सोयाबीन, भात, तूर आदी पिकांना वाढीच्या अवस्थेत हवामान बदलाचा फटका बसल्याचे चित्र यंदाच्या हंगामात पाहायला मिळाले. हवामान बदल व पिकनियोजन विषयात शासन धोरणाची पुनर्रचना करण्याची योग्य वेळ आली आहे.
प्रतिकूल परिणामांचा पिकांच्या वाढीवर होत असलेला परिणाम आपण मागील भागात अभ्यासला. उर्वरित पिकांविषयी माहिती या भागात घेऊ या.
सोयाबीन
सोयाबीन पीक 15 ऑगस्टनंतर हमखास फुलोऱ्यात येते. वाढ चांगली झालेली असते. पाने भरपूर लागलेली असतात. शेंगा लागून भरत असतात. पावसात उघडीप होऊन अचानक तापमान वाढल्यास लष्करी अळी मोठ्या प्रमाणात वाढते. अळी संपूर्ण पाने खाते. शेवटी पानांच्या शिरा फक्त दिसतात. याप्रमाणे बदलते हवामान कीड आणि रोग फैलावण्यात कारणीभूत ठरत असल्याचे दिसते. या वर्षी औरंगाबाद जिल्ह्यात गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढून पिकाची पाने खाऊन केवळ पानांच्या शिरा राहिल्याचे चित्र अनेक ठिकाणी निदर्शनास आले. गोगलगायीचा प्रादुर्भाव या वर्षी मोठ्या प्रमाणात आढळला. अचानक वाढलेल्या किडीने शेतकरीवर्ग भांबावून गेला. एकूणच हवामान बदलाच्या भोवऱ्यात सोयाबीनसारखे पीक सापडल्यास खाद्यतेलाच्या एकूण उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होईल. खाद्यतेलाची गरज आणि मागणी दिवसेंदिवस वाढत असताना अशाप्रकारे होणारे नुकसान शेतकऱ्यांना परवडणारे होत नसल्याचे दिसून येते.
ऐन काढणीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत भाताचे पीक तयार झाले होते. हळव्या, निमगरव्या आणि गरव्या जाती आपला कालावधी पूर्ण होताच पक्व होतात. खरिपात झालेल्या चांगल्या पावसाने पिकाची वाढ चांगली झाली होती. चांगले उत्पादन मिळेल या आनंदात कोकणातील शेतकरी होते; मात्र पावसाच्या उघडिपीची वाट पाहण्यात तयार झालेले पीक लोळू लागले आणि तयार झालेल्या साळी शेतातच मोडवल्या. खुद्द अन्न पिकवणाऱ्यालाच इतरत्र अन्नधान्य शोधण्याची वेळ आली. खरिपातील हे मुख्य पीक धोक्यात सापडल्याने शेतकरी कुटुंबांची अन्नसुरक्षा धोक्यात आली.
या वर्षी तुरीची उगवण आणि वाढ चांगली झाली होती. ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे चित्र तुरीचे विक्रमी उत्पादन होईल असेच होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. धुके तसेच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत तापमान घसरले. काही काळ थंडीचा कडाका पडला. यामुळे फुलोरा येऊनही फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली. जेथे शेंगा लागल्या तेथे पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा धुक्यामुळे आणि अतिथंडीमुळे संयोग होऊ शकला नाही. पाहता पाहता तुरीचे पीक हातचे गेले. काही ठिकाणी अतिथंडीच्या कडाक्याने पीक करपून गेले. काही ठिकाणी चार वेळा पुन्हा पुन्हा फुलोरा येऊनही फलधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले.
तीनही हंगामांत येणारे असा नावलौकिक असलेले सूर्यफुलाचे पीक थंडीच्या आणि धुक्याच्या तडाख्यात सापडले. फुलोऱ्यात आले असताना पुंकेसर आणि स्त्री केसरचा संयोग न झाल्याने बिया पोचट राहिल्या. बिया भरण्यासाठी योग्य तापमानाची गरज असते. ते त्या वेळी न लाभल्याने आणि धुक्यामुळे परिणाम झाल्याने फुले पोचट राहिली. मशिनमधून मळणी करताना वाऱ्याबरोबर पोचट बियांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. राज्यातील काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून माझ्याशी चर्चा केली. त्या आधारे पीक परिस्थिती व हवामान बदलाचे परिणाम यांचा संबंध या लेखाद्वारे मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. परिस्थिती गंभीर आहे. शासन धोरणाची पुनर्रचना करण्याची योग्य वेळ आली आहे, असे मला म्हणावेसे वाटते.
9890041929
(लेखक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
हवामान अत्यंत बेभरवशाचे झाले आहे. दुष्काळ, गारपीट,...
हवामानातील बदलामुळे दुष्काळ,गारपीट, थंडी या रूपांन...
हवामानाच्या परिस्थितीत सध्या सातत्याने बदल जाणवत आ...