात ॲपल बोराला 25 ते 30 रू. प्रतिकिलो भाव आहे. व किरकोळ बाजारात 40 ते 50 रु. प्रतिकिलो दर मिळत आहे. ही ॲपल बोरे हिंगोली व नांदेड येथील बाजारपेठेत पाठवित आहेत. व यापासून अडीच लाखाचे उत्पन्न मिळेल.
परंतू ॲपल बोराचा पुढील वर्षी खरा हंगाम घेतला जाणार असून या हंगामापासून किमान 200 क्विंटल बोराचे उत्पादन घेण्यात येऊन किमान दर 20 रू. प्रति किलो मिळाला तरी 4 लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. व खर्चाचे 10 ते 20 टक्के प्रमाण पाहता 80 ते 90 टक्के फायदा होणार असल्याची माहिती तुकाराम लोंढे यांनी दिली. तर तिसऱ्या वर्षी या बागेतून 400 क्विंटल ॲपल बोराचे उत्पादन मिळेल त्यामुळे या उपक्रमात खर्च नगण्य व उत्पन्न भरघोस असे आहे व ही फळबाग पुढील 15 वर्षापर्यंत पीक देत राहील.
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ॲपल बोराच्या उत्पादनाकडे वळले पाहीजे, यातून आर्थिक स्वावलंबन येण्याबरोबरच कमी पाणी, मुरमाड जमीन, उष्ण व कोरडे हवामान व खर्च कमी असल्याने हिंगोली जिल्ह्यासह सर्व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी किमान एक एकर ॲपल बोराची फळबाग घेतल्यास त्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार ही येणार नाही, याची खात्री वाटतं.
ॲपल बोर हे आकाराने मोठे फळ असून सफरचंदाप्रमाणे दिसते. एका वेळी एक बोर खाणे ही सहज शक्य नसल्याने ते सफरचंदाप्रमाणेच कापून खावे लागते. त्यामुळे देवाळा गावातील माळरानावर फुललं हिरवे नंदनवन पाहून परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर ॲपल बोर फळबागाची पाहणी करण्यासाठी तुकाराम लोंढे यांच्या शेतावर येत आहेत.
परभणी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही या ॲपल बोर फळबागेला भेट देऊन पाहणी केलेली आहे.
तुकाराम लोंढे यांच्या वडिलोपार्जित 17 एकर शेतीत दीड एकर ॲपल बोर, 4 एकरवर मोसंबी बाग, 2 एकरवर पेरूबाग असून हा सर्व परिसर एक हिरवे नंदनवनच प्रतीत होत आहे. उजाड माळरानावरचे नंदनवन असेच त्यांच्या शेतीचे व श्री. लोंढे यांच्या उपक्रमशीलतेचे वर्णन केले पाहीजे.
‘ॲपल बोर’ हे फळ पिक एक नावीन्यपूर्ण फळपिक असून तुकाराम लोंढे यांचा आदर्श ठेऊन परिसरातील व जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी ‘ॲपल बोर’ पिक घेतले पाहीजे. व यातून टंचाईच्या परिस्थितीवर चांगले उत्पादन घेऊन मात करणे शक्य असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत आहे. याकरिता कृषि विभागाशी अथवा श्री. तुकाराम लोंढे यांच्याशी 7588162521 संपर्क साधावा. व आपल्या ही शेतात ॲपल बोराची फळबाग फुलवावी.
लेखक - सुनिल सोनटक्के
जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 4/16/2020
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...