অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पशुधन हाताळताना सावधान

पाळीव प्राणी सांभाळ ही बाब पशुपालकांच्या अगदी सवयीची गोष्ट असते, परंतु सांभाळलेले पशू संपर्कातील मानवाला रोगराई, आजार जसे पसरवतात;तसेच ते अनेक अपाय आणि धोके घडवू शकतात. त्यामुळे संपर्कातील पशूंच्या व्यवस्थापनाबाबत नेहमी सतर्क राहावे.
नेहमी शांत असणारे आणि संयमी स्वभाव दाखविणारे पशू काही मानसिक अनारोग्यामुळे क्वचितप्रसंगी मानवावर हल्ला करू शकतात. माजाचा काळ ही सगळ्याच मादी प्राण्यात मानसिक अस्वस्थतेस पूरक ठरणारी बाब असते, तर हीच बाब नर प्राण्यात लैंगिक उत्तेजनप्रसंगी दिसून येते. नियंत्रणात राहू न शकणारा असा प्राण्यांचा काळ पशू व्यवस्थापनात अत्यंत कठीण असतो. अशा काळात नियंत्रणाचे कठोर प्रयत्न टाळणे तर स्वैर पशूंवर लांबूनच लक्ष देणे फायद्याचे ठरते. अचानक धडक देऊन इजा होण्याचा धोका पशूकडून मानवास कधीही घडू शकतो. लहान मुले, अपरिचित प्राणी, अपुऱ्या जागेतील गोठे याबाबत विचार करणे नेहमी गरजेचे ठरते. कळपात सांभाळले जाणारे पशू एकदम बदल करत बांधण्यास सुरवात केल्यास त्यांच्याकडून धडक बसण्याचे प्रमाण नेहमी वाढते. सौम्य इजा ते भयंकर मार घडवू शकणाऱ्या पशूंच्या धडका मानवाच्या मृत्यूसही प्रसंगी कारणीभूत ठरल्याची उदाहरणे आहेत.
पशूंकडून अजिबात पुढाकार नसताना केवळ अपघाती जखमा असावधानतेमुळे मानवास घडू शकतात. शिंगांचा मार, पायाचा दाब, छातीस दाब किंवा दूर करण्यासाठी फिरवलेला माथा यांच्या अपायातून बंद जखमा पशुपालकास घडू शकतात. कोणतीही हेतूरहित पशू हालचाल जेव्हा इजा होणाऱ्यास कारणीभूत ठरते, तेव्हा अशा पशूची मानसिक अवस्था अगदी सामान्य असते.

जनावरांना योग्य पद्धतीने हाताळा...

चावणे हा प्रकार सर्वच पशूंकडून प्रसंगी दिसून येतो. अनावश्‍यक दबावतंत्र वापरून पशूबाबत घडवली जाणारी तपासणी, उपचार, उपाय प्रणाली मानवास धोकादायक ठरू शकते. शिंग असणारे आणि नसणारे प्राणी चावतात आणि गंभीर जखमा संपर्कातील मानवास करू शकतात. चावण्यामुळे दातांच्या जखमा, तर पाय झटकून "लाथ मारणे' हा प्रकार मोठ्या पशुधनात नेहमी आढळतो. नेहमी घडणारा प्रकार म्हणजे दोहनाच्या वेळी घडणारी इजा. वेळेशिवाय दोहन, वासराशिवाय दोहन, सुप्त कासदाह असताना दोहन आणि सडांना जखमा असताना दोहन, म्हणजे लाथ झाडण्याचा प्रसंग मुद्दाम पशूंवर घडविला जातो. पशू हाताळणी माहीत असणाऱ्यांना लाथेचा प्रहार होत नाही; मात्र इतर सर्व इजांचे बळी ठरतात. गाय-म्हैस डाव्या-उजव्या बाजूसच लाथा झाडू शकतात. घोडा मात्र मागेच लाथ झाडतो. दोन्ही पाय बांधलेल्या गाई-म्हशी गाढवाप्रमाणे दोन्ही पाय एकदम झटकत मागे उभ्या असणाऱ्या मानवास इजा करू शकतात.
शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यक, महिला, रोजंदार मजूर, वाहतूक करणारे हमाल, प्रक्षेत्रावरचे कर्मचारी, कत्तलखान्यातील कामगार, पशुवैद्यक, दवाखान्यातील सहायक आणि दोहक यांना पशूंकडून अपाय होण्याची मोठी शक्‍यता असते. पैदासकार आणि उद्योजकीय सहभाग असणाऱ्या व्यक्तींनी पशूंबाबत संपर्क असताना बेफिकिरीपेक्षा जागरूकता ठेवणे सुरक्षेचे ठरते.

प्रत्येकाकडे हवी प्रथमोपचार पेटी...

पशुधनाकडून होणारे सर्वच अपाय मानवी शरीरास इजा पोचवणारे असल्यामुळे प्रत्येक पशू प्रक्षेत्रावर "प्रथमोपचार पेटी' असणे आवश्‍यक असते. वेदनाशामक आणि रक्तस्राव थांबविण्यासाठी तातडीचे उपाय अवलंबणे महत्त्वाचे ठरतात. प्राणिसंग्रहालये व वन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिंस्र पशूंना सामोरे जावे लागते. नियमितपणे प्रशिक्षणाद्वारे दिल्या जाणाऱ्या सूचना दुर्लक्षित झाल्यास अपघाती प्रसंग ओढवतात. सामान्य नागरिक जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होतात. नखांच्या ओरखडण्यातून आणि तीक्ष्ण दातांनी फाडून झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी तत्काळ सुसज्ज इस्पितळांची सुविधा जवळ करणे हितावह ठरते.

लक्षात ठेवा...

पशूंवर होणाऱ्या निरंतर मानहानी, इजा, टोचक बाबी टाळाव्या. अपाय केलेल्या पशूस मारहाण टाळावी. सूचना आणि जाणिवांची नियमित उजळणी सुरू ठेवावी. पशूकडून होणारे अपाय पुढील अपघात टाळणारे संकेत समजावे.पशुप्रदर्शनाच्या वेळी सावध राहावे.
प्रदर्शन ही मानवी प्रवृत्ती आहे. आपल्या पशूचे प्रदर्शन सार्वजनिक स्थळी अथवा गर्दीच्या ठिकाणी घडवून आणणे ही कौतुकाची बाब प्रसंगी धोका निर्माण करू शकते. वरातीचे घोडे, बैलगाडा शर्यतीचे पशू, मिरवणुकीचे बैल, हत्ती, उंट, घोडे बिथरल्याने सैरभैर होऊन पळू लागतात. अशा वेळी चेंगरल्याने अनेकांना अपाय घडतात. तेव्हा नियंत्रण सुटणार नाही याची क्षणोक्षणी काळजी घ्यावी आणि प्रसंगी सैरभैर झालेला प्राणी गर्दीपासून दूर ठिकाणी जाऊन शांत होईल याकडे लक्ष द्यावे. श्‍वानांना आणि मांजरांना व्यायाम, समारंभ, घरातील दर्शनीय भाग इथे ठेवण्याचे श्रीमंती दर्शन अनेकदा दिसून येते; मात्र अशा ठिकाणी पशूंच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना इजा होणार नाही याची सजगता मालकांनी ठेवावी.

- डॉ. मार्कंडेय - ९४२२६५७२५१
(लेखक पशुवैद्यकीय महाविद्यालय, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate