आषाढश्य प्रथम दिवसे...
आषाढ शुक्ल प्रतिपदा म्हणजे महाकवी कालिदास दिन. उत्तुंग प्रतिभेच्या कविकुलगुरु कालिदासांचे ‘मेघदूत’ हे संस्कृत महाकाव्य काल्पनिक कथेवर आधारित असले तरी प्रत्येकाला ते आपलेच विरहगीत आहे, असे वाटते. आषाढातील कमीत कमी पहिले तीन दिवस बायको माहेरी पाठविण्याची मराठवाडी पद्धत मेघदुताचीच प्रेरणा असावी, असे वाटते.
विरही जीवांना प्रियत्तमेच्या पुनर्मिलनाची आशा शतगुणित करणारा, जलस्नानासाठी आसुसलेल्या अवनीला हर्षाचे उधाण आणणारा, वैशाख वणवा विझवणारा, विद्युल्लतेच्या सुवर्णरेखांनी प्रियत्तमेच्या गावाची दिशा दाखविणारा, पावशांना जलदान करणारा, आनंदातिरेकाने प्रणयधुंद होणार्या मोरांना पिसारा फुलवायला लावणारा आषाढमास आणि आषाढमेघ !
यावर्षी मराठवाड्यातील शेतकरी या सार्यांची आतुरतेने वाट पाहात आहे. मृग संपला तरी शेतं तहाणलेलीच आहेत. पावसाला साद घालून घालून पावशाचा घसा बसला आहे. डोक्यावरुन अफाट वेगाने पांढरे ढग पुढे निघून जात आहेत. अंगातून घामाच्या धारा वहात आहेत. गुरंढोरं, पशूपक्षी, वृक्षवल्लरी आणि बळीराजाच्या तोंडाला कोरड पडली आहे. त्यांच्या पोटांत आणि रानोमाळ वणवा पेटला आहे.
बा पांडुरंगा ! वारी फुटायच्या आत आकाशातले ढगही फुटू दे. लाखो वारकर्यांच्या पावलांना चिखल लागू दे. निसर्गातल्या टाळ-मृदंगाच्या मधूर ध्वनीने सारे आसमंत भरुन जाऊ दे. वारकर्यांचे आणि धरणीमातेचेही पारणे फिटू दे.
सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर.
अंतिम सुधारित : 4/17/2020