शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेती केली व त्याची विक्री व्यवस्थाही तेवढीच मजबूत केली तर आपण पिकवलेल्या मालाला चांगली किंमत आल्याशिवाय राहत नाही. नगर जिल्ह्यातील "प्रसन्न' या शेतकरी गटाने उत्तम व्यवस्थापन, इच्छाशक्ती व कुशल मार्केटिंगच्या बळावर मुंबई महानगरात आपली ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे.
घारगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील "कॉम्युटर इंजिनिअर' झालेले हेमंत बडवे यांनी 2011 पर्यंत पुण्यात कंपनीत नोकरी केली. मात्र मुळात शेतीची आवड असल्याने पुण्यातच "अभिनव फार्म्स'चे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांच्याशी त्यांची ओळख झाली. योग्य मार्गदर्शन घेऊन गावाकडे पॉलिहाऊस उभारले. त्यात रंगीत ढोबळी मिरचीचे पीक घेतले, परंतु विक्री संदर्भातील अडचणी समोर दिसू लागल्या. त्यातच पुण्यातील काही व्यापारी शेतकऱ्यांकडून स्वस्तात भाजीपाला घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच थेट विक्री केली तर निश्चित फायदा होऊ शकतो. त्यासाठी एकत्र येऊन शेतीमालाचे मार्केटिंग करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातच अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांच्याशी संपर्क आला. त्यांच्याशी चर्चा करून बडवे यांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रसन्न मुथ्था, जयकुमार मुनोत, डॉ. राहुल खिस्ती यांच्याबरोबर शेतीमाल मार्केटिंगसंबंधी चर्चा केली. सर्व प्रयत्नांमधून गावातील 20 शेतकरी एकत्र होत प्रसन्न भाजीपाला उत्पादक शेतकरी गटाची स्थापना झाली. कृषी विभागाने सुरू केलेल्या उत्पादक ते ग्राहक शेतमाल विक्री उपक्रमात ते सहभागी झाले.
गटातील तुकाराम उकांडे यांनी गटातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची स्वस्तात, खात्रीशीर व निरोगी रोपे मिळावी यासाठी भाजीपाल्याची रोपवाटिका सुरू केली. आता शेतकऱ्यांना बाहेरून खरेदी करण्याची किंवा स्वतः रोपे तयार करण्याची गरज भासत नाही. साहजिकच त्यांचा वेळ, पैसा वाचला. उत्पादनही लवकर मिळण्यास मदत झाली.
गटातील बहुतांशी सर्व शेतकऱ्यांनी कमी पाण्यात चांगले उत्पादन घेण्यासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब केला आहे. काहींनी कृषी विभागाच्या मदतीने शेततळे घेतले आहे. त्यांचे अनुकरण गटाबाहेरील शेतकरीही करू लागले आहेत.
गटाबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही भाजीपाला लागवड तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी मोफत मार्गदर्शन करण्यात येते. आतापर्यंत गटामार्फत एका वर्षाच्या कालावधीत चार कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यात सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी लागवड, बीजप्रक्रिया, पाणी, रोग-किडी नियंत्रण व्यवस्थापन, वाहतूक, विक्री व्यवस्था, सामूहिक शेती अशा विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्याची संधी घेतली. अनेक शेतकरी गटांत सामील होण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.
1) प्रतवारी व पॅकिंग-
गटाने उत्पादित केलेला भाजीपाला दिवसाआड काढला जातो. तो एके ठिकाणी संकलित करून प्रतवारी केली जाते. 250 ग्रॅम, 500 ग्रॅम वजनात पॅकिंग केले जाते. असा शेतमाल आकर्षक दिसत असल्याने चांगला दर मिळण्यास मदत होते. वाहतुकीसाठी शीतकरण सुविधा असलेल्या "व्हॅन"चा उपयोग होतो. त्यामुळे ग्राहकांनी मागणी केल्यानंतर कमी वेळेत ताजी भाजी देण्याचा प्रयत्न असतो.
मुंबईत संपर्कजाळे तयार करून गटाने सुमारे 800 ग्राहक आपल्याशी जोडले आहेत. त्यात वैयक्तिक व हॉटेल्स आदींचा समावेश आहे. एक दिवसाआड दोन ते अडीच टन माल विकला जातो. काही निवासी सोसायट्यांकडूनही मागणी वाढू लागली आहे.
प्रसन्न गटाने आपल्या ताज्या मालाची ऑर्डर नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा तयार केली आहे. गटाने त्यासाठी कॉल सेंटर सुरू केले आहे. त्या माध्यमातून ग्राहक आपली मागणी नोंदवतात. त्यांना माल घरच्या घरी पोचता (होम डिलिव्हरी) केला जातो. त्यासाठी "डिलिव्हरी बॉईज'ही ठेवले आहेत. ग्राहकांना दुसराही पर्याय आहे तो ऑनलाइन बुकिंगचा. गटाचे स्वतंत्र संकेतस्थळ असून तेथूनही ग्राहक माल मागवू शकतात.
- टोल फ्री क्र - 022- 40334033
- संकेतस्थळ- www.tazibhaji.com
बडवे म्हणाले, की मुंबई महानगराची व्याप्ती पाहता शेतमालाची मागणी प्रचंड आहे. सध्या गटाची संख्या वीस असली तरी असे 50 गट तयार करून अजून मालाची उपलब्धता वाढवण्याचे प्रयत्न आहेत. गटातील शेतकऱ्यांना बाजार समितीतील दरांपेक्षा चांगला व जागेवरच दर आम्ही देतो. वाहतूक, आडत हा त्यांचा खर्च वाचतो. शिवाय ग्राहकांनाही मार्केट दरापेक्षा कमी दरात माल मिळतो. दरांविषयी त्यांची आजपर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही.
हेमंत बडवे, जयकुमार मुनोत, तुकाराम उकांडे, दिलीप बडवे, नितीन जोशी, रवींद्र जाधव, पांडुरंग पानसरे, श्यामसुंदर पाटोळे, काळुराम टिळेकर, संजय खामकर, मंगलताई बडवे, चंद्रशेखर कळमकर, सूर्यकांत बांदल, विजया थिटे, रघुनाथ जाधव, अशोक शिंदे, बाळकृष्ण बडवे, मीराबाई बोंद्रे, संतोष बडवे, प्रतिमा मुथा,
(गेल्या तीन महिन्यांतील व शेतकऱ्यांना मिळालेला सरासरी दर)
भाजीपाला ----- झालेली विक्री (टन)---- सरासरी दर (प्रति किलो)
टोमॅटो ----- 10 ---- 12
वांगी ----- 8 ---- 13
ढोबळी मिरची --- 5 ----- 12
मिरची -------- 4 ------ 15
लिंबू ------- 1 ------ 25
भेंडी ------ 5 ------- 20
कोबी ------ 2 --------- 4
कारले ---- 1 -------- 15-20
फ्लॉवर ----- 3 ------- 4
संत्री ----- 20 ------- 20
काकडी ---- 7 ------- 12
ढोबळी मिरची कलर - 10 --- 60
लाल कोबी --- 3 ------- 25
ब्रोकोली ----- 3 ------- 45
पालक ----- 2,000 जुड्या -- 5 (प्रति जुडी)
कोथिंबीर ----- 2,000 जुड्या --- 5 (प्रति जुडी)
संपर्क - हेमंत बडवे - संपर्क - 9665450608
अध्यक्ष, प्रसन्न भाजीपाला उत्पादक शेतकरी गट
मु. पो. - घारगाव, ता.- श्रीगोंदा, जि. - नगर
-----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत- अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जिद्द, चिकाटी, मेहनत व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची...
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतक...
राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे...
या दौऱ्यामध्ये युरोपातील शेतीची आधुनिकता, पूरक व्य...