(खापरा भुंगेरे). साठविलेल्या धान्याला या कीटकांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतो. कोलिऑप्टेरा गणाच्या डर्मिस्टिडी कुलातील हे किटक जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतात. हे किटक मूळचे भारतातील असून पहिल्या महायुद्धात ब्रिटेनमध्ये व त्यानंतर इतरत्र त्यांचा प्रसार झाला. यांचे शास्त्रीय नाव ट्रोगोडर्मा ग्रॅनेरियम आहे.
प्रौढांची लांबी २ ते ३ मिमी. असते व आकार अंडाकृती असतो. डोके लहान असते. ते रंगाने तपकिरी असतात. करड्या व फिकट तपकिरी रंगाच्या खुणा त्यांच्या शरीरावर आढळतात. मादीपेक्षा नर लहान व रंगाने गडद असतो. अळी करड्या पांढऱ्या किंवा पिवळसर तपकिरी रंगाची असते. शरीरावर तांबूस तपकिरी लांब केसांचे पुंजके असतात. पश्चाग्र भागावर असलेले केस जाड शेपटीसारखे वाटतात. मुख्यत्वे ही गव्हावरील कीड होय; परंतु ज्वारी, बाजरी, भात, सातू (बार्ली), कडधान्ये व इतर साठविलेल्या धान्यांतही ती आढळते. प्रौढ निरुपद्रवी असतो; केवळ अळीच नुकसानकारक आहे. कोठारातील गव्हाच्या २५–३२ सेंमी. थरापर्यंत हे किडे आढळतात. अळी दाण्याचा कोणताही भाग, विशेषतः बीजांकुराचा भाग, पोखरून नष्ट करते व दाण्याची भोक पडलेली पोकळ फोले शिल्लक राहतात. हवेत आद्रतेचे प्रमाण अधिक असेल, तर या किडीचे प्रमाण वाढते.
मादी धान्यात एकेक अशी अंडी विखरून घालते. एक मादी आपल्या जीवनकालात सु. १२५ अंडी घालते. तापमान व हवेतील आद्रतेनुसार अंडी ६ ते १६ दिवसांत (२५° से. तापमानाला १२ दिवसांत)उबून त्यांतून अळ्या बाहेर पडतात. त्या सु. ५० दिवसांत चार वेळा कात टाकतात. परंतु प्रतिकूल परिस्थितीत त्या २०० दिवस ते ४ वर्षे या कालात आठ वेळा कात टाकतात. हिवाळ्यात व खाद्य उपलब्ध नसताना त्या कोठाराच्या भेगांत किंवा पोत्यांच्या जाळीत कित्येक महिने सुप्तावस्थेत राहतात. अळ्या धान्यातच कोषावस्थेत जातात. कोषातून ६–१७ दिवसांत प्रौढ किडे बाहेर पडतात. त्यांचे आयुर्मान १० ते ३० दिवस असते. एकूण जीवनचक्राला लागणारा कालावधी तापमानावर अवलंबून असतो व २५° से. तापमानाला तो तीन महिने असतो आणि नीच तापमानाला तो कित्येक वर्षेही असू शकतो.
या किडीच्या नियंत्रणासाठी धान्य साठविण्यापूर्वी चांगले वाळवतात. पोती, गुदामे नीट साफ करून मगच त्यांत धान्य साठवतात. निघणारा कचरा जाळून टाकतात. गुदामाच्या भेगा सिमेंटने भरून घेतात. कार्बन डायसल्फाईड, इडीसीटी, मिथिल ब्रोमाइड यांसारख्या धूम्रकारी विषारी औषधांची हवाबंद धान्याला धुरी दिल्याने या किडीचा नाश होतो. -२९° ते -३४·५०° से. तापमानास पोरकिड्यांची अंडी नष्ट होतात.
लेखक : रा. ना. पोखरकर
स्त्रोत : मराठी विश्वकोशअंतिम सुधारित : 7/7/2020
कीटकांद्वारेदेखील या रोगाचा प्रसार होतो
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या ...
बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरी...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...