इच्छा असेल तर मार्ग दिसतोच... अशीच काहीशी गोष्ट आंध्र प्रदेशातील फसलवाडी, व्यंकटाकिश्तीपूर, शिवमपेठ आणि छाखरियाल या गावांबाबत घडली. "इक्रिसॅट' संस्थेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या गावात पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यातून पाण्याची सोय झालीच, पीक पद्धती सुधारली व शेतकऱ्यांचा आर्थिक विकासही वाढला.
खालावलेली जमिनी प्रत, खतांच्या अधिक मात्रा देऊनही पीक उत्पादनात होणारी घट, घटलेल्या भूजल पातळीमुळे रब्बी, उन्हाळी हंगाम कायम अडचणीत... आर्थिक चणचण ठरलेली... त्यातून आरोग्य, शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष... असे निराशजनक चित्र काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील मेडक जिल्ह्यातील संगारेडी मंडळातील फसलवाडी आणि पुलकल मंडळातील व्यंकटाकिश्तीपूर, शिवमपेठ आणि छाखरियाल गावात होते. गावकऱ्यांच्या मनात हे चित्र बदलण्याची इच्छा होती. चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील परिस्थितीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी हैदराबाद स्थित आंतरराष्ट्रीय अर्ध कोरडवाहू पीक संशोधन संस्थेमधील (इक्रिसॅट) तज्ज्ञांचा गट या चार गावांत आला होता. पारंपरिक पद्धतीने लागवड, रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर, जल- मृद्संधारणाकडे झालेले दुर्लक्ष, जमिनीच्या घसरलेल्या पोतामुळे घटलेली पीक उत्पादकता असे चित्र या गावांचे होते. ते बदलायचे असेल तर महत्त्वाची गोष्ट होती जमिनीची सुपीकता वाढविणे व पावसाच्या पाण्याचे जलसंधारण करणे. या भागातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होती. "इक्रिसॅट'च्या तज्ज्ञांनी पाणलोट विकासाची संकल्पना शेतकऱ्यांना समजावून दिली. तिथून सुरू झाला विकासाच्या दृष्टीने प्रवास ...
सर्व्हेक्षणातून ठरली दिशा...
फसलवाडी, व्यंकटाकिश्तीपूर, शिवमपेठ आणि छाखरियाल या चार गावांचे लागवड क्षेत्र सुमारे 3313 हेक्टर. त्यातील 1880 हेक्टर क्षेत्र कोरडवाहू तर 1035 हेक्टर क्षेत्र बागायती होते. सरासरी पर्जन्यमान 850 मिलिमीटर. चारही गावांची लोकसंख्या सुमारे 12,940. ज्वारी, तूर, हरभरा, करडई, भात, कापूस, ऊस ही प्रमुख पिके. या भागातील जमिनी मध्यम काळ्या आहेत. या जमिनींची पाणी साठवण क्षमताही चांगली, परंतु रासायनिक खतांच्या अति वापराने जमिनीचा पोत घसरलेला. "इक्रिसॅट'च्या तज्ज्ञांनी गावांचे सर्वेक्षण करताना शेतीपद्धती, लोकांचे राहणीमान, आर्थिक स्तर, कुपोषण, आरोग्य, शिक्षण अशा सर्व गोष्टी नोंदविण्यात आल्या. जमिनींच्या खालावलेल्या प्रतीमुळे या भागातील पीक उत्पादकता कमी आहेच, त्याचबरोबरीने त्यातील पोषणमूल्यांचेही प्रमाण कमी आहे हे लक्षात आले. भूजल पातळीही खालावली होती. गावातील माती परीक्षणातील नमुन्यांमध्ये सल्फर, झिंक, बोरॉन, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरदाचे प्रमाण गरजेपेक्षा कमी दिसून आले.
प्रगतीच्या दिशेने...
सर्वप्रथम "इक्रिसॅट' व सबमिलर इंडिया या उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्यात आला. प्रकल्पासाठी ग्रामीण शिक्षण आणि शेती विकास (आरईएडी) या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य घेण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारच्या जिल्हा पाणी व्यवस्थापन यंत्रणेतील तज्ज्ञांनी तांत्रिक मार्गदर्शन आणि पाणी वापराबाबत जनजागृती मोहिमेस सुरवात केली. या विकासाचे मुख्य सूत्र होते एकात्मिक पाणलोट विकास. त्यातून जल-मृद्संधारणाची आखणी करण्यात आली. पीक व्यवस्थापनात सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादकता वाढवणे, शेतीपूरक उद्योगांची उभारणी करणे हा पुढील टप्पा होता.
ग्राम सभेतून तंत्रज्ञानाचा प्रसार -
-निवडलेल्या गावांत जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली.
--जल- मृद्संधारण कामाच्या जागा निश्चित केल्या. जलसंधारणाची बहुतांश कामे गावकऱ्यांच्या श्रमदानातून पूर्ण झाली.
-फसलवाडी, व्यंकटाकिश्तीपूर या गावांत 5560 मीटर शेतबांधांची कामे झाली. यामुळे जमिनीची धूप थांबली.
- 76 लूज बोल्डर स्ट्रक्चर, घळीवर दगडी बांध, गॅबियन तसेच सिमेंट बंधारे अशा विविध ठिकाणी विविध कामे झाली. त्यामुळे जोराच्या पावसामुळे घळीतून उताराच्या दिशेने होणारी मातीची धूप थांबली. पावसाचे व वाहणारे पाणी अडविले गेले, जमिनीत मुरले. भूजल पातळीत वाढ झाली.
- शिवमपेठमधील पाणलोट क्षेत्राचा विचार करून गावात पाझर तलाव बांधण्यात आला. परिसरातील विहिरींमध्ये पाण्याचा पाझर वाढला. शाश्वत पाण्याची सोय झाली.
- गेल्या तीन वर्षांत चारही गावांतील पाणलोट क्षेत्रात सुमारे 75,000 मीटर वर्ग पाण्याचे भूजल पुनर्भरण झाले. जमिनीत
ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढली.
पाणलोटातून शेतीचा विकास...
"प्रत्यक्ष पाहा आणि मग अमलात आणा' या सूत्रानुसार शेतकऱ्यांच्या शिवार शाळा सुरू झाल्या. माती परीक्षणानुसारच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड-रोगनियंत्रण, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार वापर, मूलस्थानी जलसंधारणासारखे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर दिसू लागले. निविष्ठा खर्चात बचत झाली, कोरडवाहू पट्ट्यात तूर, मका, मूग उडीद पिकांच्या सुधारित जातींच्या लागवडीतून उत्पादनात वाढ झाली. खात्रीशीर पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बीत शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने हरभरा, रब्बी ज्वारी, करडईची लागवड केली. बागायती क्षेत्रात सुधारित तंत्राच्या वापराने प्रति हेक्टरी उसाचे उत्पादन 146 टनांवरून 158 टन, भाताचे 4.8 टनांवरून 5.5 टन, हरभऱ्याचे प्रति हेक्टरी नऊ क्विंटलवरून 12 क्विंटल, कपाशीचे 1.6 टनांवरून उत्पादन 1.8 टनांवर गेले.
महिला गटांनी केला दुग्ध व्यवसाय सक्षम
शेतकऱ्यांनी पूरक उद्योगालाही चालना दिली. "बाएफ' संस्थेच्या सहकार्याने चारही गावात 546 गावठी म्हशी आणि 128 गाईंमध्ये कृत्रिम रेतन करण्यात आले. आता जातिवंत कालवडी आणि वगारी शेतकऱ्यांच्या गोठ्यात दिसू लागल्या आहेत. पशुपालनातील नवीन तंत्रज्ञानाबाबत शेतकरी जागरूक झाला.
या गावांच्या परिसरात पेयनिर्मितीचा कारखाना आहे. तेथील वाया जाणाऱ्या स्पेन्ट माल्टचा वापर पशुखाद्यात होत आहे. महिला बचत गटांसाठी पशुपालनाबाबत प्रशिक्षण घेण्यात येते. गेल्या 14 महिन्यांत स्पेन्ट माल्टच्या विक्रीतून प्रियदर्शिनी महिला बचत गटाला 15,200 रुपयांचा नफा झाला आहे. गाई, म्हशींच्या योग्य व्यवस्थापनामुळे फसलवाडी गावात दररोजचे दूध उत्पादन 1080 लिटरपर्यंत वाढले. पशुपालकाला दुग्ध व्यवसायातून दर महिन्याला सरासरी 3680 रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे.
संपर्क - 040-30713071
संकेतस्थळ - www.icrisat.org
(लेखक इक्रिसॅट, हैदराबाद येथे संचालक संशोधन प्रकल्पांतर्गत (पाणलोटक्षेत्र विकास) वरिष्ठ शास्त्रज्ञपदी कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन