অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाण्याचा ताळेबंद मांडणारे गाव

उपलब्ध पाण्याच्या वापराचे काटेकोर नियोजन करणारे गाव म्हणून जालन्यातील शिवणी हे गाव ओळखले जाते. या गावाने पडणाऱ्या पावसाचा थेंबन्‌ थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे केली असून त्याला परिसरातील कृषी विज्ञान केंद्र आणि वॉटर सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या तांत्रिक मदतीची जोड मिळाली आहे. भूगर्भातून 125 फुटांवरून वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले असून दरवर्षी पडणाऱ्या पावसानुसार पाण्याचा ताळेबंद गावामध्ये एकोप्याने मांडला जातो. उपलब्ध पाणी आणि उपलब्ध जमिनीचा मेळ घालत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी बाजूला ठेवूनच शेतीसाठी वापरत आहेत. खरिपातील एका पिकावर अवलंबून असणारे शेतकरी आता दोन पिके घेत आहेत. गावात समृद्धी आली आहे.

शेतकऱ्यांच्या एकोप्याने कामे झाली पूर्ण

- 2000 मध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा एक प्रकल्प गावात सुरू झाला. त्यात दहा शेतकऱ्यांनी भाग घेतला. या प्रकल्पामुळे एकत्र आल्याने लोकांना एकीचे महत्त्व कळले. लोकांना चांगले उत्पादन मिळाल्याने हुरूप वाढला. त्यात 2001 या वर्षी शासनाचे ग्राम स्वच्छता अभियान सुरू झाले. गावाने त्यात भाग घेतला. जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 
- गावातील एकोपा पाहून वॉटर संस्थेने लोक सहभागातून दारिद्य्रनिर्मूलन हा 100 दिवसांचा प्रकल्प राबवला. त्यात जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यासाठी गावाने 16 टक्के कामे श्रमदानातून करण्याची अट होती. मात्र गावाने जलसंधारणाची कामे 32 टक्‍क्‍यांपेक्षा श्रमदान करत 55 दिवसांत पूर्ण केली. या कामात 250 ऐवजी 280 दगडी पोवळी, माती नाला बांध उभारणी (यातील काही कामे कृषी विभागाच्या माध्यमातून), शेतीची बांधबंदिस्ती, 10 ऐवजी 12 सिमेंट नाला बांध, गावशिवारामध्ये जलशोषक चर, चिबड चर अशी कामे पूर्ण करण्यात आली. सरासरी पावसाला गावशिवाराची अपधाव 198 टीसीएम (हजार अब्ज घन मीटर) आहे, या कामामुळे त्यापैकी 114 टीसीएम पाणी अडविण्यात यश आले. 
- पाणी साठविण्यासाठी गावातील 10 टीसीएम तलावाचा गाळ काढण्यात आला. त्यामुळे पाणी साठपात वाढ झाली. 2004 पर्यंत ही कामे पूर्ण झाली. 

तांत्रिक मार्गदर्शन ठरले महत्त्वाचे...

- ही कामे पूर्ण झाल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्या वर्षी सरासरीएवढा पाऊस होऊनही अपेक्षित पाणी मिळाले नाही. त्यावर जालना येथील कृषी विज्ञान केंद्रातील पंडित वासरे, तसेच औरंगाबाद आणि पुणे येथील भूगर्भ सर्वेक्षण विभाग "जीएसडीए' यांच्या तांत्रिक मदतीने गावातील भूगर्भाचा अभ्यास करण्यात आला. 
- या अभ्यासात गावशिवारातील पाणी भूगर्भामध्ये मुरल्यानंतर एका विशिष्ट खोलीवरून वाहून जात असल्याचे लक्षात आले. त्यावर उपाययोजना म्हणून भूगर्भातील पोकळ्या बंद करण्याच्या सूचना व प्रस्तावित खर्चाचा अंदाज दिला. ही घटना 24 मे 2005 च्या दरम्यान घडली. 
- त्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या शिवकालीन पाणी साठवण योजनेमधून निधी उपलब्ध झाला. त्यात 10 टक्के लोकवाटा अपेक्षित होता. भूगर्भातून 125 फुटाखालून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी ओळीने बोअर घेऊन त्यामध्ये सिमेंट स्लरी भरण्यात आली. याला इंग्रजीमध्ये "फ्रॅक्‍चरिंग सिमेंट सीलिंग' म्हणतात. हे महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच काम होते. 
- या कामामुळे गावातील बोअर आणि विहिरींना चांगले पाणी उपलब्ध झाले. पूर्वी कोरडवाहू असलेले गाव खरिपातील एका पिकाऐवजी दोन पिके घेऊ लागले. मात्र पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने गावाने प्रयत्न सुरू केले. 
- गावात पडलेल्या पावसाचे मोजमाप करण्यासाठी गावात पर्जन्य मापक बसवून पाण्याचा जलालेख तयार केला. त्यावर आधारित पाण्याचा ताळेबंद 2006 मध्ये मांडण्यात आला. पाण्याचा ताळेबंद मांडणारे पहिले गाव ठरले. 
- गावातील उपलब्ध पाणी आणि उपलब्ध जमीन यांचा ताळमेळ ठेवत पिण्याच्या, जनावरांच्या पाण्याला प्राधान्य देत शेतीसाठी पाणी वापरले जाते. 
- शेतामध्ये पाटपाणी देण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली असून सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. गावात ठिबक सिंचन 100 एकर, तुषार सिंचन यंत्रणा प्रत्येकाकडे आहे. 
- पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पाच वर्षापासून शेडनेटखालील शेतीला सुरवात केली. आता शेडनेटमध्ये शेती करणारे दहा शेतकरी असून, कमी पाण्यावर येणारे कांदा व भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 
- गावात दोन ट्रॅक्‍टर वरून आज दहा ट्रॅक्‍टर आहेत. दोन मोटार सायकलींवरून 40 मोटार सायकली आणि चार चारचाकी गाड्या झाल्या आहेत. 

यंदाची परिस्थिती-

- या वर्षीचा पाऊस 240 मिलिमीटर असून सरासरीच्या एक तृतीयांश झाला आहे.
- गावाला पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची अडचण होणार असल्याचे ऑक्‍टोबरमध्ये लक्षात आले. कुठल्याही पिकाला पाणी देणे शक्‍य होणार नसल्याने रब्बीमध्ये कोणतेही पीक न घेण्याचा निर्णय गावाने घेतला आहे. 
- 15 फेब्रुवारीपर्यंत गावात हापशाना पाणी होते. मात्र हळूहळू ते पाणी कमी होत आहे. 

संपर्क - उद्धव खेडेकर, 9423730657

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate