वेशीवरच्या पाऊलखुणा : ओढा
ओढ लावी ओढा !
एखाद्या गावाचा इतिहास त्या गावाच्या स्मृतिपटलाच्या गाभ्यात दडलेला असतो. तो गावातील खाणाखुणांमधून डोकावत राहतो. त्याचे संदर्भ हरवतात, त्याची भाषाही गहाळ होते अन् स्मृतिपटलावर फक्त राहतात ती तोडकीमोडकी चित्रे. या चित्रांचा क्रम लावत एखाद्या गावाचा इतिहास आपले अस्तित्व अन् वैभवाच्या खुणा दाखवीत राहतो. अशीच काहीशी स्थिती ओढा गावाची आहे. नाशिकच्या इतिहासाला काळाराम मंदिराच्या रूपाने अमूल्य भेट दिलेल्या शिल्पकाराचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गाव भेट देणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या इतिहासाबद्दलची ओढ वाढवते पण, हरवलेल्या इतिहासामुळे तहान काही भागत नाही.
नाशिकहून औरंगाबादकडे जाताना शिलापूरपासून पुढे ओढा नावाचे छोटेसे चिरेबंद गाव लागते. गोदेच्या कुशीत पहुडलेल्या ओढा गावाची नैसर्गिक रचनाच आकर्षित करणारी आहे. ओढा परिसरात पूर्वी वडाची खूप झाडे होती. त्यामुळेच वडांचे गाव पुढे ओढा म्हणून ओळखले जाऊ लागले, असे ग्रामस्थ सांगतात. ओढा गावात प्र्रवेश करण्यासाठी आता महामार्गावरून खूप रस्ते आहेत. मात्र, पूर्वी अशी स्थिती नव्हती. गावात प्रवेश करायचा असेल, तर गावच्या वेशीतून प्रवेश करावा लागे. आजही ओढा गावाची मोठी दगडी वेस पाहायला मिळते. मात्र, गावाभोवतीच्या या तटबंदीची पडझड झाली आहे. कालांतराने गावही वाढल्याने तटबंदीच्या खुणाखुणाही नाहिशा झाल्या आहेत. वेशीवर दगडात कोरलेली नक्षीकाम अन् प्राण्यांची सुंदर शिल्पे आहेत. मात्र, वेशीच्या वरच्या भागाची पडझड झाल्याने वेशीचे सौंदर्य धोक्यात आले आहे. किल्ल्यासारखी शान असलेल्या गावाच्या या भव्य वेशीला नवी पिढी ‘गेट वे ऑफ ओढा’ म्हणते. गेट वे ऑफ ओढातून आत गेल्यावर हनुमान मंदिर व गावपण जपणारी जुन्या बांधणीची घरे पाहायला मिळतात अन् समोर दिसतो जहागीरदार ओढेकरांचा राजमहाल. हा राजमहाल आता जमीनदोस्त झाला आहे मात्र, वेशीची भव्यता समोर उभा नसलेला राजमहालही डोळ्यासमोर कल्पनाचित्र उभे करतो.
दोन ते तीन एकरांत पसरलेला हा वाडा. वाड्याला किल्ल्यांसारखे चार बुरूज अन् चारही बाजूंना अप्रतिम मनोरे. या भिंतीच्या मधोमध भव्य लाकडी दरवाजा. हा दरवाजा तोडता येऊ नये म्हणून त्याला टोकदार लावलेल्या सळ्या. त्या दरवाजासमोर सहा फूट उंचीचे भाले घेऊन उभे असलेले पहारेकरी. दरवाजावर आकर्षक नक्षीकाम अन् दरवाजाच्या मधोमध चौकटीवर गणेशपट्टी. दरवाजा एकदा बंद झाला की, फक्त महत्त्वाच्याच व्यक्तीला छोट्या दिंडी दरवाजातून आत घेणारा वेसकर. महालात भिंतीची उंची पंधरा ते वीस फूट, रुंदी साधारण सात ते आठ फूट. मोठे चौक, पडव्या, चौपाळे अन् आतील भिंतीवर काढलेली अनोखी चित्रे हे वाड्याचे थक्क करणारे ऐश्वर्य डोळ्यांचे पारणे फेडते. हे त्यावेळेच्या ओढेकरांच्या राजमहालाचे वर्णन आहे. आज राजमहाल जमीनदोस्त झालेला दिसतो. मात्र, त्याच्या खाणाखुणा हे वैभव डोळ्यापुढे उभे करतात. सध्या राजमहालाच्या केवळ एका पडक्या भिंतीच्या खुणाच उरल्या आहेत पण, पेशवाईत या वास्तूने पराक्रम पाहिला आहे. त्यामुळे ऐतिहासिक ओढ्यातील हा खजिना ओढ लावतो.
सरदार रंगराव ओढेकरांना माधवराव पेशव्यांनी जहागिरी दिली होती म्हणून त्यांना पेशव्यांचे जहागीरदार म्हटले जायचे. पेशव्यांच्या मर्जीतील सरदार म्हणून ओढेकरांचे नाव घेतले जाते. मंत्रभूमीचा वारसा जपणाऱ्या नाशिकमधील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर म्हणजे नाशिकचे धार्मिक वैभव. काळाराम मंदिर पूर्वी लाकडी मंदिर होते. या मंदिरात सरदार रंगराव ओढेकर यांच्या मातोश्री ओढ्यातून पूजेसाठी पंचवटीत येत. ओढेकरांच्या मातोश्रींच्या इच्छेनुसार व सवाई माधवराव पेशवे यांच्या सल्लामसलतीने काळाराम मंदिर जीर्णोद्धाराचे काम १७८०-८२ च्या सुमारास हाती घेण्यात आले. साधारणत: १२ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर काळ्या पाषाणात शिल्पांनी नटलेले आजचे काळाराम मंदिर उभे राहिले. त्या वेळी मंदिराचा कळस २० किलो सोन्याने मढविण्यात आला होता. त्याकाळी या बांधकामासाठी २३ लाखांचा खर्च आला होता. काळाराम मंदिरावर सोन्याचा कळस चढविल्यास तुमचा वंश वाढणार नाही, असे रंगराव ओढेकरांना एका ज्योतिषाने सांगितले होते.
मात्र, त्यांनी ठरल्याप्रमाणेच सगळे होईल, असे सांगत मंदिरावर सोन्याचा कळस चढविला, असेही ग्रामस्थ सांगतात. माधवराव पेशव्यांनंतर मात्र पराक्रमी रंगराव ओढेकरांची बरीच ओढाताण झाली. आनंदराव गायकवाड (१८००-१८१८) हा आजोळी बडोद्यास नेमणुकीवर असताना त्याचा राज्यकारभार रंगराव ओढेकर यांच्याकडे दिवाण म्हणून देण्यात आला. १८०३ च्या दरम्यान रंगराव ओढेकरांना आपल्या अधिकारावर गदा येत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी होळकरांच्या दरबारचा आश्रय घेतला. होळकरांनी ओढेकरांच्या मदतीने धारकराचा मुलूख लुटला. तेव्हा रंगराव दौलतराव शिंद्याकडे गेले. शिंद्याने ओढेकरांच्या मदतीने नऊ वर्षे धारच्या राज्यावर स्वाऱ्या करून पुष्कळ प्रांत व पैसाही मिळविला. या इतिहासातील पाऊलखुणांतून सरदार ओढेकरांबद्दल तुटकतुटक माहिती मिळते.
ओढेकरांच्या महालाच्या मागील बाजूस व नदीच्या काठी नीलकंठेश्वर महादेवाची दोन दगडांच्या बांधणीतील सुंदर मंदिरे आहेत. इतरही अनेक मंदिरे या परिसरात आहेत. हा परिसर ओढा ग्रामपंचायतीने उद्यान म्हणून चांगल्या पद्धतीने विकसित केल्याने येथे पर्यटकांची रेलचेल असते. येथील दोन समाधी स्थळेही पाहण्यासारखी आहेत. तसेच, उजव्या सोंडेच्या गणपतीचे प्राचीन मंदिरही येथे आहे. या मंदिराची बांधणीही पेशवेकालीन आहे. येथे नेहमी धार्मिक कार्यक्रम होतात. ओढेकरांच्या राजमहालाच्या मागील बाजूस असलेले तातोबा मंदिर पाहण्यासारखे आहे. हे मंदिर १३-१४ व्या शतकातील हेमाडपंती प्रकारातील आहे. याला तातोबा मंदिर म्हटले जात असले, तरी हे मंदिर नाही. तातोबा नावाची गावातील एक व्यक्ती येथे दररोज दिवा लावत असे. त्यामुळे या वास्तूला तातोबा मंदिर असे नाव पडले. या वास्तूत कोणत्याही देवाची मूर्ती नाही.
या वास्तूचा गाभा सभागृहाप्रमाणे आहे. प्राचीन काळात या वास्तूचा वापर वादविवाद, चर्चा, कविसंमेलन व कीर्तनांसाठी केला जात असेल असे पुरातत्त्व अभ्यासक सांगतात. त्यामुळे ही वास्तू अत्यंत महत्त्वाची आणि प्राचीन काळातील अनेक गूढ परंपरा व संस्कृतीची उकल करणारी आहे. राज्य पुरातत्त्व खात्याने ही वास्तू संरक्षित केली आहे. या वास्तूच्या बाहेर काही समाध्याही आहेत. तेथील व मंदिरावरील शिल्पे एका वेगळ्याच संस्कृतीकडे आपल्याला घेऊन जातात. ओढा परिसर हा झपाट्याने विकसित होत आहे. येथील प्रगतिशील द्राक्ष उत्पादक प्रसिद्ध आहेत. महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांना ओढा आकर्षित करतो. ओढ्याचा ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मात्र येथे काहीच माहिती मिळत नाही. त्यामुळे ओढेकरांनी सरदार ओढेकरांच्या इतिहासाचे संकलन करण्याची गरज आहे, तरच ओढ्याची ओढ सार्थकी लागू शकेल.
अंतिम सुधारित : 4/24/2020
“पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानाची माहिती येथे देण्य...
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभि...
‘एक गाव तीन तुकडे’ किती विचित्र वाटतं ना? एका गावा...
डोंगरपायथ्याशी वसलेलं महाराष्ट्रातलं माळीण गाव.