অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळमाशी झालीय जागतिक दृष्ट्या महत्त्वाची कीड

मागील वर्षी (सन 2014) भारतीय आंबा व वेलवर्गीय भाजीपाला पिकांत फळमाशी (फ्रूटफ्लाय) आढळल्याने युरोपने या शेतमालावर बंदी घातली आणि फळमाशी चर्चेत आली. ही फळमाशी जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाची व गंभीर कीड झाली आहे. सद्यस्थितीत आंबा व वेलवर्गीय पिकांचा हंगाम सुरू आहे. त्यादृष्टीने ही माहिती उपयोगी ठरेल. 
- मंदार मुंडले

फळमाशी (फ्रूटफ्लाय) विषयी

  • जगभरातील प्रमुख कीड म्हणून ओळख
  • जगभरात तिच्या सुमारे चारहजार प्रजाती, त्यातील 10 टक्के प्रजाती आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या.
  • भारतात तिच्या सुमारे दोनशे प्रजाती. त्यातील पाच ते सहा प्रजाती पिकांना थेट नुकसान पोचविणाऱ्या असल्याने महत्त्वाच्या.
  • या किडीच्या नियंत्रणासाठी जगभरात विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प राबवले जात आहेत. यात बायो सिस्टेमॅटीक्‍स, फळमाशी सर्वेक्षण व पर्यावरणवादी नियंत्रण पद्धतींचा वापर सुरू आहे.

केशर आंब्यात समस्या

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निवृत्त कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजीत चंदेले म्हणाले, की केशर आंब्याची काढणी उशीरा (मे, जून) होत असल्याने याच आंब्यात फळमाशीचा उद्रेक प्रामुख्याने दिसतो. तुलनेने हापूस आंब्याची काढणी लवकर (मार्च-एप्रिल) होत असल्याने यात फळमाशीची समस्या शक्‍यतो दिसून येत नाही. आंबा फळ जेव्हा पक्वतेला पोचते, तेव्हाच फळमाशी त्यात अंडी घालते व तिच्या पुढील अवस्था पाहण्यास मिळतात. कृषी महाविद्यालय, पुणे येथील जैविक कीड नियंत्रण प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. रमेश नाकट म्हणाले, की जेव्हा झाडावर आंबा कडक असतो, तेव्हा फळमाशीला फळात जाता येत नाही; पण आंबा पिकू लागला, वरची साल मऊ झाली की सालीच्या खाली ती अंडे देते. केशर आंब्याची साल हापूसच्या तुलनेत पातळ असते. त्यात या किडीची समस्या जास्त असते.

  1. हिवाळ्यात नोव्हेंबर ते जानेवारीत रात्रीचे तापमान 10 अंशाच्या दरम्यान वा खाली असते, त्या वेळी फळमाशी सक्रिय नसते.
  2. फेब्रुवारीत तापमान वाढण्यास सुरवात होते, त्या वेळी फळमाशी कार्यरत होते. त्या वेळी जी पक्व फळे उपलब्ध होतील त्यावर तिचा ऍटॅक सुरू करतो. जेव्हा जूनमध्ये पहिला पाऊस येतो, त्या वेळी या किडीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येते. जून-जुलै दरम्यान केशर आंबा बागेतून ती पेरू बागेत जाते.

भारतात आढळणाऱ्या महत्त्वाच्या फळमाशा

  1. बॅक्‍ट्रोसेरा डॉरसॅलिस
  2. बॅक्‍ट्रोसेरा झोनाटा
  3. बॅक्‍ट्रोसेरा करेक्‍टा
या तीनही फळमाशा आंबा, पेरू, सीताफळ आदी पिकांत प्रामुख्याने आढळतात.
बॅक्‍ट्रोसेरा कुकुरबीटी वेलवर्गीय पिके. उदा. कलिंगड, खरबूज, भोपळा, कारली, काकडी 
मूळ स्थान- भारत, होणारे नुकसान- 30 ते 100 टक्के

प्रादुर्भावाची काही लक्षणे

  1. फळे पक्व होताना फळमाशीने अंडी घातली व अळीची वाढ झाली, की ते फळ वाकडे होते.
  2. पेरू अकाली पक्व होतो. पिवळी फळे तोडणे टाळावे.
  3. सीताफळात तोडणी झाल्यानंतर लक्षणे दिसून येतात.
  4. आंब्यावर डाग दिसून येतात. फळाला स्पर्श केल्यानंतर तो लगदा स्वरूपात लागतो.
  5. फळ काढणीपूर्व प्रादुर्भाव झाल्याने फळे गळून पडतात. (फळ 60 ते 70 टक्के पक्व झाले असताना प्रादुर्भाव सुरू होतो, तो तोडणीपर्यंत राहतो.)

नुकसानीची तीव्रता- 3 ते 80 टक्के (विभाग व कीड जातीनिहाय) 
फळगळीमुळे, मालाची गुणवत्ता घटल्याने व निर्यातबंदी आल्यास.

फळमाशी गंभीर कीड का?

फळमाशीचा प्रादुर्भाव फळतोडणी आधी होत असला, तरी फळ वाहतुकीदरम्यान वा मार्केटमध्ये येताना प्रादुर्भाव दिसून येतो. म्हणूनच फळमाशी ही "क्वारंटाइन' कीड आहे. (एका देशाहून दुसऱ्या देशात शेतमाल आयात-निर्याती वेळी महत्त्वाची) युरोप, अमेरिका आदी देशांत ही माशी "क्वारंटाइन' म्हणून जाहीर झाली आहे. त्यामुळे आंबा, कारले आदी शेतमाल निर्यात या देशांत करताना त्यात फळमाशीचा आढळ चालत नाही. तो होऊ नये यासाठी निर्यातीपूर्वीच प्रक्रिया (उदा. व्हेपर ट्रीटमेंट) कराव्या लागतात.

व्यापक क्षेत्रावर आयपीएम

डॉ. चंदेले म्हणतात, की फळमाशीसाठी व्यापक क्षेत्रावर म्हणजे "वाइड आयपीएम' (एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन) कार्यक्रम राबवावा लागतो. जगभरात उदा. बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंकेत असे कार्यक्रम राबवले गेले. या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण केले जाते. "मॉनिटरिंग ट्रॅप' लावून किडीची कोणती प्रजात आहे, कोठे किती कीड "ट्रॅप' होते त्याचा नकाशा तयार केला जातो. शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाबाबत प्रशिक्षित केले जाते. फळे पक्व होण्याआधी काढणी, खाली पडलेली फळे गोळा करून त्यांची विल्हेवाट, अन्य उपाय सांगितले जातात.

काही महत्त्वाचे उपाय

  1. मेल स्टराइल (नर वंध्यत्व) तंत्र- यात रासायनिक तंत्राद्वारे (रेडिएशन) नर फळमाशा व्यंध केल्या जातात. मादीशी मिलन झाल्यानंतर जी अंडी टाकली जातात त्यातून पुढची पिढी निर्माण होत नाही. त्यामुळे फळमाशीच्या संख्येत घट येते.
  2. क्वारंटाइन उपाय कडक करणे अत्यंत महत्त्वाचे. काढणी पश्‍चात तंत्रज्ञानात उष्ण जल किंवा उष्ण वाफ प्रक्रिया किंवा किरणोत्सारीता (रेडिएशन) हे महत्त्वाचे उपाय.

शेतकरी पातळीवरील उपाय

  1. बॅक्‍टोसेरा डॉरसॅलीस किडीसाठी मिथाइल युजेनॉल हे रसायन असलेल्या पिवळ्या बाऊल सापळ्याचा (ट्रॅप) वापर उपयोगी ठरतो. साध्या प्लॅस्टिकच्या बाटलीत हे रसायन ठेऊनही सापळे तयार करता येतात.
  2. वेलवर्गीय पिकातील फळमाशीसाठी मिथाइल युजेनॉल असलेला सापळा चालत नाही. काही शेतकरी अज्ञानातून हा सापळा वेलवर्गीय पिकात लावतात. त्यात फळमाशी व्यतिरिक्त अन्य माश्‍या सापडतात. शेतकऱ्यांना वाटते, की ती फळमाशीच आहे. वेलवर्गीय पिकांत क्‍यूल्यूर असलेले सापळे लावणे आवश्‍यक असते.
  3. पक्व झालेली फळे गळून बागेत पडतात. त्यातून फळमाशीची उत्पत्ती वाढते. ते टाळण्यासाठी बाग स्वच्छ करावी लागते. फळमाशीची कोषावस्था जमिनीत असते. मातीत ती केवळ दोन-तीन सेंटीमीटरच खोल जाते. त्यामुळे माती हलवून घ्यावी, जेणेकरून कोष उघडे पडून सूर्यकिरणे वा पक्षांद्वारे त्यांचे नियंत्रण होते.
  4. फळमाशीचे तोंडाचे अवयव असे असतात, की त्यांना केवळ द्रवस्वरूपात काही घेता येते.
  5. विषारी आमिष देताना गूळपाणी, कीटकनाशक असे मिश्रण वा त्यात मिथाइल युजेनॉल वापरले तरी
  6. आकर्षित करणारे विषारी आमिष फळमाशीसाठी तयार होऊ शकते. फळझाडे वा बांधावर त्याचे पट्टे ओढता येतात.
  7. नियंत्रण कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सामूहिक सहभाग हवा. तुळशीत मिथाइल युजेनॉल असते. तिचाही वापर करता येतो.

बंगळूर येथील राष्ट्रीय कृषी कीटक स्रोत ब्युरो (एनबीएआयआर) संस्थेचे संचालक डॉ. अब्राहम वर्गीस ऍग्रोवनशी बोलताना म्हणाले, की फळमाशी अर्थात फ्रूटफ्लाय ही जगातील अत्यंत गंभीर कीड आहे. जगभरात तिच्या विविध जाती आहेत. त्यानुसार त्यांचा आढळ विविध देशांत आढळतो. भारतात फळमाशीच्या ज्या जाती आहेत त्या आशियाई खंडात दिसून येतात. उदा. भूतान, थायलंड, श्रीलंका वगैरे. बॅक्‍ट्रोसेरा सिरॅटीटीज प्रजात विशेषतः दक्षिण आफ्रिका व संपूर्णच आफ्रिकी खंडात, इस्राईल व ऑस्ट्रेलियात आढळते. मात्र, भारतात तिचा आढळ नाही. आंब्यातील फळमाशी ज्या वेळी फळ परिपक्व होते त्याच काळात ती आढळत असल्याने काढणी पश्‍चात टप्प्यात तिचा प्रादुर्भाव दिसून येतो. वेलवर्गीय पिकांतील फळमाशी परिपक्व वाढीच्या अवस्थेत अधिक वेळा दिसते.

तज्ज्ञ म्हणतात

1) एकात्मिक कीड नियंत्रण हाच फळमाशीवरील महत्त्वाचा उपाय. तो सामूहिक स्तरावर केल्यास त्याचा प्रभाव दिसून येतो. बागेची स्वच्छता (फील्ड सॅनिटेनशन), सापळे (ट्रॅप) हे कमी खर्चिक उपाय आहेत. त्यामुळे रासायनिक अवशेष नियंत्रणाची समस्या कमी होऊन जाते.

संशोधनात्मक उपाय

वेलवर्गीय पिकांतील फळमाशी व्यतिरिक्त फळमाशीसाठी 
  1. बंगळूरच्या इंडियन इन्सिट्यूट ऑफ हॉर्टीकल्चर रिसर्च या संस्थेने प्लायवूडवर आधारित डिस्पेंसर सापळे विकसित केले आहेत.
  2. डायक्‍लोरव्हॉस कीटकनाशकावर आधारित प्लायवूडचे ठोकळे वा विषारी आमिषामध्ये डायक्‍लोरव्हॉस व पाणी यांचे शिफारसीतील द्रावणाचे जमिनीच्या वरती एक फूट झाडांच्या फांद्यांना ब्रशिंग. काढणीच्या आधी एक महिना आठवड्याच्या कालावधीने.
वेलवर्गीय फळमाशीसाठी उपाय- गूळ, केळी पल्पचे आमिष, रंगीत सापळे, 
फळमाशी प्रादुर्भावीत फळे गोळा करून जमिनीखाली दोन फूट खोल गाडावीत. 
विषारी आमिषात डायक्‍लोरव्हॉस व पाणी यांचे शिफारसीप्रमाणे द्रावण करून प्रत्येक पाचव्या झाडाच्या खालच्या पानाला त्याचे ब्रशिंग. 

(सर्व माहिती सौजन्य- डॉ. अब्राहम वर्गीस, डॉ. अजीत चंदेले, डॉ. रमेश नाकट)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate