अमेरिकेत Speech Pathologist म्हणून आणि Rehab Medicine च्या विभागातील एक सहकारी म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या मीना परांजपे यांचा एक प्रसन्न अनुभव.
रॉबी हा माझा एक ३ वर्षांचा छोटा ’बॉयफ्रेंड’ होता. त्याला middle ear मध्ये काही अडचणी होत्या. (कानाचे outer-middle-inner असे ३ भाग असतात.) त्यामुळे त्याला खूपच कमी ऐकू यायचं. तो डोक्याने चांगला होता, पण ऐकू आलं नाही तर बोलणार कसं? श्रवणयंत्र बसवून त्याची समस्या दूर होणार नव्हती. Structural समस्या होती. एक अगदी छोटीशी अर्ध्या तासाची सर्जरी करावी लागणार होती. तीन-चार तासातच त्याला घरी परत येता येणार होतं. तो मला त्याच्याबरोबर येण्याचा आग्रह करत होता. कामामुळे मला ते शक्य नव्हतं. मग मला एक युक्ती सुचली. माझ्या क्लिनिकमध्ये लहान मुलांसाठी खेळणी ठेवलेली होती. त्यातला एक छोटा दोन-अडीच इंची ट्रक त्याला फार आवडायचा. मी त्यात मुठीने काहीतरी भरल्याचा आविर्भाव केला. त्याला म्हटले, हे बघ, मी तुला माझ्या शुभेच्छा देतेय. अगदी ट्रक भरून देते. तू हा ट्रक हातात ठेव. मग तुला मी जवळ असल्यासारखे वाटेल. नर्व्हस वाटणार नाही. त्याच्या आईच्या व माझ्या सांगण्याचा चांगला परिणाम झाला. रॉबी कबूल झाला.
डॉक्टरांनी ट्रक बाजूला ठेवायला सांगितलं तेव्हा रॉबीने साफ नकार दिला. माझ्या गर्लफ्रेंडच्या शुभेच्छा त्यात आहेत म्हणून जोरात सांगितलं. त्याच्या हातातल्या ट्रकने डॉक्टरांची अडचण होणार नव्हती. त्यांनी परवानगी दिली. सर्जरी यशस्वी झाली. डॉक्टर रॉबीला म्हणाले तुझ्या गर्लफ्रेंडला सांग तिच्या शुभेच्छांचा फायदा झाला. सर्जरी यशस्वी झाली आहे.
रॉबीच्या आईने मला फोनवर सगळी बातमी दिली. संध्याकाळी काम संपवून घरी जाताना मी एक भलंमोठं चॉकोलेट आणि ’गेट वेल सून’ चं कार्ड घेऊन पाच-दहा मिनिटे माझ्या या छोट्या बॉयफ्रेंडला भेटून घरी गेले. पुढे नीट ऐकू येऊ लागल्यामुळे रॉबीची प्रगती वेगाने झाली. नंतर तो शाळेत गेला तरी त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला बर्याच वेळा येत असे!
मीना परांजपे
paranjpe@sfu.च
स्त्रोत:
अंतिम सुधारित : 4/18/2020