हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा. हिवाळ्यात पोल्ट्री शेड आणि बाह्य वातावरणातील तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हे लक्षात घेऊन थंडीच्या काळात व्यवस्थापनामध्ये बदल करावेत.
1) हिवाळ्यामध्ये पोल्ट्री शेडमध्ये लिटरचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात लिटरचा ओलसर झालेला भाग काढून टाकावा.
2) ओल्या झालेल्या लिटरमध्ये चुनखडी मिसळून आर्द्रतेचे प्रमाण कमी करता येते. यासाठी दोन किलो चुना/ चुनखडी प्रति 100 चौरस फुटांसाठी लिटरमध्ये मिसळावी.
3) शक्य झाल्यास संपूर्ण लिटर बदलणे चांगले; परंतु यामुळे व्यवस्थापनाचा खर्च वाढतो. हाताळणीमुळे कोंबड्यांवर ताण येतो.
1) हिवाळ्यात ज्या भागात पिण्याचे पाणी खूपच थंड होते, तेथे शक्य झाल्यास पाणी थोडेसे कोमट करून कोंबड्यांना पाजावे.
2) हिवाळ्यात पाण्याद्वारे झपाट्याने पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रथम पाण्यावर तुरटी फिरवावी. नंतर हे पाणी 25 तास संथ ठेवावे. यामुळे पाण्यातील गाळ तळास बसून पाणी स्वच्छ होते.
3) त्यानंतर पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करावा. यासाठी एक ग्रॅम ब्लिचिंग पावडर (ज्यामध्ये 33 टक्के क्लोरीन असते) 500 लिटर पाण्यासाठी पुरेशी होते.
4) पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरावयाची इतर औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार वापरावीत.
1) थंड वातावरणामुळे कोंबड्यांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी पाण्यामधून आवश्यक जीवनसत्त्वे द्यावीत. यामध्ये जीवनसत्त्व "ब', "क' किंवा क्षारयुक्त पावडर किंवा ताण कमी करणाऱ्या औषधींचा पशुवैद्यकांच्या सल्ल्याने वापर करावा.
2) ताण आल्यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी होऊन कोंबड्या इतर रोगांस बळी पडण्याची शक्यता बळावते. यासाठी कोंबड्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य उपाययोजना करून पाण्यातून जीवनसत्त्व "अ', "ई' व सेलेनियमचे द्रावण द्यावे.
1) हिवाळ्यामध्ये कोंबड्या जास्त खाद्य खातात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीराचे तापमान वातावरणातील बदलांमध्ये कायम राखण्यासाठी त्यांना अन्नघटकांपासून मिळणाऱ्या ऊर्जेचा बराच भाग खर्च करावा लागतो.
2) हिवाळ्यामध्ये पक्ष्यांना आवश्यकतेपेक्षा कमी खाद्य दिल्यास ते त्यांना अपुरे पडण्याची शक्यता असते. खाद्य अपुरे पडल्यास वाढ खुंटण्याची भीती असते, त्यामुळे कोंबड्यांच्या खाद्य घटकांमध्ये आवश्यक ते बदल करून खाद्य द्यावे.
3) थंडीच्या काळात कोंबड्यांच्या आहारात ऊर्जावर्धक घटकांचे प्रमाण (100 किलो कॅलरीज प्रतिकिलो खाद्यामध्ये) वाढवावे आणि प्रथिनांचे प्रमाण दोन टक्के कमी करावे. यासाठी पशुआहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
4) कोंबड्यांच्या आहारात जास्त ऊर्जा निर्माण करणारे अन्नघटक, जसे की पिष्टमय कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) उदा. मका, ज्वारी इत्यादींचे प्रमाण वाढवावे आणि प्रथिने जसे की तेल काढलेले सोयाबीन मील पेंड, मासळीचा चुरा, शेंगदाणा पेंड, सरकीची पेंड यांचे प्रमाण थोडेसे कमी करावे.
1) डॉ. पी. व्ही. मेश्राम - 9594581239
2) डॉ. आर. बी. अंबादे - 9167682134
(लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोंबड्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोग दिसून येतात. य...
ब्रॉयरल पक्ष्यांना विविध वातावरण, नियोजन, निवास, श...
मेहनत, पक्षी संगोपनातील धोके, बाजारपेठेतील अनियमित...
कोंबड्यांना ताण-तणावापासून सांभाळणे ही यशस्वी कुक्...