অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणू निदान

एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणू निदान

पोल्ट्रीतील एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणू निदानाची नवी स्वस्त पद्धती विकसित

पोल्ट्री उद्योगामध्ये पक्ष्यांना एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रक्रियेपूर्वी पक्ष्यांच्या या विषाणूसाठी चाचण्या घ्याव्या लागतात. त्यासाठी या विषाणूंचे नमुने गोळा कऱण्यासाठी कमी खर्चातील पद्धती अमेरिकी कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांनी तयार केली आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगातील एव्हियन एन्फ्लुएंझा या रोगाच्या निदानाच्या खर्चामध्ये बचत होणार आहे.

एव्हियन इन्फ्लुएंझा हा रोग पोल्ट्री पक्षी व अन्य पक्ष्यांच्या प्रजातींना होतो. या विषाणूमुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊन प्रादुर्भावित पक्ष्यांपैकी 90 टक्क्यांपेक्षा अधिक पक्ष्यांचा मृत्यू होतो. अन्य काही कमी रोगकारक विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे पक्ष्यांना आजारपण येऊन पक्षी आणि पोल्ट्री उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान होते. या रोगांच्या निदानासंदर्भात अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेच्या अथेन्स येथील आग्नेय पोल्ट्री संशोधन प्रयोगशाळेतील (SEPRL) संशोधिका एरिका स्पॅकमन यांनी संशोधन केले आहे. त्यांनी विविध प्रकारच्या एव्हियन एन्फ्लुएंझा विषाणूची ओळख पटविण्यासोबतच त्यांचे मूळ स्थान आणि सध्याच्या चाचण्या आणि औषधांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास केला आहे. तसेच या अभ्यासातून स्पॅकमन यांनी पोल्ट्रीतील पक्ष्यांच्या विषाणू निदानासाठी नमुने घेण्याची सर्वांत कार्यक्षम अशी पद्धती शोधली आहे.

अमेरिकेमध्ये सर्व प्रकारच्या मांसल कोंबड्या व टर्की पक्ष्यांची प्रक्रियेपूर्वी विषाणूंसाठी चाचण्या एव्हियन इन्फ्लुएंझा करणे बंधनकारक आहे. त्यासाठी नमुने घेण्याची प्रक्रिया केली जाते. त्याविषयी माहिती देताना सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ एरिका स्पॅकमन यांनी सांगितले, की पक्ष्यांच्या तोंडातून लाळ व अन्य द्रवांचे बोळ्यांच्या साह्याने नमुने घेतले जातात. त्यातून त्या पक्ष्यांच्या गटातील रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेतला जातो. सध्याची नमुने घेण्याची पद्धती ही विषाणूचा प्रादुर्भाव असल्यानंतर चांगल्या प्रकारे कार्य करते. मात्र त्यासाठी एका नळीमध्ये एक ते पाच नमुना बोळे ठेवावे लागतात. त्यामुळे नळ्यांची संख्या वाढून नमुने घेणे व निदान करण्यामध्ये अडचणी उद्भवतात. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक नळीमध्ये अधिक प्रमाणात बोळे ठेवणे शक्य असल्याचे अभ्यासांती दिसून आले आहे.

  • एका नळीमध्ये अकरा नमुने ठेवणे शक्य आहे. योग्य प्रकारे ठेवलेल्या या संख्येतील बोळ्यांमुळे एव्हियन इन्फ्लुएंझा निदानाच्या संवेदनशीलतेवर फारसा परिणाम होत नाही.
  • तसेच स्पॅकमन यांनी सांगितले, की या पद्धतीचा वापर न्यू कॅशल डिसीज व्हायरसच्या निदानासाठीही वापरणे शक्य आहे. त्यामुळे नळ्यांच्या संख्येमध्ये घट होऊन, अत्यावश्यक चाचण्या आणि अन्य बाबीकडे लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योजकांचा निदान व चाचण्यांचा खर्च कमी होणार आहे.
  • हे संशोधन ‘बायोमेड सेंट्रल व्हेटर्नरी रिसर्च’ या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती मार्चमधील ‘ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅगझिन’मध्ये वाचता येईल.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate