অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ

चिंचणी (ता. डहाणू, जि. ठाणे) येथील काशिनाथ पाटील यांची यशकथा

ठाणे जिल्ह्यातील चिंचणी (ता. डहाणू) येथील काशिनाथ पाटील हे चौदा एकरावरील क्षेत्रावर केशर आंबा फळबाग 25 वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने जोपासत आहेत. एकेकाळी ओसाड असलेल्या माळरानावर आमराई फुलवली आहे. रसायनमुक्त फळे ही कल्पना राबविणाऱ्या काशिनाथ पाटील यांची ही यशकथा. 
डहाणू तालुक्‍यातील चिंचणी येथील काशिनाथ पाटील हे मूलतः शिक्षक. वीस वर्षे शिक्षकी पेशात काढल्यानंतर शेतीच्या ओढीने 1989 मध्ये मुदतपूर्व सेवानिवृत्ती स्वीकारली. वडिलोपार्जित शेती होती फक्त एक एकर. मात्र स्वस्तात मिळाली म्हणून 25 वर्षांपूर्वी चिंचणी शेजारील ओसारवाडीत 14 एकर माळरानाची जमीन खरेदी केली होती. आज ओसाड असलेल्या या जमिनीचे रूपांतर काशिनाथ पाटील यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे सुंदर अशा आमराईत झाले आहे. ते गेल्या 25 वर्षांपासून रासायनिक घटकांचा वापर न करता केशर आंब्याच्या झाडांची जोपासना करत आहेत. 
सुरवातीला ते मिरचीचे उत्पादन घेत असत. 1991 मध्ये मिरचीचे चांगले उत्पादन मिळाले. या उत्पन्नातून 22 एकर शेती खरेदी केली. शिक्षकी पेशात काम केल्यामुळे शेतीविषयक माहिती वाचनाद्वारे मिळवत असत. त्यातून सेंद्रिय शेती पद्धतीची माहिती होत गेली. त्यांनी दशपर्णी अर्क, विविध प्रकारच्या पेंडी, निंबोळी अर्क यांचा शेतामध्ये वापर सुरू केला. हळूहळू रासायनिक कीडनाशकांचा व खताचा वापर कमी करत 1995 पासून पूर्णपणे बंद केला. रासायनिक कीडनाशकांचा वापर असलेले अन्नधान्य स्वतःही खायचे नाही, तसेच समाजालाही विकायचे नाही, हा मूलमंत्र काशिनाथ पाटील यांनी अंगी बाणवला आहे. 
सुरवातीला चिकूची लागवड होती. मात्र एप्रिल आणि मे महिन्यांत पाणी कमी पडत असल्याने काही झाडे वाळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आंबा लागवडीचा निर्णय घेतला. चिकूच्या बागेतच 10 मीटर x 10 मीटर अंतरावर केशर आंबा लागवड केली. अलीकडच्या नऊ-दहा वर्षांत केशर आंब्याच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. 

...अशी आहे आंबा लागवड

  • सुरवातीला पाटील यांनी 33 फूट x 33 फुटाच्या अंतराने केशरची लागवड केली. या अंतराने एकरी 40 रोपे बसत होती.
  • अलीकडे त्यांनी सघन पद्धतीवर भर दिला असून 16 फूट x 16 फूट अंतराप्रमाणे एकरी 160 रोपे बसवली आहेत. झाडांच्या योग्य वाढीसाठी उंची व फांद्यांची छाटणी वेळोवेळी करत आकार मर्यादित ठेवला जातो.
  • आज त्यांच्या चौदा एकरांच्या वाडीत सुमारे चौदाशे "केशर'ची रोपे वाढताहेत. तर काही प्रमाणात हापूस आणि पायरीचीही रोपे आहेत.

सेंद्रिय खतांचे नियोजन असे केले...

आंबा हे बहुवार्षिक पीक असल्याने सेंद्रिय खतांचाच वापर करण्याविषयी पाटील यांचा आग्रह असतो. रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खतांचा खर्च दहा ते वीस टक्के अधिक आहे. तरीही पिकात सातत्य आणि वाढीसाठी अधिक उपयुक्त ठरत असल्याचे ते आवर्जून सांगतात. 
1) वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी कोंबडी खताचा वापर करतात. साधारणपणे मे महिन्यात आंब्याच्या रोपांच्या चारी बाजूला चार खड्डे खणून प्रति झाड पाच ते सात किलो कोंबडी खत टाकतात. वर्षभरात त्यांना किमान पाच टन कोंबडी खत लागते. 
2) सेंद्रिय खतासोबत साधारण आठ ते दहा दिवसांच्या अंतराने ते ईएमचा एक डोस देतात. एक लिटर ईएम द्रावण, दोन किलो काळा गूळ, वीस लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवस एका ड्रममध्ये कुजवत ठेवतात. हे ईएम ठिबकच्या माध्यमातून बागेत सोडले जाते. ईएमच्या मदतीने जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते. 
3) पावसाळ्यानंतर झाडांना एकरी साधारण पाचशे किलो गांडूळ खत टाकले जाते. त्यासाठी बागेत गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. गांडूळ खत निर्मितीमध्येही ते ईएम द्रावणांचा वापर करतात. दीड महिन्यातच चांगले गांडूळ खत तयार होते. गेली 15 वर्षे त्यांचा हा दिनक्रम बनला आहे. 

मोहोराच्या नियोजनासाठी झाला "ऍग्रोवन'चा फायदा

- दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये आंब्यांना मोहोर येत असे. त्याची फळे जून महिन्याच्या पाच ते 10 तारखेपर्यंत येत असत. मात्र पाऊस व अन्य नैसर्गिक घटकांमुळे फळांचा दर्जा चांगला मिळण्यात अडचण येई. तसेच दरही कमी मिळत. - ऍग्रोवन'मध्ये प्रकाशित झालेला मोहोराच्या नियोजनाविषयीचा लेख वाचला. त्यात पॅक्‍लोब्युट्राझॉलचा उल्लेख होता. रसायनमुक्त फळ पिकवताना त्याचा वापर करावा की करू नये, असा संघर्ष मनात झाला. मात्र अनेक तज्ज्ञांशी बोलल्यानंतर या रसायनांचे अवशेष फळामध्ये राहत नसल्याचे समजल्याने या वर्षी त्याचा वापर केला. त्यामुळे आंब्यांना डिसेंबरमध्ये मोहोर येऊन फळे एप्रिलमध्ये मिळाली. आता दुसरा टप्पा नेहमीप्रमाणे मेअखेर ते जून या कालावधीत मिळेल. 
-

केशर'चे अर्थकारण

लागवडीनंतर साधारण पाच वर्षांनी फळ मिळायला सुरवात होते. आंब्याचा हंगाम अंदाजे दीड ते दोन महिने चालतो. 
  • आकारानुसार मोठे, मध्यम आंबे व लहान आंबे वेगळे केले जाते. प्रतवारीमध्ये डागाळलेले आंबे वेगळे करून व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे आंब्याचे डझन अथवा किलोनुसार पॅक केले जातात.
  • बागेवर होणारा खर्च काही प्रमाणात भागवण्यासाठी हिरवी मिरची, तूर, भेंडी, पपई, तोंडली, गवार अशी आंतरपिके ते घेतात. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. या वर्षी नत्र स्थिरीकरण आणि आंतरपीक म्हणून तूर लावली होती. त्यातून दुहेरी फायदा झाला. तुरीच्या पाल्याचा थर जमिनीवर पडलेला आहे. त्याचाही जिवाणू वाढीसाठी लाभ होणार आहे.

आंबा बागेवरचा खर्च

सेंद्रिय खते - एक लाख रु. 
फवारणी खर्च - 80 हजार रु. 
मशागत, रखवाली व अन्य देखभाल, तण काढणी- 90 हजार रु. 
विजेचे बिल -25 हजार 
आंबे काढणी - 55 हजार रु. (प्रति किलो 1.25 रुपया 
बॉक्‍स आणि पॅकिंगचे साहित्य - 55 हजार रु. (प्रति किलो 1.25 रुपया) 
-------------- 
एकूण खर्च - 4 लाख 5 हजार रुपये. 
गेल्या दोन वर्षांतील दर (प्रति किलो)- 
वर्ष--कमीत कमी---सर्वाधिक--सरासरी--उत्पादन--उत्पन्न 
2013--15 रु.--50 रु.---25 रु.---42 टन अपेक्षित--10 लाख 50 हजार रुपये 
2012--20 रु.--35 रु.---25 रु.--- 17.5 टन-- 4 लाख 37 हजार पाचशे रुपये 

बागेवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव आणि घ्यायची काळजी

  • केशरवर साधारणपणे तुडतुडे, मावा, फुलकिडे, मिलीबग या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळतो.
  • मोहोराची बोंडे दिसू लागतानाच्या काळात व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशीची (दोनशे लिटर पाण्यामागे एक लिटर) पहिली फवारणी घेतली जाते.
  • तुडतुड्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मोहोर फुटल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी फवारणी केली जाते.
  • कोवळ्या मोहोरावर भुरी हा रोग येतो. त्यासाठी ट्रायकोडर्मा आणि सूडोमोनॉस यांच्या (दोनशे लिटर पाण्यामागे एकत्रित प्रत्येकी एक लिटर) मिश्रणाची फवारणी केली जाते. पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी घेतो. गरज वाटल्यास तिसरीही फवारणी घेतली जाते.

पाणीपुरवठ्याचे नियोजन

  • बागेत तीन बोअर आहेत.
  • संपूर्ण बागेला ठिबकद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
  • प्रत्येक तीन दिवसांनी एक ते दीड तास असा गरजेनुसार सिंचन केले जाते.
काशिनाथ भाई पाटील, 9923050446

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate