‘‘केळी’’ म्हटले की, जळगाव, नांदेड जिल्हे आठवतात कोणीतरी धाडसी, प्रयोग करणारा पुढे येतो त्यातून प्रयोग यशस्वी झाला तर त्या भागातले शेतकरी त्या पिकाकडे वळतात, मग त्या गावाची ती ओळख बनते. असाच धाडसी प्रयोग अकोला जिल्ह्यातील ‘मासा’ या गावच्या शेतकऱ्याने केला. इथली जमीन मुरबाड असूनही कसदार जमिनीला लाजवेल अस केळीच पीक त्यांनी घेतलं आणि नवा केळीचा ‘मासा’ पॅटर्न तयार झाला.... त्याची ही यशोगाथा.....!!
अकोला तालुक्यात कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग, उडीद अशी पारंपरिक पिके घेतली जातात. तालुक्यातील ‘मासा’ हे देखील त्यातीलच एक गाव. अनेकदा अस्थिर बाजारभाव, पीक उत्पादन खर्चात होत असलेली सात्यत्याने वाढ, मजुरी वाढ यामुळे पारंपरिक पिके परवडेनाशी झाली आहेत. मासा गावातील प्रमेश फाले यामुळेच नव्या पर्यायी पिकांच्या शोधात होते. घरच्या 17 एकर शेतातील पीक पद्धतीत त्यांनी बदल करण्याचे ठरवले. प्रमेश यांचे एमए डिएड पर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या कोणतीही नोकरी न करता ते पुर्णवेळ वडीलांना शेतीत मदत करतात. प्रमेश यांचे गेल्या काही वर्षापासून केळीचे पीक घेण्याचा मानस होता, त्याचीच प्रेरणा घेत प्रमेश केळीकडे वळण्याचे ठरवले. मासा गावाशेजारी फाले कुटुंबाचे अडीच एकर क्षेत्र आहे.
या शेतात त्यांनी मागील वर्षी केळी लागवडीची तयारी केली. त्यासाठी ग्रेड नैन या उतीसंवर्धीत रोपाची निवड केली. सुमारे अडीच एकर क्षेत्रात चार हजार रोपे गादी वाफ्यावर लावली. लागवडीपूर्वी खेल नांगरट, करून त्यात 15 ट्रॉली शेणखत वापरले, केळीतील पहिलाच अनुभव होता. त्यामुळे तांत्रिक मार्गदर्शनाची गरज होती, प्रमेश यांच्या गावापासून कृषी विज्ञान केंद्र काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तेथील विषय विशेषज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवले, त्यांनी दिलेल्या सल्यानुसार खतांचा वापर केला केळीचे चांगले उत्पादन घेण्यामागे खतांचे केलेले व्यवस्थापन महत्त्वाचे ठरल्याचे प्रमेश म्हणाले, त्यांनी लागवडीवेळी एकरी 10 पोती निंबोळी पेंड, दहा पोती गांडूळ खत यांचा वापर केला ठिबकाद्वारे पाणी व्यवस्थापन केले. ठिबक मधुनच विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्य वेळोवेळी दिली. यामुळे केळीची चांगली वाढ झाली. एक झाड 10 ते 12 फुटापर्यंत वाढले, केळीला घड ही चांगले निसवले.
अडीच एकरात लागवड केलेल्या केळीचे समाधानकारक म्हणजे 100 टनांपर्यंत एकरी 40 टन उत्पादन मिळाले. सरासरी सात रुपये प्रती किलो असा दर मिळाला प्रती घड सरासरी 30 किलो वजनाचा होता. सर्व माल व्यापाऱ्यांनी जागेवरुन नेला त्यामुळे वाहतुकीचा खर्च लागला नाही, खर्च वजा जाता सुमारे चार लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले.
कृषी विभागाच्या आत्मा विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मासा गावात केळीपिकाची शेतीशाळा घेतली त्यातून शेतकऱ्यांना खत नियोजन, कीड व रोग नियंत्रण, खोडवा, ठिबक सिंचन व पाणी व्यवस्थापन, पीक उत्पादन वाढ, विक्री व्यवस्थापन आदी बाबींवर माहिती देण्यात आली. यासाठी तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, आत्माचे तंत्रव्यवस्थापक विजय शेगोकार, कृषी सहाय्यक रवींद्र माळी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. माती पाणी परीक्षण, जमिनीचे पूर्व मशागत, हिरवळीच्या खताचा वापर, माती परीक्षणानुसार खतांचा वापर, ठिबक सिंचन, सूक्ष्म अन्न्द्रव्यांच्या फवारण्यां, खोडवा व्यवस्थापन व तंत्राचा या तंत्राचा वापर करण्यास त्यामुळे शेतकरी प्रवृत्त झाले. पीक बदलाचे फायदे लक्षात येऊ लागल्यानंतर नियोजनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. आत्मा प्रकल्पांतर्गत या गटांची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे मासा व शेजारील डोंगरगावमध्ये 16 शेतकरी गट तयार झाले आहेत.
मासा गावात प्रमेश या तरुणाने केळीची प्रथमच लागवड करुन चांगल्या उत्पादनाचा श्रीगणेश केला त्याच्यापासून प्रोत्साहन घेत आता गावातील अन्य युवा शेतकरी पुढे येऊ लागले आहेत.त्यातून गावातील 10 शेतकऱ्यांनी येत्या हंगामात केळीची लागवड केली लगतच्या डोंगरगावातही शेतकरी केळी पिकाकडे वळत आहेत.
युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी,
अकोला.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
भारतात ह्या वंशातील एकूण १४ जाती असून त्यांपैकी ३-...
राज्याच्या बऱ्याच भागात आता थंडी सुरू झाली आहे, त्...
या विभागात केळी फळाविषयी माहिती दिली आहे.
केळी आणि तृणधान्ये यांचे पोषक मुल्ये यामध्ये दिली ...