ही एका लहान शेतक-याची कथा आहे ज्यानं पडीक कोरड्या जमिनीतून जगण्याचा प्रयत्न करणा-या साधनसंपत्तीहीन गठ्ठाछाप शेतक-यांपेक्षा वेगळी वाट निवडली. त्याच्या उत्कट ‘जीवनावरच्या प्रेमानं’ त्याला एक चांगलं राहणीमानंच मिळालं असं नाही तर, सर्वात महत्वाचं म्हणजे, इतर अनेक शेतक-यांना त्याचा आदर्श घेण्याची स्फूर्ती मिळाली आहे.
चंद्रण्णा, एक तरूण शेतकरी आहे, त्याला आधी "नर्सरी चंद्रण्णा’" म्हणायचे आता "गांडूळखत चंद्रण्णा" म्हणतात. त्यानं तीन वर्षात गांडूळखत आणि गांडुळांच्या विक्रीतून १ लाख ४० हजार रुपये कमवले आहेत. त्याच्या भागात तो आता एक दंतकथाच बनला आहे कारण तिथं एका लहान शेतक-याचं वार्षिक उत्पन्न १५००० हजार रुपयांपेक्षा जास्त नसतं.
एक आदर्श गांव, गैरसोयींनी भरलेलं वातावरण, अशा स्थितीत चंद्रण्णा टुमकुरलाहळ्ळी या ६५० उंबरे असलेल्या गांवात राहतो. कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात मोलाकामुरु तालुक्यात हे गांव आहे. या गांवात मागासलेल्या समुदायांचं प्राबल्य आहे – ४१० अनुसूचित जातीची कुटुंबं, १०० मुसलमान आणि १०० लिंगायत कुटुंबं मिळून ३८०० लोकसंख्या आहे इथं. गांवाची जमीन अंदाजे ३,३२२ हेक्टर आहे, यापैकी १५ टक्के कोरडवाहू आणि ३.५ टक्के जमीन कूपनलिकेच्या सिंचनावर आहे. उर्वरीत २,६९५ हेक्टर (८१.५ टक्के) जमीन सामायिक जमीन आहे ज्यामध्ये पडीक जमीन, सामायिक चरण्याची जमीन, आणि ‘राखीव जंगल’ आहे जिथं प्रसंगी केवळ झाडंझुडपं दिसतात. या प्रदेशात, साधारणतः, हलकी लाल वालुकामय जमीन आहे.
सगळीकडे दगड पसरलेल्या अवस्थेतील हे गांव फायदेशीर शेतीसाठी काही आदर्श नाही. वार्षिक पाऊस सरासरी ५०० मिलीमीटरपेक्षा कमी असतो, त्यामुळं इथले शेतकरी भुईमूग लावण्याचा जुगार खेळतात, वर्षानुवर्ष हे एकमेव नगदी पीक इथं घेतलं जातं. ३० वर्षांहून अधिक काळ भुईमूग हे एकच एक पीक घेतल्यानं, त्याचं उत्पादन घसरत जाऊन प्रति हेक्टर ८ क्विंटल इतकं तुटपुंजं झालं आहे. शेती हा काही फार फायद्याचा व्यवसाय नसला तरी, बहुतांश लोक अद्याप जगण्यासाठी शेती आणि मजुरीवर अवलंबून असतात. साहजिकच, या गांवातले लोक वर्षाचा बहुतांश काळ स्थलांतरच करतात.
अशा पार्श्वभूमीवर, चंद्रण्णाचं उदाहरण दाखवतं की मनापासून काम केलं आणि स्वतःवर विश्वास असेल तर शेती हा एक अवलंबून राहण्याजोगा उद्योग बनू शकतो. ही काही एका रात्रीतली यशोगाथा नाही तर विविध संस्थांनी या गांवातील शेतक-यांना देऊ केलेल्या संधींचा वापर करण्याचा एक शिस्तबद्ध प्रयत्न आहे.
गरीब शेतकरी कुटुंबातल्या चंद्रण्णाला, ३ एकर कोरडवाहू शेती मिळाली, त्यापैकी १ एकर पडीक जमीन आहे. त्यामुळं २ एकर जमिनीची मालकी असणारं हे कुटुंब शेतमजुरीवरच जास्त अवलंबून होतं. आपल्या मुलानं शिकावं असं त्याच्या पालकांना वाटे. पण गरिबीमुळं तो विद्यापीठ-पूर्व स्तरापर्यंतच पोचू शकला. त्याला परत यावं लागलं आणि पालकांसोबत शेतीत जुंपावं लागलं. कर्नाटक पाणलोट विकास (KAWAD) प्रकल्पात, AME फाऊंडेशन स्रोत संस्थेच्या खाली, चंद्रण्णानं एका स्व-मदत गटात (SHG) प्रवेश घेतला.
२००० मध्ये, चंद्रण्णा, तिप्तूर इथं, BAIF ग्रामविकास संस्था, कर्नाटक (BIRD K) इथं आयोजित रोपवाटिका प्रशिक्षणात सहभागी झाला. पण त्याचवेळी शेतक-यांच्या दुस-या गटाला दिल्या जाणा-या गांडूळखत प्रशिक्षण कार्यक्रमात त्याला अधिक रस होता. शक्य होईल तेव्हा तो त्यात सामील होणार होता. गांडूळ पाळणं आणि गांडूळखत तयार करण्याचं त्यानं डोक्यात घेतलं.
रोपवाटिका प्रशिक्षणाहून परतल्यावर त्याच्या गटाला १५,००० रोपांची वाटिका तयार करण्याची संधी मिळाली. ही कामगिरी चंद्रण्णावर सोपवण्यात आली. त्यानं २००० पासून सलग तीन वर्ष ही वाटिका उभारली. २००३ मधल्या पाणलोट प्रकल्पात त्याची रोपवाटिका उत्कृष्ट ठरली आणि तो ‘नर्सरी चंद्रण्णा’ म्हणून लोकप्रिय झाला.
एक साध्याशा सुरुवातीमधून घेतलेली आश्चर्यकारक झेप - गांडूळखताबद्दलची त्याची उत्सुकता वाढू लागली. त्या प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या थोड्याशा ज्ञानातून त्यानं गांडुळाच्या स्थानिक जाती नारळाच्या करवंट्यात वाढवण्याचा प्रयत्न केला. पण ती जगली नाहीत.
२००३ मध्ये, चंद्रण्णानं KAWAD प्रकल्पाच्या मदतीनं ६ x ३ x ३ फूट आकाराचे चार गांडूळखत खड्डे बनवले. मात्र या खड्ड्यांचा वापर कसा करायचा ते त्याला माहिती नव्हतं. त्यानंतर GUARD च्या एका कर्मचा-यानं २ किलो गांडूळं आणली. त्यांसाठी चंद्रण्णाला ३०० रुपये खर्च आला. २ किलो गांडूळांपासून त्यानं २० क्विंटल गांडूळखत तयार केलं जे त्यानं आपल्या २ एकरातील नाचणी पिकाला घातलं. गांवात यापूर्वी कुणी नाचणी पिक घेतलं नव्हतं तेव्हा हादेखील एक प्रयोगच होता. २ एकरांतून त्याला १४ क्विंटल उत्पन्न मिळालं.
२००४ मध्ये, त्यानं ६ क्विंटल चांगल्या प्रतीचं गांडूळखत आणि २ ट्रॅक्टर शेणखत (२ टन) त्यासोबत DAP चं एक पोतं २ एकराला घातलं. यावेळी त्यानं भुईमूग घेतला आणि त्याला २० पोती म्हणजे ९ क्विंटल भुईमूग मिळाला.
झाडावर आधारित शेती यंत्रणांना भेटी देणं, शेणखत आणि गांडूळखत तयार करणा-या शेतक-यांशी चर्चा करणं यामुळं चंद्रण्णाला शाश्वत शेतीबद्दल विस्तृत कल्पना आली. जवळच्या गांवातील प्रगतीशील शेतकरी बी.जी. केरे यांना भेटल्यावर त्याला गांडूळखताबद्दल आणखी बरंच शिकायला मिळालं.
२००५ मध्ये, चंद्रण्णानं एक एकर प्ल़ॉटला ६ क्विंटल गांडूळखत घातलं त्यासोबत उन्हाळ्यातील नांगरणी, जैविक घटकांनी (-हायझोबियम आणि ट्रायकोडर्मा) बी उपचार, जिप्सम (५० किलो), नेहमीपेक्षा अधिक बिया (४५ किलो), आंतरपिकं आणि हद्दीवर पिकं घेण्यासारखे उपाय केले. यावेळी उत्पन्न १३ पोती निघालं आणि त्याला ६.५ क्विंटल भुईमूग मिळाला. या भागात AMEF नं गेल्या ४ वर्षात केलेल्या कामादरम्यान एखाद्या शेतक-यानं मिळवलेलं हे सर्वाधिक उत्पन्न होतं. प्रत्येक पोत्याचं वजन भरपूर होतं - ५० ते ६० किलोदरम्यान. चंद्रण्णाच्या २३ पोत्यांचं वजन १३ क्विंटल भरलं, तर त्याचा शेजारी टिप्पेस्वामीच्या ४० पोत्यांचं वजन १३ क्विंटल भरलं. हा शेतमाल खरेदी करणारा व्यापारीही आश्चर्यचकित झाला. प्रत्यक्षात व्यापा-यांनी चंद्रण्णाला त्याची पोती रिकामी करायला सांगितली - त्यात दगड तर नाहीत ना हे पाहण्यासाठी. भुईमुगाच्या शेंगांचं पोतं ५० किलोपेक्षा अधिक भरणं हे असामान्य होतं. शेंगा एकसमान पक्व आणि योग्य प्रमाणात भरलेल्या होत्या त्यामुळं त्यांची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली.
चंद्रण्णा गांडूळखतंच बनवून आणि आपल्या २ एकर शेतात टाकून थांबला नाही. २००४ पासून त्यानं गांडूळखत आणि गांडुळं विकायला सुरुवात केली. २००४ मध्ये चंद्रण्णानं १२४ किलो गांडुळं १५० रुपये किलो दरानं विकली, आणि त्याला १८,६०० रुपये मिळाले. १५ क्विंटल गांडूळखत त्यानं ५०० रुपये क्विंटल दरानं विकून आणखी ७,५०० रुपये मिळवले. एकंदर त्याला २६,१०० रुपये उत्पन्न मिळालं.
भुईमुगापेक्षाही अधिक उत्पन्न मिळाल्यानं उल्हसित झालेल्या चंद्रण्णानं २००५ मध्ये गांडूळखत आणि गांडुळांची विक्री जोरकस केली. दरम्यान काही धडे तो कठीण अनुभवांतून शिकला. एकदा त्यानं ३० किलो गांडुळं मातीमध्ये पॅक करुन विक्रीला ठेवली, ती विकली जाण्याआधीच मेली. नंतर, त्यानं गाईच्या शेणात पॅक केलेली गांडुळं विकणं सुरु केलं. पाणलोट प्रकल्पानं त्याच्या शेवटच्या वर्षात, मोठ्या संख्येतील शेतक-यांना गांडुळखतासाठी अधिक खड्डे दिले, तेव्हा गांडुळांची मागणी वाढली. त्याला २७८ किलो गांडुळं विकून (१५० रुपये किलो दरानं) ४१,७०० रुपये मिळाले आणि २३ क्विंटल गांडूळखत ५०० रुपये क्विंटल दरानं विकून ५३,२०० रुपये मिळाले. यातून त्याला २००५ मध्ये ५३,२०० रुपये मिळाले. त्यानं गांडूळखताच्या खड्ड्यांची संख्या वाढवली. पिकांचा अधिक कचरा आणि शेतीतले टाकाऊ पदार्थ शोधायला त्यानं सुरुवात केली. त्याच्या शेतातली चार पोंगेमियाची झाडं, कालव्याच्या कडेच्या झाडांचा पालापाचोळा आणि निलगिरीची वाळलेली पानं यातून त्याला गांडूळखताच्या खड्ड्यांसाठी जैवभार मिळाला.
गांडूळखतासाठी गाईच्या शेणाची गरज पाहून, चंद्रण्णानं एक बैलजोडी, एक गाय आणि २० कोंबड्या पाळायला सुरुवात केली. २००६ मध्ये गेल्या ५० वर्षातील अभूतपूर्व दुष्काळस्थिती निर्माण झाली, तरीही चंद्रण्णानं २८५ किलो गांडुळं आणि ३२ किलो गांडूळखत विकून ५८,७५० रुपये कमावले. २००३ पासून त्याचं एकूण उत्पन्न १,३८,०५० रुपये झालं होतं. प्रत्यक्ष उत्पन्न यापेक्षाही अधिक होतं. त्यानं मिळवलेले १ लाख ४० हजार रुपये पावत्या देऊन ठेवलेल्या नोंदीनुसार आहेत. त्याचे ‘ग्राहक’ हे बरेचसे स्व-मदत गट आणि बेल्लारी, चित्रदुर्ग, बागलकोट तसंच विजापूर जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांतून येणारे शेतकरी आहेत. ते बिलासाठी आग्रही असतात. बिलं न मागता खत किंवा गांडुळं खरेदी करणारे वैयक्तिक शेतकरी देखील आहेत, अशा व्यवहारांच्या नोंदी उपलब्ध नाहीत. आता तो स्व-मदत गटांकरिता १०० रुपये किलो असा दर लावतो, तर बाकीच्यांना १५० रुपये दर आहे. जवळपासच्या ग्राहकांना चंद्रण्णाकडून विक्री-पश्चात सेवा देखील मिळते. गांडुळं नीट जगली नाहीत तर चंद्रण्णा त्यांच्या शेतावर जातो, आणि त्यांना काही गांडुळं मोफत देतो.
‘नर्सरी चंद्रण्णा’ हे लोकप्रिय नांव आता बदलून ‘गांडूळखत चंद्रण्णा’ असं झालं आहे. एक साधंसं मातीचं घर आता सिमेंटच्या भिंती टाकून वाढवलं जात आहे. मागच्या बाजूला गांडुळखताच्या खड्ड्यांची संख्या वाढते आहे. त्यानं आपल्या गांवातल्या अनेक शेतक-यांना सर्वसाधारणपणे शेतीच्या पर्यायी पद्धती वापरुन पाहण्यास आणि विशेषतः गांडुळखत निर्मिती हाती घेण्यास प्रोत्साहित केलं आहे. छोट्या यशोगाथा मोठ्या चळवळींमध्ये रुपांतरित करण्यासाठी स्वयंसेवी संस्था ज्या प्रेरकांच्या शोधात असतात ते म्हणजे चंद्रण्णासारखे स्वयंप्रेरित शेतकरीच होत. साधनसंपत्तीची कमतरता असणा-या शेतक-यांना त्यांच्या मर्यादा दूर सारुन विपरित परिस्थितीत वर येण्यासाठी हीच योग्य आत्मप्रेरणा आहे.
स्रोतः AME फाऊंडेशन
अंतिम सुधारित : 7/12/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...