पूर्वपरंपरेने पंचक्रोशीतल्या प्रमुख गावी ठरलेल्या वारी आठवडा बाजार भरतो. या आठवडा बाजारात भाजीपाला, फळफळावळ, धान्ये, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी – विक्री केली जाते. अगदी त्याच धर्तीवर जगातल्या बहुसंख्य देशांनी एकत्र येऊन गॅट करार केला आणि त्या करारानुसार सभासद देशांचा एकमेकांशी वेगवेगळ्या वस्तूंचा, खाद्यपदार्थांचा, उपकरणांचा आणि विशेषतः कृषी उत्पादनांचा व्यापार सुरु झाला. त्यामुळे व्यापाराच्या कक्षा खूपच मोठ्या म्हणजे संपूर्ण जग एक बाजारपेठ झाली.
प्रचंड मोठ्या बाजारपेठेत जागतिक खुल्या आर्थिक धोरणामुळे व्यापाराच्या कक्षा वाढल्या. त्याचबरोबर स्पर्धाही वाढली. या स्पर्धेत भारतीय उत्पादने मोठ्या प्रमाणात विकून परकीय चलन मिळवून भारत एक बलवान, वैभवसंपन्न प्रगत असा देश घडवू शकू. फक्त आपण या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे उत्पादकांनी आणि शासनाने मोठ्या जोमाने योजना उपक्रम सुरु केले पाहिजेत.
उद्योगधंद्याप्रमाणे शेती हा उद्योग समजून आवश्यक त्या पायाभूत सुविधा म्हणजे पाणी, वीज, कृषी निविष्टा, औजारे, भांडवल सहजासहजी स्वस्तात उपलब्ध करून दिली पाहिजेत. बागायती क्षेत्र वाढण्यासाठी सिंचन व्यवस्था सक्षम केली पाहिजे. हायटेक तंत्रज्ञान म्हणजे टिश्यू कल्चर, पॉलीहाउसेस, जीवतंत्र ज्ञान सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोच झाले पाहिजे. शाश्वत शेती, शेतीला पूरक व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगाचे जाळे भक्कम केले पाहिजे. कृषीऔद्योगिक वसाहती उभ्या करूब कृषी उत्पादन प्रक्रिया, लघुउद्योग, निर्यातक्षम उत्पादनाचे उद्योग सुरु करण्यासाठी तरुण पिढीला सर्वांगीण साहाय्य आणि प्रशिक्षण तसंच मार्गदर्शन करण्यावर भर दिला पाहिजे.
कृषी मालाच्या साठवणीसाठी गोदामे, कोल्ड स्टोरेज तसंच निर्यातीसाठी प्री- कुलिंग इ. सोयी केल्या पाहिजेत. जास्तीत जास्त कृषी उत्पादने निर्यात व्हावीत यादृष्टीने वेगवेगळ्या देशातल्या उपलब्ध बाजारपेठ, दैनंदिन बाजारभाव कळण्यासाठी संगणक आणि माहिती तंत्राचे जाळे विणले गेले पाहिजे. निर्यातीसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीची भावी व्यवस्था असायला हवी. पुरुष – महिलांना या बाबतची प्रशिक्षणे दिली पाहिजे.
याचबरोबर शेतकर्यांनी कृषी उत्पादनाच्या बाबतीत जास्तीत जास्त उत्पादनाची आणि तेही गुणवत्तेच्या उत्पादनाची मजल गाठली पाहिजे म्हणजे देशाची अंतर्गत गरज भागवून परदेशी माल निर्यात करू शकू.
जागतिक बाजारपेठेत आपला उत्पादित कृषिमाल मोठ्या प्रमाणात विकायचा असेल तर निर्यातक्षम गुणवत्तेचा त्यांना हवा तसा माल पिकवलाच पाहिजे. सगळे निकष सांभाळून निर्यातक्षम मानक समजून घेऊन जर आपण कृषिमालाचे उत्पादन काढले तर, प्रत्येक कृषीउत्पादन जगाच्या कानाकोपऱ्यात विकू शकू एवढी प्रचंड शक्ती आणि सामर्थ्य आपल्यात आहे आणि हे जर आपण केले तर भारत एक महान शक्ती बनण्यास वेळ लागणार नाही.
हळूहळू आपली द्राक्षासारखी कृषी उत्पादने जगाच्या बाजारपेठेत चांगली मजल मारू लागली. आपल्याकडच्या कडधन्यांना तसेच इतर लहानसहान कृषी उत्पादनांना वेगवेगळ्या देशांतून मागणी वाढू लागली आहे. भविष्यात याचा फायदा आपण सर्व शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. जगाच्या बाजारात जे विकते ते पिकवण्याचे धोरण ठेवले पाहिजे.
स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 6/5/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...