ज्या अपघातांमुळे कामगारांना झालेल्या जखमा काही काळानंतर बऱ्या होतात, ते तात्कालिक वा हंगामी स्वरूपाचे अपघात व गंभीर जखमा होऊन कामगारांना कायमची असमर्थता (डिसॅबिलिटी) अथवा मृत्यू येतो, ते कायमस्वरूपी अपघात होत.
औद्योगिक अपघात हे ‘अपघात-वारंवारता-प्रमाण’ आणि ‘गंभीर-अपघात-प्रमाण’ अशा दोन प्रकारांनी मोजतात. एका ठराविक काळात धोकादायक उद्योगधंद्यांतील अपघातांची संख्या व अपघाती कामगारांची संख्या, ह्यांच्या प्रमाणाला ‘अपघात-वारंवारता-प्रमाण’ म्हणतात. एका काळातील एका ठिकाणाच्या या प्रमाणाची दुसऱ्या काळातील दुसऱ्या ठिकाणाच्या प्रमाणाशी तुलना करता येते. या प्रमाणाची व्याख्या ‘प्रत्येक एक लक्ष मनुष्य-तासांमध्ये झालेल्या अपघातांची संख्या’ अशी असून ते पुढीलप्रमाणे काढतात :
अपघात-वारंवारता-प्रमाण = |
अपघातांची संख्या |
X १,००,००० |
कामगार-तास |
गंभीर अपघात (मृत्युपर्यवसायी) व फारसे गंभीर नसलेले अपघात यांतील फरक स्पष्ट व्हावा म्हणून गंभीर-अपघात-प्रमाण काढण्याची रीत आहे.
गंभीर-अपघात-प्रमाण = |
वाया गेलेले दिवस |
X १,००,००० |
कामगार-तास |
निरनिराळ्या उद्योगांतील अपघात-वारंवार व गंभीर-अपघात-प्रमाण यांत बराच फरक असतो. त्याचप्रमाणे विशिष्ट उद्योगातील दोन्ही प्रमाणांत नेहमीच परस्परसंबंध नसतो. उदा., निर्मिती-उद्योगात अपघात वारंवारता-प्रमाण उच्च व गंभीर-अपघात-प्रमाण नीच असते. याउलट बांधकाम-उद्योगात दोन्हीही प्रमाणे उच्च असतात. विद्युत्-यंत्रोद्योग व विमान-उद्योग यांत इतर उद्योगांच्या मानाने अपघात वारंवारता-प्रमाण कमी असते.
औद्योगिक अपघातामुळे प्रत्यक्ष अपघातात सापडलेले कामगार, त्यांचे कुटुंबीय, मालक व समाज यांवर पडणाऱ्या आर्थिक बोजाची निश्चित आकडेवारी काढणे अशक्य असते. हानीचा अदमास घेताना प्राप्तीची तूट, वैद्यकीय खर्च, नुकसानभरपाईची रक्कम, यंत्राची मोडतोड व उत्पादनात पडणारा खंड यांचा विचार करावा लागतो.
अपघाताने असमर्थता आल्यामुळे वा मृत्यूमुळे हजारो कामगार-दिवसांचे नुकसान होते, इतकेच नव्हे, तर अपघात न झालेल्या कामगारांच्या कामाचे तास वाया जातात. अपघातात सापडलेल्या कामगारांना मदत करण्यासाठी इतर कामगार धावतात किंवा घडलेल्या अपघाताची चर्चा करतात; गंभीर अपघातामुळे इतर कामगारांच्या उत्पादन-क्षमतेवर परिणाम होऊन उत्पादनघट होते; नवी यंत्रे बसविण्यात वेळ फुकट जातो.
अपघात अनेक कारणांनी होतात. कारखान्यांत मोठमोठ्या वस्तू हलविताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याची कारणे वस्तू हलविण्याचा रस्ता चांगला नसणे, अवजड वस्तू हालविताना कामगारांत सांघिक दूरदृष्टीचा अभाव असणे, वस्तूंच्या वजनाचा अंदाज नसणे, वस्तू एकमेकांवर कशा ठेवांव्यात वा त्या कशा उचलाव्यात यासंबंधी अज्ञान असणे ही होत. विद्युत् चलित यंत्रांवर काम करताना ती यंत्रे पुरेशी सुरक्षितपणे झाकलेली नसल्यामुळे बरेच अपघात घडून येतात. यांव्यतिरिक्त यांत्रिक अवजारे हाताळताना किंवा अवजड वस्तू कामगारांच्या अंगावर पडून अपघात होतात.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार प्रतिवर्षी होणारे औद्योगिक अपघात इतर अपघातांच्या एकपंचमांश व औद्योगिक अपघातात घडणारे मृत्यू इतर अपघाती मृत्यूंच्या एकसप्तमांश असतात, असे आढळून आले आहे. अमेरिकेत प्रूडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या पाहणीवरून १९०८ मध्ये औद्योगिक अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची संख्या तीस–पस्तीस हजार होती. हे अपघात टाळण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा उभारण्याची कल्पना अमेरिकेत विसाव्या शतकाच्या प्रारंभी उदय पावली. सामाजिक—खाजगी संस्था व कारखानदार यांनी परस्परसहकार्याने १९१३ मध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षिततामंडळ’ स्थापन केले. अमेरिकेतील सर्व महत्त्वाचे उद्योगधंदे या मंडळाचे सदस्य आहेत. मंडळ सदस्यांना निरनिराळ्या औद्योगिक अपघातांची आकडेवारी, उपाययोजना व सेवासुविधा उपलब्ध करून देते. देशातील व्यापारी संघटना, विमाकंपन्या, कामगारसंघटना सुरक्षितता-उपायांच्या संवर्धनास यशस्वीपणे हातभार लावतात.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून इंग्लंडमध्ये कारखाना-कायद्यानुसार कारखानदारांनी अपघातात सापडलेल्या कामगारांना मदत करणे बंधनकारक झाले. कारखानदारांनी स्वेच्छा अधिकाधिक सुरक्षितता-उपायांचा अवलंब केलेला असून परिणामी औद्योगिक अपघातांचे प्रमाण हळूहळू घटत आहे. इंग्लंडमध्ये काही खाजगी संस्था औद्योगिक अपघात-प्रतिबंधाचे कार्य करतात. त्यांमध्ये ‘रॉयल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडेंट्स’ (‘रॉस्पा’) आणि ‘ब्रिटिश स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन’ या प्रमुख होत. इंग्लंडमधील बहुतेक मोठे उद्योगधंदे रॉस्पाचे सदस्य असून पस्तीस लक्ष कामगार रॉस्पाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतात.
आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या स्थापनेनंतर (१९१९) खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक अपघात--प्रतिबंधात्मक सुरक्षाउपायांची माहिती, त्यांबाबतचे संशोधन व कायदे यांमध्ये वाढ झाली. संघटनेच्या औद्योगिक सुरक्षितता-विभागाने गोद्या, बांधकामउद्योग, कोळसाखाणी व कारखाने ह्यांमधील कामगारांकरिता सुरक्षितता-नियम तयार केले आहेत. धोक्याची यंत्रे, पदार्थ व कार्ये ह्यासंबंधीच्या माहितीपूर्ण तांत्रिक पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. संघटनेच्या स्थापने- नंतर आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया व लॅटिन अमेरिका ह्यांमधील देशांत औद्योगिक अपघात-प्रतिबंधक समित्या उभारण्यात आल्या. विसाव्या शतकाच्या मध्यास तत्संबंधीचे कायदे सर्व देशांत करण्यात आले.
कारखान्यातील कामगारांचे आरोग्य व सुरक्षितता ह्यांविषयी स्वातंत्र्यपूर्व भारतात शासकीय नियंत्रणांचा पूर्ण अभाव होता. कामगारांचे अपघातांपासून संरक्षण करण्याबद्दलची कोणतीही प्रभावी योजना नव्हती. त्यामुळे इतर देशांच्या मानाने भारतातील औद्यागिक अपघातांचे प्रमाण फार होते. जखमी झालेल्या कामगारास नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद नव्हती. १९२३ च्या कामगार-हानिपूर्ती-अधिनियमानुसार कामगारांना अपघात झाल्यास किंवा काम करीत असताना मृत्यू आल्यास भरपाईची तरतूद करण्यात आली. १९४८ मध्ये कामागार-विमा-योजना सुरू झाली.
तक्ता क्र. १
अनु. |
प्रमुख उद्योग |
अपघातांचे प्रमाण |
सरासरी हानिपूर्ती |
कारखाने मळे-उद्योग खाण-उद्योग रेल्वे गोद्या व बंदरे ट्रॅमवे टपाल व तारखाते बांधकाम-उद्योग ननगरपालिकीय उद्योग इतर |
|||
सरासरी |
३४·३१ |
२१२ |
तक्ता क्र. २
वर्ष |
कारखाने |
खाणी |
||||
गंभीर |
गंभीर |
एकूण |
गंभीर |
गंभीर |
एकूण |
|
१९६५ |
५८७ |
२,०२,२३६ |
२,०२,८२६ |
५४७** |
३,२९८ |
३,८४५ |
१९६६ |
५९१ |
२,०८,२५३ |
२,०८,८४४ |
३१९ |
३,२१० |
३,५२९ |
१९६७ |
५३७ |
१,९३,८८७ |
१,९४,४२४ |
२९३ |
२,८३७ |
३,१३० |
[*तात्परती आकडेवारी;** ह्या आकड्यात घोरी येथील कोळसाखाणीत मेलेल्या २६८ कामगारांचा अंतर्भाव आहे.]
भारतातही राष्ट्रीय-सुरक्षितता-मंडळ ४ मार्च १९६६ रोजी स्थापन झाले. औद्योगिक सुरक्षिततेवरील पहिली राष्ट्रीय परिषद मार्च १९७० मध्ये व दुसरी परिषद एप्रिल १९७१ मध्ये मुंबई येथे भरली होती. राष्ट्रीय-सुरक्षितता मंडळाचे प्रधान उद्दिष्ट मालक, कामगार व कामगार-संघटना यांना एकत्र आणून सुरक्षिततेसंबंधीच्या उपायांची चर्चा तसेच औद्योगिक अपघातांमध्ये घट करण्याचा प्रयत्न करणे हे आहे. सुरक्षिततेची जबाबदारी ही मालक, कामगार संघटना व शासन अशी त्रिपक्षीय असल्यामुळे मंडळावर मालकसंघ व कामगार –संघटना यांच्या प्रत्येकी आठ प्रतिनिधींची नियुक्ती होते; आणखी ३२ प्रतिनिधींची मंडळाच्या सदस्यांकडून निवड होते आणि आरोग्य व सुरक्षितता ह्या क्षेत्रांतील दोन तज्ञ ह्या मंडळावर असतात. एकंदरीत मंडळावर ५० प्रतिनिधी असतात.
सर्वसाधारण:, अपघात-प्रतिबंधक उपायांमध्ये वैधिक आणि शासकीय उपायांबरोबरच, कामागारांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे व वाढविणे ह्या करिता कामगार-प्रशिक्षणाचे प्रमाण सतत वाढते ठेवणे अत्यावश्यक ठरते.
भारतातील गंभीर (प्राणघातक) व गंभीर नसलेल्या औद्योगिक अपघातांचा १९६७–७२ या सहा वर्षांकरिता अभ्यास केला असता, दर वर्षी अपघातांचे प्रमाण—१९६९ सालापासून प्रकर्षाने—वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे पुढील तक्त्यावरून स्पष्ट होईल :
तक्ता क्रं. ३ :
अखिल भारतातील औद्योगिक अपघातांची आकडेवारी
वर्ष |
गंभीर नसलेले अपघात |
प्राणघातक अपघात |
१९६७ |
१,९८,७१० |
५५२ |
१९६८ |
२,१०,६९४ |
५६७ |
१९६९ |
२,६२,६१५ |
६१६ |
१९७० |
२,७०,००० |
५७२ |
१९७१-७२ |
३,२२,४१६ |
६१९ |
भारतातील सहा राज्यांत मिळून, १९७१-७२ या वर्षी ८५·६९ टक्के एवढे औद्योगिक अपघातांचे प्रमाण होते. त्यांमध्ये पश्चिम बंगालचा (३७·२१%) पहिला क्रम लागतो. त्यानंतर महाराष्ट्र (२०·६९%), तमिळनाडू (८·९५%), गुजरात (८·९४%), मध्यप्रदेश (५·५४%) व उत्तर प्रदेश (४·३६%) ही राज्ये येतात.
भारत, ग्रेट ब्रिटन व अमेरिका या देशांमधील प्रत्येक १,००० कामागारांमागे अपघात-वारंवारता-प्रमाण दाखविणारे १९६७ व १९६८ या वर्षांतील आकडे तक्ता क्र. ४ मध्ये दिलेले आहेत.
तक्ता क्र. ४ : अपघात-वारंवारता-प्रमाण
वर्ष |
भारत |
ग्रेट ब्रिटन |
अमेरिका |
१९६७ |
४८·१३ |
३१·५ |
२५·२ |
१९६८ |
५७·३९* |
३४·० |
२४·० |
[* तात्पुरते]
वरील आकडेवारीरून भारतातील अपघात-वारंवारतेचे प्रमाण ग्रेट ब्रिटन व अमेरिका या देशांमधील अपघात-
-वारंवारता-प्रमाणाच्या अनुक्रमे सु. दुप्पट व अडीचपट असल्याचे दिसून येईल.
महाराष्ट्र राज्यात १९६९ मध्ये १०३ प्राणघातक व ५९,९१२ गंभीर नसलेले औद्योगिक अपघात घडून आले; १९७० मध्ये हेच आकडे १२८ व ६२,८२० असे होते; याचाच अर्थ हा की, महाराष्ट्रात प्रत्येक १०० कामगारांपैकी ८ कामगार दरवर्षी अपघातात सापडतात.
भारत सरकारने औद्योगिक अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राष्ट्रीय सुरक्षितता पारितोषिकांच्या तीन योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. अपघात-वारंवारता-प्रमाणात घट करणाऱ्या, अपघात-वारंवारतेचे कमीत कमी प्रमाण असणाऱ्या आणि प्रदीर्घ कालात औद्योगिक अपघात अजिबात न होऊ देणाऱ्या कारखान्यांना ही पारितोषिके मिळतात.
पहा : कामगार-कल्याण; कामगार-राज्यविमा योजना; सामाजिक सुरक्षा.
लेखक : गद्रे, वि. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/29/2020