অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लायटनिंग अरेस्टरची रचना, सुरक्षा क्षेत्राविषयी महत्त्वाचे


आतापर्यंत आपण पाहिले, की उंच असणाऱ्या वस्तूकडे वीज आकर्षिली जाते. उंच इमारतीवर प्रत्यक्ष वीज कोसळल्यास इमारत उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे विजेपासून वाचण्यासाठी साधारणपणे उंच इमारतीवर टोकदार अशी विजेची संवाहक अशी रचना केलेली दिसून येते. तिला ‘लायटनिंग अरेस्टर’ असे म्हणतात. अनेकदा विजा कोसळून आगीही लागतात, यापासून बचावासाठी लायटनिंग अरेस्टर लाभदायी सिद्ध होते.

  • १७५२ मध्ये बेंजामिन फ्रॅकलिन यांनी लायटनिंग अरेस्टरचा शोध लावला.
  • फ्रान्सचा जगप्रसिद्ध आयफेल टॉवर असो की न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्यदेवतेचा जगातील सर्वांत उंच पुतळा असो, आज जगभरामध्ये एक संरक्षक म्हणून लायटनिंग अरेस्टर आपली भूमिका चोख बजावतो आहे.

अशी असते लायटनिंग अरेस्टरची रचना

१. लायटनिंग अरेस्टर अथवा लायटनिंग कंडक्टर म्हणजे तांब्याचा विद्युतसंवाहक धातूचा गोळा होय. धातूच्या संवाहक गोळ्यावर एक किंवा अधिक काटे जोडलेले असतात.
२. या गोळ्याला जोडलेल्या धातूच्या दांड्यालाच धातूची सुवाहक जाड पट्टी जमिनीपर्यंत जोडलेली असते. आकाशातून कोसळणारी वीज जमिनीकडे वाहून नेण्याचे कार्य ती करते.
३. जमिनीत खोलवर खड्डा खणून त्यात अर्थिंग केलेले असते. अर्थिंगच्या खड्ड्यात एक जाड तांब्याची चौरस प्लेट उभी बसविलेली असते. लायटनिंग अरेस्टरकडून आलेली जाड धातूची पट्टी या प्लेटला जोडलेली असते. खडे मीठ आणि लाकडी कोळशाचे तुकडे यांचे समसमान थर आलटून-पालटून असे एकावर एक टाकून हा खड्डा भरण्यात येतो. खडे मीठ बाष्प शोषून लाकडी कोळशाला ओलावा देते. यामुळे वीज जमिनीत वाहून नेण्यास संवाहकता व मार्ग मिळतो. अशा प्रकारचे तयार मिश्रणही बाजारात उपलब्ध आहे. धातूच्या तबकडीवर पाणी टाकणासाठी एक धातूचा पाइपदेखील खड्ड्याबाहेर काढलेला असतो. यातून पाणी टाकता येते. जमिनीच्या प्रकारानुसार खड्ड्याची खोली मात्र जास्त असणे अपेक्षित आहे.

लायटनिंग अरेस्टरचे सुरक्षा क्षेत्र नेमके किती?

  • आइस्क्रीमच्या उपडा करून ठेवलेल्या कोनाच्या आतील क्षेत्राप्रमाणे लायटनिंग कंडक्टर अथवा लायटनिंग अरेस्टरचे सुरक्षा क्षेत्र असते. लायटनिंग अरेस्टरच्या टोकापासून ४५ अंशांच्या कोनातील प्रदेश हा लायटनिंग अरेस्टरचा असा ‘सुरक्षा कोन’ किंवा ‘सुरक्षा क्षेत्र’ मानले जाते.
  • इमारतीची संख्या, आसपासची झाडे वगैरे परिस्थिती व लायटनिंग अरेस्टरच्या संख्येनुसार यात बदल घडू शकतो.
  • समजा इमारतीची उंची धरून एकूण जमिनीपासून शंभर मीटर उंचीवर लायटनिंग अरेस्टर लावला असल्यास, लायटनिंग अरेस्टर लावलेल्या जागेच्या अगदी खाली जमिनीवर असलेला आभासी बिंदू हा मध्यबिंदू समजावा. या मध्यबिंदूपासून शंभर मीटर त्रिज्या घेऊन बनणाऱ्या आभासी वर्तुळाच्या परिघातील कोनाकार क्षेत्र म्हणजेच त्या लायटनिंग अरेस्टरपासून मिळणारे संरक्षक असे ‘सुरक्षा क्षेत्र’ होय. या क्षेत्रात लायटनिंग अरेस्टर वीज पडू देणार नाही. या क्षेत्रातील व्यक्ती व मालमता विजांच्या कोसळण्यापासून सुरक्षित राहू शकते.

काही महत्‍वाचे...

घरात आपण पाच किंवा पंधरा ॲम्पिअरचा विद्युतप्रवाह (करंट) वापरतो. मात्र आकाशातून कोसळणाऱ्या विजेचा विद्युतप्रवाह हा काही हजार ॲम्पिअरपासून ते दहा लाख ॲम्पिअरपर्यंत असू शकतो. क्षणभरात हा प्रचंड विद्युतप्रवाह लायटनिंग अरेस्टर जमिनीत खोलवर नेऊन सोडतो. त्यामुळे लायटनिंग अरेस्टर लावण्यासाठी आणि त्याच्या अर्थिंगसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणेच उचित ठरते. मानवी जीवन व मालमत्ता या दोन्हींचे संरक्षण लायटनिंग अरेस्टर निश्‍चितपणे करू शकेल.

स्त्रोत: अग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate