कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. २६ जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा होतो...त्याविषयी.
उद्या संपूर्ण देशात 18 वा कारगिल विजय दिवस साजरा केला जाणार आहे. इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखाच आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कारगिल विजय दिवस’ देशभरात साजरा करण्यात येतो. याच दिवशी भारतीय सैन्याच्या जवानांनी कारगिलमध्ये विपरित परिस्थितीत शत्रूसैन्याला नामोहरम केले. कारगिलच्या शहिदांचे नागरिक सन्मानाने स्मरण करण्याबरोबरच, देशातील सैनिकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो. देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देशभरात करण्यात येत असते. भारतीय सैन्याचे देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रद्धा, शारीरिक व मानसिक सामर्थ्य, तसेच वीरवृत्ती उल्लेखनीय असते आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातही उद्या 18 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी राज्यातील 34 लाभार्थींना धनादेश आणि ताम्रपट देऊन त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात येणार आहे. सैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांच्या विकासासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यासह त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असते. सैनिकांच्या कुटुंबासाठी शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील. कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. त्यावेळी आपले सैनिक स्वत:सह कुटुंबाचाही विचार करीत नाही, फक्त देशाचाच विचार करतात. देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणे हे आपले सामाजिक कर्तव्यच आहे.
-वर्षा फडके
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 10/11/2019