অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण

कीड नियंत्रण शिफारशी- विदर्भासाठी



1. गाद माशी - गादमाशी प्रवण क्षेत्रात नियंत्रणासाठी रोवणीनंतर 10 व 30 दिवसांनंतर दाणेदार क्विनॉलफॉस (5 टक्के) 15 किलो प्रतिहेक्‍टरी बांधीत टाकावे. दाणेदार क्विनॉलफॉस टाकताना बांधीत भरपूर ओल असावी व पाणी तीन ते चार दिवस खाचरात बांधून ठेवावे.
2. खोडकीडा - खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी रोवणीपूर्वी रोपांची मुळे क्‍लोरपायरीफॉस (20 टक्के प्रवाही) 10 मि. लि. प्रति 10 लिटर पाण्यात टाकून तयार द्रावणामध्ये 12 तास बुडवून ठेवावे. त्यानंतर रोवणी करावी. 
किडीने 5 टक्के कीडग्रस्त नुकसानपातळी ओलांडल्यास क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) 32 मि. लि. प्रति 10 लिटर प्रमाणात फवारणी करावी. जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा जापोनीकम या परोपजीवी कीटकांची 50 हजार अंडी प्रति हेक्‍टरी दर सात दिवसांच्या अंतराने सोडावीत.
3. तुडतुडे - - एका चुडावर 4 ते 5 तुडतुडे दिसताच, धान पिकात तपकिरी तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस (36 टक्के प्रवाही) 14 मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रीड (17.8 एसएल) 2.2 मि.लि. किंवा फीप्रोनील (5 एससी) 20 मि. लि. किंवा थायामेथोक्‍झाम (25 डब्ल्यूजी) 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
जैविक कीडनाशक मेटारायझीम ऍनीस्पोली 2.5 किलो प्रति हेक्‍टर वापरावे.
4. लष्करी अळी - मिथाईल पॅराथिऑन 2 टक्के भुकटी हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणात धुरळणी करावी. किंवा कार्बारील (50 टक्के डब्ल्यूपी) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी किंवा सायपरमेंथ्रीन (10 टक्के प्रवाही) 6 मि.लि. प्रति 10 लिटर प्रमाणात फवारणी करावी.
5. पाने गुंडाळणारी अळी - उशिरा रोवणी केलेल्या पिकांवर प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. बेरड, सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव झाल्यास मोनोक्रोटोफॉस (36 टक्के प्रवाही) 14 मि. लि. किंवा कार्बारील (50 टक्के डब्ल्यूपी) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भातावरील रोग

करपा- या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम 3 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे बियाणास पेरणीपूर्वी लावावे. कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम किंवा ट्रायसायक्‍लॅझोल 7 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमायसीन 0.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

कडा करपा

रोपवाटिकेमध्ये धान पेरणीपूर्वी स्ट्रेप्टोमायसीनची बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केल्यानंतर कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम अधिक 0.5 ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
डॉ. हरीश आर. सवाई, 7038104510 
सहायक प्राध्यापक कीटकशास्त्र, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर.

एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन

  • पीककापणीनंतर लगेचच जमीन उभी-आडवी नांगरावी, धसकटे गोळा करून जाळून नष्ट करावीत.
  • उशिरा येणाऱ्या व उंच वाढणाऱ्या स्थानिक जाती उदा. पटनी, कोलम, ईके-70, झिनीया, भडस या जातींची लागवड करू नये.
  • जमिनीलगत कापणी करावी.
  • पाऊस सुरू होताच कोषावस्थेतून बाहेर येणाऱ्या मादी पतंगांच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
  • किडीचे अंडीपुंज वेळोवेळी गोळा करून नष्ट करावेत.
  • कीडग्रस्त फुटवे आणि पळींज उपटून नष्ट करावेत.
  • नर पतंग आकर्षित करण्यासाठी लिंगप्रलोभन सापळ्यांचा वापर करावा. प्रति हेक्‍टर 20 सापळे शेतात लावावेत.
  • किडींचे नैसर्गिक शत्रू उदा. चतुर, बेडकांचे भात खाचरात संवर्धन करावे.
  • जैविक नियंत्रणासाठी लावणीनंतर 30 दिवसांपासून ट्रायकोग्रामा जापोनिकमची हेक्‍टरी 50,000 अंडी 3 ते 4 वेळा 10 दिवसांच्या अंतराने शेतात सोडावीत.

कीटकनाशकांचा वापर

रोपवाटिका

  • पेरणीनंतर रोपवाटिकेमध्ये 15 दिवसांनी एक पतंग किंवा एक अंडीपुंज प्रतिचौरस मीटर किंवा 5 टक्के कीडग्रस्त रोपे आढळल्यास दाणेदार फोरेट (10 टक्के) 10 किलो प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळावे.
  • लागवडीनंतर
  • क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) 1600 मि.लि. किंवा कारटॅप हायड्रोक्‍लोराईड (50 टक्के) 600 ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस (40 टक्के) 1350 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्‍टरी फवारणी करावी.

पाने गुंडाळणारी अळी

एकात्मिक व्यवस्थापन

  • बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत.
  • ट्रायकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीटकाची 50,000 अंडी प्रतिहेक्‍टरी पिकामध्ये सोडावीत.
  • प्रत्येक चुडात 1 ते 2 नवीन कीडग्रस्त पाने दिसल्यास प्रतिहेक्‍टरी ऍसिफेट (76 टक्के प्रवाही) 500 ग्रॅम किंवा कारटॅप हायड्रोक्‍लोराईड 500 ग्रॅम किंवा क्‍लोरपायरीफॉस (20 टक्के) 1875 मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (25 ईसी) 1000 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सुरळीतील अळी

एकात्मिक व्यवस्थापन - 
1) शेतात पाणी बांधून ठेवावे व नंतर कीडग्रस्त पिकावर एक दोर आडवा धरून ओढत न्यावा. त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. नंतर शेतातील पाणी बाहेर काढावे म्हणजे पाण्याबरोबर खाली पडलेल्या सुरळ्या वाहून जातात. त्या गोळा करून नष्ट कराव्यात. 
2) गरज भासल्यास कार्बारील (10 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) 25 किलो प्रतिहेक्‍टरी धुरळावी.

लष्करी अळी

एकात्मिक व्यवस्थापन

  • भाताची कापणी केल्यानंतर ताबडतोब शेताची नांगरट करावी. अळीचे स्थलांतर रोखण्यासाठी रोपवाटिकेभोवती किंवा शेताभोवती दोन फूट खोल चर काढून तो पाण्याने भरावा.
  • हंगामाच्या सुरवातीस शेताच्या बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत.
  • किडीचे अंडीपुंज गोळा करून त्यांचा नायनाट करावा.
  • भाताची लागण केलेल्या शेतात पाणी बांधून ठेवावे. त्यामुळे अळ्यांना लपायला जागा राहत नाही आणि अळ्या रोपावर चढतात. पुढे त्या पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात.
  • बेडूक या किडीच्या अळ्या खातो, त्यामुळे त्यांचे शेतात संवर्धन करावे.
  • 4 ते 5 अळ्या प्रति चौ. मी. आढळल्यास सायंकाळच्या सुमारास मिथील पॅराथिऑन (2 टक्के भुकटी) 25 किलो प्रति हेक्‍टरी धुरळावी किंवा डायक्‍लोरव्हॉस (76 टक्के ) 650 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी.
  • पीक तयार झाल्यावर कापणी ताबडतोब करावी

गादमाशी

एकात्मिक व्यवस्थापन

  • लागवड एकाच वेळी करावी.
  • खतांचा संतुलित वापर करावा.
  • बिगर हंगामात शेतात वाढणाऱ्या देवधानाचा व इतर तणांचा जाळून नाश करावा, कारण या गवतावर ही कीड वाढते.
  • लागवडीनंतर 20 दिवसांनी किंवा एक चंदेरी पोंगा प्रति चौ. मी. आढळल्यास दाणेदार फिप्रोनील (0.3 टक्के) 25 किलो प्रतिहेक्‍टरी जमिनीत टाकावे.
  • कीडग्रस्त रोपे किंवा चंदेरी पोंगे उपटून जाळावेत.
  • लागवडीपूर्वी रोपाची मुळे क्‍लोरपायरीफॉस (20 टक्के प्रवाही) द्रावणात बुडवावीत. यासाठी एक मि.लि. क्‍लोरपायरीफॉस प्रतिलिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात रोपाची मुळे 12 तास बुडवावीत किंवा वरील द्रावणात एक टक्का युरिया मिसळल्यास रोपांची मुळे तीन तास बुडवावीत.

तपकिरी तुडतुडे

एकात्मिक व्यवस्थापन

  • लावणी दाट करू नये. दोन ओळींतील अंतर 20 सें.मी. आणि दोन चुडांतील अंतर 15 सें.मी. ठेवावे, तसेच रोपांची पट्टा पद्धतीने लागण करावी.
  • नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी.
  • शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, पाणी बदलावे.
  • प्रत्येक चुडात 5 ते 10 तुडतुडे आढळल्यास ऍसिफेट (76 टक्के)660 ग्रॅम किंवा कार्बारील (50 टक्के) 2000 ग्रॅम किंवा डायक्‍लोरव्हास (76 टक्के) 470 मि.लि., फिप्रोनिल (5 टक्के) 1000 मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रिड (17.8 टक्के) 100 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशक फुटव्याच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. पुन्हा प्रादुर्भाव आढळल्यास सल्ला घेऊन पुढील फवारण्या कराव्यात.

निळे भुंगेरे

नियंत्रणाचे उपाय 

  • बांधावरील तण नष्ट करावेत.
  • प्रादुर्भाव नियमित होतो अशा ठिकाणी शेतात जास्त पाणी साचू देऊ नये.
  • नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (25 टक्के) 2 लिटर किंवा ट्रायझोफॉस (40 टक्के प्रवाही) 625 मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रिन (5 टक्के प्रवाही) 250 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी.


गोडसे- ९४२३८०४५७८

स्त्रोत: अग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate