कवठेमहांकाळ दुष्काळग्रस्त तालुका असल्यामुळे शेतीला पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता. पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्षबाग करणे तर खूपच दूरची गोष्ट. मात्र, कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी उन्नती वाटचाल सुरू केली आहे. सामुहिक शेततळे, ठिबक संच, ट्रॅक्टर आणि शेतीला जोडव्यवसाय म्हणून मत्स्यबीजपालन अशा अनेक लाभांमुळे त्यांच्या जीवनात निश्चितच परिवर्तन झाले आहे.
प्रशांत पाटील पदवीधर शेतकरी आहेत. सहा एकर त्यांची शेती आहे. पूर्वी एका विहिरीच्या बळावर त्यांनी अर्धा एकर द्राक्षबाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तालुका दुष्काळग्रस्त असल्याने विहिरीला पाणी ते कितीसे असणार. परिणामी त्यांच्या द्राक्ष बागेला पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता. पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष शेती करणे जिकिरीचे होत होते. अशा वेळी त्यांना सामुहिक शेततळे योजनेची माहिती मिळाली.
कृषि विभागाने सांगितल्याप्रमाणे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता प्रशांत पाटील यांनी केली. त्यानंतर त्यांच्या द्राक्ष शेतीसाठी शेततळे तयार करणे, शेततळ्यात प्लास्टिक कागद घालणे व शेततळ्यासाठी संरक्षक कुंपण करण्यासाठी कृषि विभागामार्फत एक लाख 75 हजार रुपये अनुदान मिळाले. या अनुदानामधून त्यांनी शेततळे तयार करून शाश्वत पाण्याचा साठा केला आहे.प्रशांत पाटील म्हणाले, सामुहिक शेततळ्यामुळे मी पूर्वीचे अर्धा एकर द्राक्षबागेचे क्षेत्र वाढवून ते साडेतीन एकर केले. सामुहिक शेततळ्यातील पाणी मिळाल्याने माझी सर्व शेती ठिबकवर केली आहे. यासाठीही कृषि विभागाने मला ठिबक संच बसविण्यासाठी अनुदान दिले आहे.
द्राक्षशेतीचे क्षेत्र वाढल्यामुळे प्रशांत पाटील यांना शेतीच्या कामासाठी जास्त मजुरांची आवश्यकता भासू लागली व शेती कामे जलद गतीने करणे गरजेचे झाले. अशा वेळी कृषि विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळपिकांसाठी यांत्रिकीकरणामधून फळशेतीसाठी ट्रॅक्टरबाबतची माहिती त्यांना मिळाली. कृषि विभागाच्या माध्यमातून त्याचा लाभ घेत शेतीसाठी 1 लाख अनुदानाद्वारे ट्रॅक्टर त्यांना मिळाला. त्यामुळे बागेत औषध फवारणीचे काम गतीने होऊ लागले.
पूर्वी एसटीपीद्वारे औषध फवारणी करण्यासाठी जास्त मनुष्यबळ लागत होते व द्राक्षवेलींना व्यवस्थित औषध मिळत नव्हते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत होता. त्यामुळे उत्पादन कमी होत होते. ट्रॅक्टरमुळे औषध फवारणी जलद होऊ लागली. त्यामुळे वेळेची बचत होऊ लागली व इतर कामांना वेळ देता येऊ लागला. सामुहिक शेततळ्यामुळे सर्व शेतीला पाणी मिळाले. पाण्याचा साठाही झाला. शेतीला जोडधंदा करण्याचा विचार श्री.पाटील यांच्या मनात आला. याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या शेततळ्यामध्ये मत्स्यबीज पालन सुरू केले. त्यामुळे त्यांना आर्थिक फायदाही झाला.
प्रशांत पाटील म्हणाले, शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध योजनांमधून मला आर्थिक हातभार लागल्यामुळे माझे जीवनमान उंचावले आहे. यामुळे मी माझ्या बहिणीचे लग्न करु शकलो. माझे जुने कौलारु घर पाडून आता मी नवीन आरसीसी घर बांधण्यासाठी घेतले आहे. माझी घरची परिस्थिती अत्यंत चांगली झाली आहे. एकूणच शासनाच्या कृषि विभागाच्या मदतीने प्रशांत पाटील यांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे.
लेखक - संप्रदा बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
द्राक्षवेलींसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा म्हणजे द्रा...
गंगापूर (जि. नाशिक) येथील दत्तात्रेय देशमाने यांची...
द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण चां...
द्राक्ष पिकासंदर्भात पुण्याजवळील मांजरी येथे राष्ट...