অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पशु-पक्षीधनाचे महत्त्व

उपजीविकेसाठी ‘पशु-पक्षीधना’चे महत्त्व

 

“सहा लाखांपेक्षा जास्त खेडी असलेल्या आपल्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आजही ‘पशु-पक्षीधना’वरच आधारलेली आहे. आपल्याकडील 80 ते 85 टक्के शेती अजूनही लहरी पावसावर अवलंबून आहे. शिवाय आपल्याकडील शेतकरी कमी जमीन असलेला आणि सामान्य आहे. त्यामुळे उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या शेतीसाठी पुरेसे पाणी मिळाले नाही, तर तो टँकरने पाणी आणून शेती करण्याइतका समर्थ नाही. मात्र, त्याच्याकडे थोड्या-फार प्रमाणात का होईना ‘पशु-पक्षीधन’ असेल, तर तो निश्‍चितपणे आपली उपजीविका करू शकतो, हे अनेक कोरड्या दुष्काळांनी दाखवून दिले आहे...”

अनादी काळापासून चार किंवा दोन पाय असलेल्या पशु-पक्ष्यांचा मानवाशी अत्यंत घनिष्ठ व जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे. स्वत:च्या उपजीविकेसाठी मानवाने पशु-पक्ष्यांचा उपयोग करून घेतला आहे. मानवाच्या उपजीविकेसाठी साह्यभूत ठरणार्‍या अशा विविध पशु-पक्ष्यांसाठी ‘पशुधन’ हा शब्द वापरला जातो. मात्र, या शब्दातून पाळीव पशु-पक्ष्यांचे महत्त्व पूर्णपणे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ‘पशुधन’ या शब्दामध्ये ‘पक्षी’ या शब्दाचा समावेश करून ‘पशु-पक्षीधन’ असा शब्दप्रयोग करणे योग्य ठरेल. ‘पशु-पक्षीधना’त काही प्रमाणात 6 ते 8 पायांचे कीटकही महत्त्वाचे आहेत; पण त्यांचे खास संगोपन होत नाही. (याला ‘मधमाशी’ या कीटकाचा अपवाद आहे, पण इतर ‘पशु-पक्षी’ जसे सर्रासपणे घरात ठेवले जातात. त्यामानाने हे कीटक क्वचितच ठेवले जातात.)

मानवी उपजीविका आणि ‘पशु-पक्षीधन’

मानवी जीवनात ‘पशु-पक्षीधना’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र बर्‍याचदा ‘पशु-पक्षीधन’ व मानवाची ‘उपजीविका’ यांचा संबंध देशातील ग्रामीण भागापुरताच जोडला जातो. असे करणे ‘पशु-पक्षीधना’च्या उपयोगितेसंदर्भात एकांगी दृष्टिकोनातून पाहण्यासारखे आहे. कारण सर्वच थरातील माणसांना मग ते ग्रामीण, निमशहरी भागातील असोत किंवा, शहरी, कॉस्मोपॉलिटिन (मोठ्या) शहरात राहणारे असोत, त्यांना पाहिजे तेव्हा त्यांच्या उपजीविकेला हातभार लावण्यासाठी हे ‘पशु-पक्षीधन’ सदैव तयार असते. मात्र या ‘पशु-पक्षीधना’चे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करून त्यांच्यापासून स्वच्छ व निरोगी उत्पादने घेण्याची मुख्य गरज असते.

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 65 ते 70 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. 6 लाखांपेक्षा जास्त खेडी असलेल्या आपल्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आजही ‘पशु-पक्षीधना’वरच आधारलेली आहे. आपल्याकडील 80 ते 85 टक्के शेती अजूनही लहरी पावसावर अवलंबून आहे. शिवाय आपल्याकडील शेतकरी कमी जमीन असलेला आणि सामान्य आहे. त्यामुळे उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या शेतीसाठी पुरेसे पाणी मिळाले नाही, तर तो टँकरने पाणी आणून शेती करण्याइतका समर्थ नाही. मात्र, त्याच्याकडे थोड्या-फार प्रमाणात का होईना ‘पशु-पक्षीधन’ असेल, तर तो निश्‍चितपणे उपजीविका करू शकतो, हे अनेक कोरड्या दुष्काळांनी दाखवून दिले आहे. यात 50 ते 100 एकर शेती असूनही ‘पशु-पक्षीधन’ बाळगणारे अतिशय धनवान शेतकरी मी स्वत: पाहिले आहेत, तसेच त्यांच्या ‘पशु-पक्षीधना’ची हाताळणीही केली आहे.

‘पशु-पक्षीधना’चा उपयोग

पातवर्गीय, पानवर्गीय पिके, वेली-झुडूपवर्गीय वनस्पती, मोठे वृक्ष अशा विविध वनस्पतींपासून आपल्या उदरभरणास उपयोगी असणारी उत्पादने आपण घेत असतो. त्यात पालेभाज्या, फळे, फुले, दाणे, बिया अशा विविध उत्पादनांचा समावेश असतो. अशी उत्पादने घेतल्यानंतर आपण जे खाऊ अथवा पचवू शकत नाही आणि आपल्या दृष्टीने टाकाऊ असते, अशा भागाचे भक्षण ‘पशु-पक्षीधन’ करत असते. किंबहुना त्यांचे तेच नैसर्गिक खाद्य असते. त्याचप्रमाणे शेतमालावर प्रक्रिया करताना त्यातून जो चोथा उरतो त्याचाही वापर ‘पशु-पक्षीधना’च्या आहारात करता येतो. उदाहरणार्थ, आपण उसापासून किंवा बीटपासून साखर तयार करतो, तेव्हा त्यातून उरणारी मळी, ढोरमळी, उसाचा चोथा (बगॅज), तसेच ग्लुकोज व अल्कोहल तयार करताना उरणारा चोथा (Distilled Digestible Grains And Soluble- DDGS), कॅनिंग फॅक्टरीतून उरलेला फळांचा चोथा, तांदूळ पांढरे स्वच्छ करण्याकरिता त्यावरील निघणारा पातळ थर (Rice Polish), गव्हापासून मैदा तयार करताना शेवटी राहिलेला भूसा (Wheat Bran), तेलबियांपासून (सरकी, शेेंगदाणे, सोयाबिन, करडई, जवस, तीळ इत्यादींपासून) तेल काढल्यानंतर त्यातून उरणारी ‘पेंड’, द्विदल कडधान्यांपासून (हरभरा, उडीद, मूग, मसूर, तूर इत्यादींद्वारे) ‘डाळ’ काढल्यावर शेवटी राहणारी ‘चुनी’, तसेच तेलाचे रिफाईंड करताना त्यावर विशिष्ट प्रकारचा सायीसारखा निघणारा ‘साका’, अशा विविध टाकाऊ पदार्थांचा वापर पशुखाद्यात केला जातो. त्याचप्रमाणे फळांच्या बियांपासून जो ‘गर’ निघतो, त्या गरापासून तेलसुद्धा काढले जाते. तेल काढल्यानंतर खाली राहणारा जो भूगा असतो, त्यात उत्तम ‘अमिनो आम्ल’ असते. त्याचाही उपयोग ‘पशु-पक्षीधना’च्या खाद्यात केला जातो. असे पदार्थ खाऊनही या ‘पशु-पक्षीधना’पासून मानवाला सहज पचणारे अन्न आणि जमिनीला पौष्टिक असे खत मिळते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्राणीज पदार्थांची उपलब्धता त्यांच्यामुळे होत असते. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री करून त्यावर अनेकजण आपल्या कुटुंबाची उपजीविका चांगल्या प्रकारे करत असतात.

‘पशु-पक्षीधना’पासून मिळणार्‍या विविध चीज-वस्तू

  • दूध - (दूधापासून तयार होणारे विविध उपपदार्थ).
  • मांस - (पशु-पक्ष्यांच्या विविध अवयवांपासून तयार करण्यात येणारे वेगवेगळे पदार्थ).
  • अंडी - (अंड्यांपासूनचे विविध उपपदार्थ).
  • मूत्र - (जमिनीकरता खाद्य - जैविक खते).
  • मल - (जमिनीकरता खाद्य- जैविक खते).
  • मल-मुत्रापासून मिळणारा जैविक गॅस (बायोगॅस).
  • हाडांपासून जैविक खते, औषधे, पूरक आहार बाबी (फीड सप्लीमेंट).
  • शिंगे, नखे, पिसे यापासून खते, सुशोभित वस्तू इत्यादी.
  • चामडे- चामड्यापासून कपडे, चपला, बूट, मनी पर्सेस, तंबूंचे साहित्य, वाद्य, ढोलके (वाद्य) इत्यादी.
  • केस - लोकरीपासून उबदार व थंडी संरक्षक कपडे, ब्रश, सुशोभित वस्तू.
  • रक्त - जैविक खते, औषधे.
  • शेळी-मेंढीच्या आतड्यापासून ‘तात’ या नावाचा धागा तयार केला जातो. ज्याला इंग्रजीतून ‘कॅट गट’ असे म्हटले जाते. शस्त्रक्रियेमध्ये रक्तवाहिन्या बांधण्यासाठी व जखमा शिवण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • काही पशु-पक्ष्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे डोळे काढून मानवाला बसविण्यात येतात.
  • हाडांपासून भुकटी, सरस व जिलेटिनसारखे पदार्थ तयार केले जातात. सरस व जिलेटिन यांचा उपयोग औषधी क्षेत्रात अनेक ठिकाणी होतो, तसेच चिकटविण्याकरिता वापरल्या जाणार्‍या विविध पदार्थांत, रंगोद्योगात सरस आणि जिलेटिनचा वापर केला जातो.

याचाच अर्थ ‘पशु-पक्षीधन’ मानवाला संसाराचे गाडे चालविण्याकरिता अतिशय मदतरूप ठरते. पशु-पक्षी मानवाकरिता अक्षरश: स्वत:चा जीव ओवाळून टाकतात व त्याच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनतात. वरील विविध बाबी मिळण्याबरोबर इतर अनेक कामांसाठीसुद्धा पशु-पक्षी साह्यभूत ठरतात जसे की,

  • शेतात काम करणे, ओढकाम करणे, ओझे वाहून नेणे, पाणी खेचण्याचे काम करणे.
  • प्रसंगी मानवाचे व त्याच्या घराचे संरक्षण करणे.
  • नवीन प्रजोत्पादन करणे.
  • नव-नवीन औषधांचे प्रमाणीकरण करण्यासाठी, तसेच मानवाच्या दृष्टीने औषधाची उपयुक्तता व सुरक्षितता पडताळून पाहण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांकरिता विविध पशु-पक्ष्यांचा वापर केला जातो.
  • एकविसाव्या शतकातील अति-मॉडर्न शास्त्रीय बाबींचा आधार घेऊन उत्तम अनुवंशिक गुणांचा प्रसार करून त्यांची नवीन पिढी तयार करण्यासाठी ‘पशु-पक्षीधन’ उपयोगी ठरते. (जगातील आश्‍चर्यकारक उदाहरण म्हणजे हॉलंडमधील एका ‘सिलींग रॉकमन’ वळूने त्याच्या प्रजननक्षम आयुष्यात म्हणजेच आयुष्याच्या 16 वर्षांत 22 लाख पन्नास हजार ‘सीमेन डोसेस’ तयार करण्याकरिता वीर्य निर्माण केले. या वळूने केवढा पैसा उभा केला, याची काही मोजदादच नाही.)
  • अंतराळात मानवी जीवन टिकेल की नाही, याकरिता अंतराळ यानातून अनेक वर्षे वेगवेगळे पशु-पक्षी पाठविण्यात आले आणि त्यांच्यावर प्रयोग करण्यात आले.

त्यामुळे ‘पशु-पक्षीधन’ केवळ ग्रामीण भागातील जनतेचे उपजीविकेचे साधन नसून, ते इतर कोट्यवधी जनतेच्या ‘पोटा-पाण्या’चे साधन आहे. म्हणूनच ‘पशु-पक्षीधना’ची संगोपन व्यवस्था चांगलीच ठेवली पाहिजे.

उपजीविकेच्या दृष्टीकोनातून ‘पशु-पक्षीधना’चे महत्त्व

‘पशु-पक्षीधन’ वर्गात गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर, उंट, गाढव, घोडा, याक, मिथुन, कोंबडी, बदक, क्वील, खेचर अशा विविध प्राण्यांचा व पक्ष्यांचा समावेश होतो. या पशु-पक्ष्यांपासून मिळणार्‍या उत्पादनात खूप विविधता आहे. हे पक्षी अगदी लहान असल्यापासून मोठे होईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे मानवाला उत्पादन देत असतात. पक्षीवर्गीयांच्या अंड्यापासूनही उत्पादन मिळत असते. त्यामुळे उपजीविकेच्या दृष्टिकोनातून ‘पशु-पक्षीधना’कडे पाहणे काहीच गैर नाही. यासंदर्भात ग्रामीण भागाचे उदाहरण घेतले, तरी शेतजमीन नसणार्‍या (पण मोलमजुरी करून पोटापाण्याची सोय करू पाहणार्‍या) कुटुंबापासून ते एक-दोन एकर शेतजमीन असलेली कुटुंबे व त्याहून मोठे शेतकरी ज्यांना बागायतदार ते ‘बडे बागायतदार’ अशी बिरुदावली लावता येते, अशा कुटुंबांकडेसुद्धा ‘पशु-पक्षीधन’ दिसून येते. त्याचप्रमाणे लहान-मोठे प्लॉट असलेले, ज्यात एक ते दोन गुंठ्यापासून 5 ते 10 गुंठे जमीन असणार्‍या कुटुंबांकडेसुद्धा जास्त आमदनी मिळविण्याकरिता दोन-तीन गायी/म्हशी व 100 ते 200 बॉयलर कोंबड्या/ बदके पाळलेली असतात. ग्रामीण भागातील कुटुुंबांकडे ‘एकात्मिक पद्धतीचे पशु-पक्षी’ असतात. या पद्धतीत एक-दोन गायी/म्हशी, चार-पाच शेळ्या, 15-20 कोंबड्या तसेच व्यवसायाच्या जमातीनुसार चार-पाच डुकरे, तर वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या हवामानानुसार/ गरजेनुसार ‘पशु-पक्षीधना’ची जोपासना केलेली असते. जसे- राजस्थानमध्ये उंट, उत्तर-पूर्व राज्यांमध्ये मिथून, हिमाचल व वरच्या भागात याक वगैरे. मात्र, गाय, म्हैस, मेंढ्या, कोंबड्या हे प्राणी सगळीकडे पाळले जात असल्याचे आणि त्यांच्यावर कुटुंबाची उपजीविका होत असल्याचे दिसून येते.

हे पशु-पक्षी पाळण्याकरिता ज्या काही सोयी-सुविधा लागतात, मुख्यत्वे चारा, पाणी, पशुखाद्य, गाभण जनावरांना वेगळे ठेवण्याच्या सोयी, डॅाक्टर, अशा सर्व बाबी आता सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ‘पशु-पक्षीधना’पासून मिळणार्‍या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देण्याकरितासुद्धा वेगवेगळ्या पातळीवरची व धर्तीवरची संकलन केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यात खासगी, सहकारी, सरकारी, निम-सरकारी, पतपेढ्या वगैरेंचा समावेश आहे. हा ‘पशु-पक्षीधना’कडे पाहण्याचा उत्पादकाचा दृष्टिकोन झाला, ज्यात स्वत:च्या डोळ्यादेखत, स्वतःच्या जागेवर, मजूर लावून वा स्वत:च्या कुटुंबातील माणसे घेऊन पशु-पक्ष्यांचे संगोपन व पालनपोषण केले जाते.

या पशु-पक्ष्यांंपासून उत्पादन मिळणे सुरू झाल्यानंतर ते उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचविणारी एक दुसरी साखळी असते. या साखळीतील अनेक जणांची उपजीविका काही प्रमाणात ‘पशु-पक्षीधना’तून उत्पादित होणार्‍या उत्पादनांवर अवलंबून असते. तर मुख्य हाताळणी करणार्‍यांची संपूर्ण उपजीविकाच या पशु-पक्षीधनावर अवलंबून असते. याचाच अर्थ असा की, ‘पशु-पक्षीधना’शी प्रत्यक्ष कोणताच संबंध नसतानाही कोट्यवधी लोकांची उपजीविका ‘पशु-पक्षीधना’वर होत असते. हे सर्व जण उत्पादनाच्या जागेपासून शेकडो मैलावर असतात; पण शेवटी अवलंबून असतात ते पशु-पक्षीधनावरच. छोटेसे उदाहरण घेऊया! पशुधनाने निर्माण केलेल्या व पशुपालकाने ते त्याच्यापासून काढून घेतलेल्या दुधाला दूधउत्पादकाकडून एक लिटरला 20 ते 22 रुपये मिळतात; पण तेच दूध मी स्वत: पुण्याला 48 ते 50 रुपये लिटर या भावाने विकत घेतो. येथे कोणताही वाद निर्माण करावयाचा नाही. फक्त दाखवायचे हे की, एका लिटरमागे 26 ते 30 रुपये या साखळीतील असलेल्या जनतेला मिळतात, म्हणजेच ‘पशु-पक्षीधना’च्या जीवावरच हे सर्व चालते. यामध्ये सहकारी दूध संघापासून ते इतर विविध घटकांतून हजारो कोटी रुपयांची जी उलाढाल होते, ती मुक्या ‘पशु-पक्षीधना’च्या जीवावरच चालत असते, हे लक्षात घ्यायला हवे.

पशु-पक्षीधन - जिवंत इंडस्ट्री

सध्या जगाच्या पाठीवर असलेल्या बर्‍याच देशात ‘अमूल’ ब्रॅण्डचे दूध व त्या दुधापासून विविध पदार्थांची विक्री होते. सद्य:स्थितीत या ब्रॅण्डचा व्यवहार 20 हजार कोटी रूपये इतका आहे. पुढच्या पाच-सहा वर्षांत हा व्यवहार 50 हजार कोटी रुपयांच्या घरात नेला जाणार आहे. अशा प्रकारे ‘पशु-पक्षीधना’पासून मिळणार्‍या प्रत्येक उत्पादनातून ‘सोन्याचा धूर’ निघत असतो. ही एक ‘जिवंत इंडस्ट्री’ आहे. त्याला कुलूप लावून चालणार नाही. (‘निर्जीव इंडस्ट्रीज’ कधीही बंद करून तशाच पडून ठेवता येतात.) त्यामुळे उत्पादन देत नसलेल्या पण वाढत्या वयाच्या / गाभण असलेल्या पशुधनाला पुरेसा आहार, पाणी द्यावेच लागते आणि ते राहत असलेल्या परिसरात स्वच्छता ठेवावीच लागते. त्यासाठी त्यांच्या मालकांना कष्ट करावेच लागतात. आपल्या दारात उभे असलेले चांगल्या गुणवत्तेचे ‘पशु-पक्षीधन’ म्हणजे बँकेचा ‘डिमांड ड्राफ्ट’च आहे. मनात आले किंवा अडचण आली की यातून ताबडतोब पैसा उभा करता येतो. उपजीविकेमधील हीसुद्धा एक पायरी आहेच! म्हणून ज्या वस्तूपासून (सजीव असो वा निर्जीव) आपण उत्पादन घेणार. त्याचे व्यवस्थापन करताना त्याच्या अनुवंशिकतेपासून माहिती घेणे महत्त्वाचे आहे. (म्हणतात ना ‘आडात असेल तर पोहर्‍यात येणार!’) ज्या वस्तूमध्ये मुळातच काही गुणधर्म नाहीत त्या वस्तूला आकार कसा काय देणार! म्हणूनच ‘थोडेच पशु-पक्षीधन पण भरपूर उत्पादन’ हा मंत्र प्रत्येक पशुपालकांनी डोळ्यासमोर ठेवलाच पाहिजे. त्यासाठी भ्रष्टाचार न करता सरकारने किंवा स्थापित केलेल्या संस्थांनी काही अतिमहत्त्वाच्या बाबी करावयास पाहिजे.

 

संपर्क : भ्र. 9370 1457 60

स्त्रोत : वनराई

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate