অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम) जागृती दिनाबद्दल..

सध्या मानवाच्या मागे कोणत्या व्याधी लागतील हे सांगता येत नाही. अनेकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रस्त आहे. असाच एक आजार आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम). २ एप्रिल हा दिवस जागतिक आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम) जागृती म्हणून जगभरात साजरा केला जातो. या अनुषंगाने राज्य शासन देखील विविध जनजागृतीपर उपक्रम राबवीत आहे. जाणून घेवूया या आजारासंबंधी...

ऑटिझम काय आहे ?


ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा लहान मुलांमधील एक न्युरोलॉजिकल आजार आहे. ऑटिझम म्हणजे स्वतःमध्येच गुंतून असणं. ऑटिस्टिक मुलाचा बाह्य जगाशी जणू काहीच संबंध नसतो. याचा परिणाम भाषा आणि अनेक गोष्टींवर होतो. ऑटिस्टिक मुलांमध्ये बाह्य जगाशीच कमी संबंध असल्यामुळे त्यांची भाषेची वाढ खुंटते. तसे पाहिले तर लहान मुलांच्या मानसिक आजारावर उपचार करणे अवघड असते. त्यांच्या समस्येकडे लवकर लक्ष दिले जात नाही.

आजकाल लहान मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा अर्थात ऑटीझम हा आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहे. हा एक मानसिक आजार आहे. मूल जन्माला आल्यानंतर लगेचच याची लक्षणे त्यांच्यामध्ये दिसून येतात. अशा मुलांचा विकास सामान्य मुलांप्रमाणे होत नाही, ती मुले आक्रमक असतात. त्यांची शारीरिक वाढही नीट होत नाही. गुणसूत्रांचे एकत्रीकरण होत असताना जन्मल्यापूर्वीच मुलांच्या मेंदूवर आघात होतो. त्यामुळे त्यांच्या इतर संस्थांवर परिणाम होतो. मज्जासंस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था, स्नायूसंस्था अशा सर्व संस्थांच्या शरीरामधील कार्यपद्धती मेंदूच्या या अवस्थेमुळे कमजोर होतात. बाळाची वाढ होत असताना त्याच्या सर्व अवयवांवर कमी-अधिक विकलता येते. त्यामुळे ही मुले आत्मकेंद्री बनतात आणि ती इतरांमध्ये पटकन मिसळत नाहीत. ही मुले भित्रीही असतात. अशा मुलांना समजून घेण्याची, त्यांच्यातल्या कलागुणांना पारखून ते विकसित करण्याची गरज असते.

प्रामुख्याने जाणवणारी लक्षणे

ऑटिझमची लक्षणे शक्यतो पालकांच्या लक्षात येत नाहीत. वयाच्या तिसऱ्या वर्षी ही लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात. तीन वर्षांनंतर मुल अचानक बोलायचे थांबते. कानाची तपासणी केली तरी त्यात दोष आढळत नाही. या काळात मुल बोलत नाही आपल्या गरजा सांगत नाही. आंघोळ, जेवण यालाही मुल प्रतिकार करायला लागते. इतके दिवस बोबडे बोल बोलणारे मुल अचानक न बोलते झाल्याने पालकही चिंतेत पडतात. खरं तर बाहेरच्या जगाची त्यांना कल्पनाच नसते. त्यांना तोचतोचपणा आवडतो. त्यामुळे दैनंदिन कार्यक्रम थोडा जरी बदलला तरी त्यांना राग येतो. काही मुलं त्यातून बरीच हिंसकही होतात.

ऑटिझमवर मात करताना


प्रत्येक मुलातील लक्षणे वेगवेगळी असल्याने त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे लागते. राज्यातही अनेक सामाजिक संस्थांनी ऑटिझमग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी वेगळ्या शाळा आता उपलब्ध झाल्या आहेत. पण अजूनही वेगळ्या शाळेत मुलाला पाठविणे पालक कमीपणाचे समजतात, पण त्यांना अशा वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज असतेच. अशा शाळांमध्ये त्यांना आनंद देणाऱ्या विविध गोष्टी शिकविल्या जातात. अशा मुलांना एकच काम वारंवार करायला कंटाळा येत नसतो. यात बौद्धिक, मानसिक, सामाजिक इत्यादी आयुष्यातील भागांचा विकास होण्यास वेगवेगळ्या नृत्यांचासुद्धा वापर करतात. समस्या गंभीर असेल तर वैयक्तिक उपचारही उपलब्ध आहेत. तसेच समूहाने देखील उपचार केले जातात.

अशा मुलांची काळजी कशी घ्यावी


त्यांच्याशी संवाद वाढवावा. त्यांच्यात मिसळून एकरूप होवून गप्पा माराव्यात. त्यांना इतर मुलांमध्ये मिसळून द्यावे. खेळण्यासाठी त्यांना मुभा द्यावी. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून त्यांना दूर ठेवावे. बौद्धिक विकास करणाऱ्या खेळण्यांचा त्यांना अधिकाधिक वापर करायला द्यावे. यामुळे त्यांच्या मेंदुला चालना मिळेल. 

ऑटिझमवर मात करताना सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. अनेक राष्ट्रे यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करत आहेत. भारतातही अनेक सामाजिक संस्था याबाबत कार्य करत आहेत. याकडे पाहताना सामाजिक दृष्टीकोन बदलायला हवा. पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि शासनस्तरावर प्रयत्न झाल्यास स्वमग्नतेला (ऑटिझमला) आपण प्रतिबंध करू शकू.
जागतिकस्तरावर देखील याबाबतीत गांभीर्याने पाऊले उचलली जात आहेत. या आजाराच्या जागृतीसाठी उपाययोजना लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी जागतिक पातळीवर विविध देशांच्या तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निर्मूलनाचे भरीव प्रयत्न होत आहेत.

लेखक - सचिन पाटील
स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 3/6/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate