অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुलाब शेती - प्रगतीची वाट

शेतीतील बेभरवशाच्या उत्पन्नाची जोखीम नको म्हणून अनेक जण नोकरीला प्राधान्य देतात. लातूर जिल्ह्यातील औसा येथील बालाजी माळी यांनी मात्र अभ्यास, ज्ञान घेण्याची आस, कष्ट व पिकांचे नियोजन करण्याची क्‍लृप्ती यातून शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते व कुटुंबाला सुखी-समाधानी ठेवता येते हे सिध्द केले आहे. गुलाबासह फुलशेती त्यांना फायदेशीर ठरली आहे.

गाव, घर न सोडता आई-वडिलांना आधार देत शेतीच करायची असे ठरवून वयाच्या तिशीतील बालाजी नारायण माळी (फुटाणे) कामास लागले. औसा (जि. लातूर) हे त्यांचे गाव. वडिलोपार्जित त्यांची सात एकर शेती. वडील पारंपरिक शेती करीत. त्यातून चार-पाच जणांचे कुटुंब गरिबीचे चटके सहन करीत कसेबसे उदरनिर्वाह करीत होते.
पुढे एकुलता एक मुलगा म्हणजे बालाजी जास्त न शिकता शेतीकडे वळला खरा; पण त्याने वडिलांची पारंपरिक वाट चोखाळली नाही. आपल्या वेगवेगळ्या शेतकरी मित्रांचे शेतीतील अनुभव, सहली, कृषी प्रदर्शने पाहून, मासिके वाचून, शेतीतील अनुभव घेऊन फुलशेती करायची हे मनात बिंबवूनच तो शेतीत उतरला. कुटुंबाला चांगल्या पद्धतीने जगता यावे ही त्यामागील धडपड होती.

ज्ञानवृद्धीतून गुलाबशेतीचे नियोजन

गावालगत रस्त्याकडेच्या तीन एकरच्या जिरायती शेतीत बोअर घेतले.

अंदाजे तीनशे फुटांवर चांगले पाणी लागले; परंतु उसासारख्या पिकाचा मोह बालाजी यांनी धरला नाही. सुरवातीला 12 गुंठे क्षेत्रावर गुलाबाचे नियोजन केले. खात्रीशीर नर्सरीतून 25 रुपयाला एक याप्रमाणे कलमे आणली. शेत हलके असले तरी ते निचरा होणारे होते. त्यात नांगरून, कुळवून मशागत केली. दहा ट्रॉली शेणखत टाकले. गादी वाफे बनवून त्यावर ठिबक अंथरले. लागवड करण्यापूर्वी डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट, फोरेट, कार्बेनडॅझीम खणलेल्या खड्यात टाकून त्यात मागील वर्षी 12 जूनला 660 कलमे लावली. रस शोषणाऱ्या किडी व अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या तर रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या गरजेनुसार आठवड्याला वा पंधरा दिवसाला फवारण्या घेऊन कलमे जोमदार वाढवली. ऍग्रोवन तसेच अन्य कृषी विषयक मजकुराने मोलाची माहिती पुरविली. येणाऱ्या संकटातून, अडीअडचणीतून बालाजी शिकत राहिले. कृषी खात्याच्या संपर्कात राहिल्याने योजनांची माहिती कळली.
पुढे दर दोन महिन्याला छाटणी करून फुटवे वाढवली. सुमारे सहा महिन्यांनंतर टपोरे गुलाब मिळू लागले. सुरवातीला एका कलमापासून दररोज एखादे फूल मिळे. छाटणी, खते, कीडनाशके फवारणी, ठिबक सिंचन, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांतून कलमांचे पोषण झाले. सशक्त फुटवे आल्याने पुढे दर दिवशी दोन-तीन फुले मिळू लागली. वर्षातील किमान दोनशे दिवस फुले मिळत राहिली.

आर्थिक ताळेबंद सुधारला

मार्केटचे मोठे ठिकाण म्हणजे लातूर हे 20 किलोमीटर अंतरावर असल्याने बालाजी सुरवातीला स्वतः तोडणी व पॅकिंग करून दररोज सकाळी फुले मंडईला देण्याऐवजी मुख्य विक्रेत्यांना पुरवत. हंगाम नसलेल्या काळात 100 ते 150 रु. प्रति शेकडा तर हंगामात लग्नसराई, सणावारांचे दिवस व निवडणुकांच्या काळात 300, तर काही वेळा 500 रु. प्रति शेकडा भाव मिळाला. सरासरी भाव प्रति फूल दोन रुपये हमखास मिळाला. वर्षातले दोनशे दिवस 650 कलमांना प्रति कलम सरासरी दोन फुले धरली तरी हजार फुले हमखास मिळत म्हणजे दोनशे दिवस जरी धरले तरी दोन लाख फुले गेल्या वर्षी मिळाली. यातून बालाजी यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यामध्ये त्यांनी गलांडाचे आंतरपीक घेऊन 15 हजार रुपयांचे उत्पन्न बोनस मिळविले. रान तयार करण्यापासून खते, कलमे, कीडनाशके, पाणी, ठिबक, प्रवासभाडे, स्वतःची मजुरी धरली, तर तो खर्च असा एकूण 50 हजार रुपयांपर्यंत आला. कृषी विभागाकडून 10 हजार रुपये अनुदान मिळाले. एकूण हिशोब विचारात घेता सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न 12 गुंठ्यात एका वर्षात मिळाले. पूर्वानुभव नसताना निरीक्षण, कष्ट व अभ्यासातून जे काही साध्य झाले ते बालाजी यांना पुढील शेतीसाठी प्रेरणादायी ठरले.

पूर्णवेळ आता शेतीतच

बालाजी आपल्या उर्वरित शेतीत दोन एकर ऊस, गहू, हरभरा, सोयाबीन घेतात. त्यातून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. उसातूनही उत्पन्न मिळते. या पिकांनी उत्पन्नाचा आधार दिल्याने फुलशेती वाढवण्याचा निर्णय बालाजी यांनी घेतला आहे. यातून दररोज ताजा पैसा हाती खेळत राहिल्याने घर खर्चाला तसेच शेतीतील नेहमीच्या खर्चासाठी दुसऱ्यांकडून पैसे घेण्याची गरज भासत नाही, त्यामुळे आणखी गुलाब 20 गुंठे, यलो डेझी (फिलर) 10 गुंठे व ऍस्टर 10 गुंठे अशी एकरभर शेती त्यांनी फुलशेतीखाली आणली आहे. जमीन हलकी, निचऱ्याची असल्याने अन्य पिकांपेक्षा फुलपिके त्यात चांगल्या प्रकारे येऊ शकते हे त्यांना मनोमन पटले आहे. शहरालगतच्या शेतीचा उपयोग पुरेपूर करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. केवळ थोड्या फुलांच्या विक्रीसाठी लातूरला जा-ये करणे किफायतशीर नसल्याने क्षेत्र व पर्यायाने उत्पादन वाढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, त्यामुळे पूर्ण वेळ शेतीत वाहून घेणे त्यांना शक्‍य झाले आहे. पूर्वी घरून येऊन-जाऊन शेती पाहणारे बालाजी आता अन्य ठिकाणी वेळ घालवत नाहीत. घरच्या सदस्यांनाही आनंदाने शेतीत काम करता येते. या उद्देशाने व यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतीत निष्ठेने काम केल्यास महिन्याचा चांगल्या नोकरदारांचा पगारही नक्की मागे पडतो हे त्यांनी कमी क्षेत्रावरून दाखवून दिले आहे.

बालाजी झाले अनुकरणीय

खते देणे, कीडनाशक फवारणी, छाटणी, रोग-किडी आदींबाबत ज्ञान वाढल्याने बालाजी त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला. परिसरातील अन्य तरुण शेतकरीही बालाजी यांचे अनुकरण करीत असून, बरेच जण त्यांचे मार्गदर्शनही घेत आहेत. ही बाब समाधान देणारी आहे, त्यामुळे नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय चुकला नाही हे त्यांनी अनुभवातून समवयस्क मित्रांना दाखवून दिले आहे. आज परिसरातील लोक गुलाबवाला बालाजी म्हणून त्यांना ओळखत आहेत.
(लेखक लातूर कृषी विभागांतर्गत कार्यरत आहेत.) 

संपर्क - बालाजी नारायण माळी (फुटाणे) - 9767520329 
मु. पो. औसा, ता. औसा, जि. लातूर.
- रमेश चिल्ले - 9422610775

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate