অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संत्रा सल्ला

संत्रा सल्ला

  1. अंबिया बहाराच्या फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  2. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अंबिया बहार घेण्याकरिता झाडाला ताबडतोब ताण द्यावा. चांगल्या प्रकारे ताण देण्यासाठी क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड 2 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फवारणी करावी.
  3. बागेत तणनियंत्रण करावे.
  4. बुंध्याजवळ जर मातीचे ढीग असले तर ते तोडून घ्यावेत.
  5. मृग बहारच्या संत्रा व मोसंबी बागेला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. सहा वर्षांच्या झाडाला 41 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. आठ वर्षांच्या झाडाला 65 लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. दहा वर्षांच्या झाडाला 82 लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. लिंबाच्या सहा वर्षांच्या झाडाला 23 लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. दहा वर्षांच्या झाडाला 75 लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे.
  6. मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता एक ग्रॅम जिबरेलिक आम्लामध्ये मोनो पोटॅशियम फॉस्फेट किंवा डायअमोनियम फॉस्फेट किंवा पोटॅशियम नायट्रेट 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून 15 ते 20 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
  7. लिंबावरील पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 1.5 मि.लि. किंवा ऍबामेक्‍टीन 0.30 मि.लि. किंवा नोव्हॅल्युरॉन 1 मि.लि. किंवा डायमिथोएट 1.5 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता भासल्यास वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. परंतु, कीटकनाशक बदलून वापरावे.
  8. कोळी किडीचा प्रादुर्भाव या महिन्यामध्ये मृग बहराच्या फळांवर दिसतो. कोळी किडीच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. पुढे ते हळूहळू काळ्या रंगाचे होतात. कोळी किडीच्या नियंत्रणाकरिता डायकोफॉल 1.5 मि. लि. किंवा इथिऑन 2 मि.लि. किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता भासल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने घ्यावी.
  9. झाडाच्या बुंध्यावर दोन फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता 1 किलो मोरचूद 5 लिटर पाण्यात मिसळावे. तसेच 1 किलो चुना पाच लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मिश्रणे एकत्र करून पेस्ट तयार करावी.
  10. संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्‍याचा स्राव सुरू असेल तर तीक्ष्ण चाकूने ही जागा खरडावी. त्या ठिकाणी मेटॅलॅक्‍झील अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील आम्लाची पेस्ट 200 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात तयार करून खोडावर लावावी.


0712 - 2500325 
डॉ. एम. एस. लदानिया, 
संचालक, 
राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate