गंगापूर (जि. नाशिक) येथील दत्तात्रेय देशमाने यांची द्राक्षबाग 2006 च्या गारपिटीने होत्याची नव्हती झाली. त्यानंतर कमी जोखमीची पीक पद्धती त्यांनी स्वीकारली. त्यात छोट्या, मात्र नियमित उत्पन्न देणाऱ्या तोंडली, गवती चहा, कढीपत्ता आदी पिकांचा पर्याय निवडला. मागील सात वर्षांत या पिकांच्या मदतीने कर्ज फेडून शेतीत समाधान मिळवणे त्यांना शक्य झाले आहे.
नाशिक शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर गंगापूर गावाजवळ गोदावरीच्या काठालगत जलालपूर शिवारात दत्तात्रेय देशमाने यांची शेती आहे. गंगापूर गावातून नदीवरील कच्चा पूल ओलांडून जलालपूरला जाता येते. शेताच्या मधोमध साधेसे घर, समोर गवती चहाच्या क्षेत्राचा पट्टा, घराजवळ उत्तरेला शेवग्याचे पीक, त्यापलीकडे तोंडल्याची बाग पाहताना एकूणच नीटनेटकेपणा, नियोजन नजरेत भरते.
देशमाने यांच्या घरची आर्थिक परिस्थिती पूर्वी हलाखीची होती. उरातील हिम्मत आणि आईचा आशीर्वाद हेच भांडवल होतं. बहिणींच्या लग्नांची जबाबदारी घेण्याबरोबर स्वत:च्या संसाराची घडी बसविताना वेळोवेळी कसोटींचा सामना करावा लागला. पुस्तकांच्या वाचनाची आणि परिघाबाहेरील जनमानसात फिरण्याची आवड. त्यामुळे दृष्टी व्यापक झाली. अडचणींच्या काळात वाचलेलं "अब्राहम लिंकन' यांचं चरित्र अन् प्रसिद्ध अभिनेता दादा कोंडके यांच्यावर लिहिलेलं "एकटा जीव' या पुस्तकांनी त्यांना मोठा दिलासा दिला.
शालेय शिक्षणानंतर घरची जबाबदारी अंगावर घेतली. घरची जमीन असूनही भांडवल नसल्याने सुरवातीला दुसऱ्यांची जमीन खंडाने करायला घेतली. मित्राच्या मदतीने टोमॅटोसह अन्य भाजीपाला घेतला. वडिलोपार्जित क्षेत्रात 1990 मध्ये 30 गुंठ्यांत माणिकचमन, तर 1993 मध्ये "तास ए गणेश' वाणाची एक एकरावर लागवड केली.
आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा ध्यास होता. दीड एकरावर गुलाबाचा ग्लॅडिएटर वाण फुलत होता. सतत बेभरवशाच्या दरांमुळे अखेर ही शेती बंद केली. सन 1997 ते 2006 या काळात द्राक्ष उत्पादनात एकरी 10 ते 12 टनांचे सातत्य होते. सन 2006 च्या फेब्रुवारीत वादळी पाऊस व गारपिटीने द्राक्षबागेचे होत्याचे नव्हते झाले. सात-आठ लाख रुपयांपर्यंत कर्ज डोक्यावर होते. आणि याच संकटामुळे दत्तात्रेय यांना पीक पद्धती बदलण्याबाबत पुनर्विचार करणं भाग पडलं.
द्राक्षाचं पीक खरं तर चांगलं, पण सांभाळायला अत्यंत नाजूक. खर्चही मोठा; नुकसान झालं तर मोठं. अशा वेळी जोखीम नसणारी कोणती पिकं आपण घेऊ शकतो, हा विचार सुरू झाला. वेलवर्गीय पिकांत भोपळा चांगला पैसा देणारं पीक माहीत होतं. द्राक्षवेली तोडल्यानंतर वर्षभर भोपळा घेतला. त्यातून सुमारे 90 हजार रुपये मिळाले. मात्र भोपळा खर्चीक होता.
द्राक्षबागेत बांधाला तोंडल्याचा एक वेल दहा वर्षांत काढला नसल्याने 500 फुटांपर्यंत मांडवावर पसरला होता. त्यापासून सात महिने उत्पादन मिळत होतं. त्याच्या मार्केटविषयी नाशिकच्या मार्केट यार्डात चौकशी केली..तोंडली बाजारात आणणारे शेतकरी कमीच असल्याचं समजलं. परिसरातील तीन-चार गावांमध्येही कुणाकडे तोंडली नाही म्हटल्यावर द्राक्षबाग काढून 10 × 10 फुटांवर तोंडली लावली. तारी, बांबू, ठिबक पुन्हा नीटनेटकं करून घेतलं.
तोंडली शेती दृष्टिक्षेपात
हिरवा रंग, लांबी व छोटा आकार असेल तर तोंडल्याला हा दर मिळतो.
तोंडली जर जाड, कमी हिरव्या रंगाची असतील तर हाच दर 150 ते 200 रुपये इतका कमी मिळतो.
थंडीत डिसेंबर- जानेवारीत
छाटणीचा हंगाम, आवक कमी, साहजिकच दरही जास्त म्हणजे 800 रुपयांपर्यंत
- जुलै ते ऑगस्ट काळात तोंडली हंगाम फारसा सक्रिय नसतो.
सन 2009 च्या पावसाळ्यात तोंडल्याचा मांडव जास्तीच्या वजनाने जमिनीवर पडला. त्यानंतर कमकुवत बांबू बदलले. नवा अँगल वाढवला. एकरी 70 हजार रुपये खर्च आला. मांडव उभा होईपर्यंतच्या काळात वेल जमिनीवर 15 दिवस पडून होता. तरीही या काळात तोंडल्याने 40 हजार रुपयांचे उत्पन्न दिले.
सन 2010 ला पुन्हा गारपीट होऊन तोंडल्याच्या बागेचे नुकसान झाले. पुढील चार-पाच दिवस मांडव उभा करण्यास लागले. पाने झडली होती. जणू छाटणीच झाली होती. मधल्या काळात पिकाला विश्रांती मिळाली. मात्र त्यानंतर वेलीने जोरदार जोम घेतला. जिथे 8 क्रेटपर्यंत उत्पादन निघायचे तिथे ते 14 क्रेटपर्यंत उत्पादन गेले.
लेखक : ज्ञानेश उगले
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील प्रकाश सीताराम पाटील...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाचा अनियमितपणा मागील काही वर्षांत कमालीचा वाढ...