मानवी समूहाची उन्नतावस्था म्हणजे समाज आणि समाजाची पतितावस्था म्हणजे समूह. कुठल्याही समाजाची दोन महत्वपूर्ण अंगं असतात, संस्कृती आणि सभ्यता. बहुतेक वेळा संस्कृती व सभ्यता हे शब्द पर्यायवाचक म्हणूनच वापरले जातात. परंतू दोहोत सूक्ष्म फरक आहे. संस्कृती म्हणजे धार्मिक, सामाजिक, राजकिय, वैचारिक सुधारणांची स्थिती अथवा अवस्था. इतरांचा विचार करत समाजात केली जाणारी वर्तणूक व/वा व्यवहार ही सभ्यता. देश काल परिस्थितीनुरुप स्वत:ला व इतरांना आनंद देणारी सहज वर्तणूक म्हणजे सभ्यता. समाजात वागताना परस्परांशी पाळण्याच्या रीती-भाती म्हणजे शिष्टाचार. समाजस्वास्थ्यासाठी काही नीती-संकेत पाळावे लागतात. आपल्या घरी आपण स्वतंत्र असलो तरी आपल्याला वाट्टेल तसे वागण्यास समाजमान्यता मिळत नाही. इतराच्या भावनांचा योग्य तो आदर राखणे हा समाजजीवनाचा मूळ पाया असतो. परोपकारबुद्धी, दया, शहाणपण, दूरदृष्टी, न्यायबुद्धी, सत्याची चाड व अन्यायाची चीड, इंद्रियनिग्रह, मनमिळाऊपणा इत्यादी अनेक सात्विक गुणांचा समुच्चयाने विकास म्हणजे माणूसकी असे लोकमान्य टिळक म्हणतात. कालानुरुप या सार्यात बदल होणे हे अपरिहार्य व क्रमप्राप्तच असते. फक्त अशा बदलांमूळे समाजस्वास्थ्य बिघडणार नाही, भावी पिढ्यांवर त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. समाजात जगणे म्हणजे जोडणे. कुटुंबाशी, परिसराशी, संस्कृतीशी. यासाठी प्रेम आवश्यक असते. प्रेमाने जवळीक निर्माण होते, आपुलकी वाढते, विश्वास वृद्धींगत होतो, सुरक्षित वाटते. द्वेशाने अंतर वाढते, अविश्वास निर्माण होतो, असुरक्षित वाटते. मानवी जीवन जगत असताना सुखासाठी भौतिक वस्तूंचा उपयोग करावाच लागतो. सुखाचा भोग घेणे गैर नाही परंतू त्याचा अतीमोह आवरलाच पाहिजे. अनियंत्रित भोगलालसेला भोगवाद म्हणतात व अनावश्यक गरजांवर खर्च करण्याच्या वृत्तीला चंगळवाद म्हणतात. नैतिक मार्गाने व निकोप स्पर्धेतून निर्माण होणारी आर्थीक संपन्नता समाजाचे वैभव असते तर जीवघेण्या अनैतिक स्पर्धेतून निर्माण होणारी आर्थिक संपन्नता समाजाच्या अध:पतनास कारणीभूत होते. अशा आर्थीक संपन्नतेमूळे भोगवादी, चंगळवादी जीवनशैलीची चटक लागते. अनावश्यक गरजा वाढत जातात. त्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा अनैतिक मार्गाने धनसंपत्ती जमा करण्याचे प्रयत्न केले जातात. अशा दुष्टचक्रात अडकल्यानंतर इतरांचा विचार करायला वेळच मिळत नाही. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक होतो. व्यक्तीगत प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जातो. यातून मला कुणाची गरज नाही अशी बेफिकीर अहंकार वृत्ती अंगी चढते. बर्याचदा शरिराने जवळ असणारे मनाने जवळ असतीलच असे नाही. कुटुंबसंस्था विस्कळीत होते. पिकल्या पानांची परवड होते. शेजारी नवीन जीव जन्माला आला काय किंवा कोणी मेला काय त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. कुटुंबात राहूनही व्यक्ती एकटीच राहते. सहजीवनातला आनंदच नाहीसा होतो. समाजाची वाटचाल पुन्हा समूहाच्या दिशेने सुरु होते. आजचा समाज त्याच मार्गावर आहे की काय याची चिंता वाटते. कारण अस्वस्थता, अतृप्तता, भेद आणि भांडण हा आजच्या प्रत्येक माणसाचा, समाजाचा आणि एकूणच जगाचा स्थायीभाव झाला आहे. कुणीही कुणाला समजून घ्यायला तयार नाही. नौकरीनिमित्त दूर गेलेले मुलगा, सून आणि नातवंडं दिवाळसणालाही गावी आली नाहीत व आम्हालाही तिकडे बोलावले नाही म्हणून दु:खी कष्टी होणारी, त्यांच्या चार दिवसांच्या सुखद सहवासासाठी आसुसलेली अनेक जेष्ठ दांपत्यं मी जवळून पाहिली आहेत. प्राचीन काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. आज ती दुर्मीळ होत चालली आहे. घर म्हणजे शांती, सुख आणि विश्रांती. सर्व जगभर फिरुन या परंतु, ‘आपल्या’ घरात जो आराम मिळतो तो अन्यत्र कुठेही मिळणार नाही. दुर्दैवाने आजकाल अशा भारतीय परंपरेतील घरांची संख्या रोडावत चालली आहे. घरांची, गावांची ओढच कमी होत चालली आहे. भारतीय संस्कृतीत घर-कुटुंबाला अनन्यसाधारण महत्व असते कारण व्यक्ती घर आणि कुटुंबाकडूनच संस्कारीत होते व समाज आणि पर्यायाने राष्ट्राचा जबाबदार घटक बनते. चाळीस पन्नास वर्षापूर्वीच्या, कांही प्रमाणात का होईना, संस्कारीत असलेल्या समाजाची सध्या ही अवस्था आहे तर आज मायमराठीच्या दुधाऐवजी पुतनामावशी इंग्रजीच्या अंगाखांद्यावर वाढविल्या जाणार्या उद्याच्या मराठी समाजाचे चित्र कसे असेल ? ३३ वर्षे पदव्यूत्तर स्तरावर इंग्रजीतून गणिताचे अध्ययन, अध्यापन व संशोधन करणारा मी इंग्रजीच काय जगातील कुठलीच भाषा शिकण्याच्या विरोधात नाही. परंतू त्यासाठी पूर्वप्राथमिक पासून सर्वच विषय इंग्रजीतून शिकण्याची सक्ती आपण आपल्या पाल्यांवर कशी काय करु शकतो ? अंगातून घामाच्या धारा निघत असताना,बाहेर उन्हाची काहिली होत असताना पायात बूट मोजे,गळ्यात घट्ट टाय घातलेला आपला चिमुरडा वर्गात "रेन गो अवे अवे, रेन रेन गो टू स्पेन" असे म्हणत असतो त्यावेळी त्याच्या मनात साहजिकच प्रश्न पडतो की मी असा परिस्थितीच्या विपरित का वागतो आहे ? इथे पावसाची अत्यंत आवश्यकता असताना त्याला मी स्पेनला जायला का सांगतो आहे ? आपण पालक त्याच्या या प्रश्नाचे काय उत्तर देणार ? स्वत:च्या खोटया सामाजिक प्रतिष्ठेसाठी मराठी भाषीक पालकांच्या अशा दांभिक वागण्याला माझा विरोध आहे. शिक्षण म्हणजे जोडणे. वरील विपरित परिस्थितीत शिकणारा आपला पाल्य परिसराशी कसा काय जोडला जाईल ? त्याचे शिकणे आनंददायी कसे होईल ? पन्नासच्या दशकात जन्माला आलेली आमची पिढी. समाजात आढळून येणारे सवसाधारण दूर्गुण त्याकाळीही होते, आजही आहेत, आणि कदाचित उद्याही राहतील. परंतू समाजाचा नैतिक स्तर आजच्यापेक्षा त्याकाळी कितीतरी वरच्या पातळीवर होता. दुसर्याला दोष देण्याऐवजी स्वत: आत्मपरिक्षण करण्याचा मनाचा मोठेपणा होता. त्याकाळच्या आर्थीक विपन्नावस्थेतील मानसाचे इमान खरेदी करणे हे आजच्या संपन्न व्यक्तीचे इमान खरेदी करण्यापेक्षा कितीतरी कठीण होते. समाजातील बहूतांश घटकांना सामाजिक, सामुहिक व वैयक्तिक जबाबदार्यांचे भान होते. सह अस्तित्वातील जगण्यात काय आनंद असतो हे त्यांना माहित होते. म्हणूनच फारशा कुरबुरी न होता सर्व वयोगटातील व्यक्ती एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदत होत्या. वडीलधार्यांविषयी आदर व कनिष्ठांवर प्रेमळ दरारा होता. शिक्षक हाच गावचा देवदूत होता. व्यक्तीचे कुटुंबाशी, समाजाशी, संस्कृतीशी जिव्हाळ्याचे नाते होते. एकमेकांविषयी विश्वास, आपुलकी व दुसर्यांसाठी समर्पणाची भावना होती. गाय, बैल, कुत्रा इत्यादी मुक्या प्राण्यांनाही कुटुंबातील घटकाचा दर्जा होता. एवढेच कशाला, भाकरीच्या फडक्यासारख्या निर्जीव वस्तूंविषयीही अपार ममत्व होते. चाळीस पन्नास वर्षापूर्वीच्या अशा सांस्कृतिक सभ्यता धारण करणार्या समाजाचे आजच्या कॅरी बॅग विकृती समाजापर्यंत अध:पतन कसे झाले ? {१८३५ मधील आमचा उच्च नीतीमत्तासंपन्न भारतीय समाज व त्याला तोडण्यासाठी मेकॉलेने सुचविलेली तोड हे त्याच्या पत्रात मुळातूनच वाचण्यासारखे आहे}. आजचा आधुनिक समाज भोगवादी, चंगळवादी पाश्च्यात्य विकृतींचा गुलाम झाला आहे. मी कुठल्याही संस्कृतीला किंवा आधुनिक युगाला दोष देत नाही. आजच्या आधुनिक युगात ज्ञान आपल्या डोक्यात ठासून भरले आहे. परंतु आपला नैतिक विकास झाला नाही. बाजारवाद व उपभोक्तावाद यानी विविध प्रकारच्या उत्पादनाना समजून उमजून घेण्यास प्रेरित केले जाते. त्यासाठी उत्पादननांच्या वाट्टेल तशा जाहिराती केल्या जातात. अशी उत्पादने आपले भौतिक जीवनच स्मृद्ध करतात. नैतिक व आध्यात्मिक गरजांची पूर्ती त्यामुळे होत नाही. आधुनिक युगाच्या सर्व समस्यांच्या मुळाशी हीच प्रवृत्ती आहे. देशकालपरिस्थितीनुरुप संस्कृती ही समाजाच्या भल्यासाठीच असते. परंतू धोतर सदरा टोपी घालणार्या आमच्या गुरुजीला पंतोजी मास्तर म्हणून हिनवायचे व सुट बुट टाय घालणार्या टीचरला अधिक प्रतिष्ठा द्यायची, या दांभीकतेची मला चीड येते. त्याला मी विकृत्ती म्हणतो. स्वत:च्या बायकोला ‘बायको’ म्हणायची लाज वाटते परंतू ‘मिसेस’ म्हणण्यात प्रतिष्ठा वाटते. घरात सर्वांनी जमिनीवर एकत्र बसून हाताच्या पांची बोटांचा वापर करुन सहभोजन करणे कमीपणाचे, मागासलेपणाचे वाटते परंतू हॉटेलमध्ये टेबल खूर्च्यांवर बसून काटे चमच्याचा वापर करित कुटुंबासह पार्ट्या करणे याला पुरोगामीत्वाचे, सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. पाश्च्यात्य पद्धतीच्या अशा विरुप अंधानुकरणास मी विदेशी विकृत्ती म्हणतो. पाश्च्यात्य संस्कृतीला विकृती म्हणत नाही, तिचा द्वेशही करत नाही किंवा दोषही देत नाही. आज समाजाची अभिरुची हीनतेच्या कळसाकडे झेपावते आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय इत्यादी सर्वच क्षेत्रात नैतिक मूल्यांचा र्हास होत आहे. संपत्तीला अतोनात महत्व आले आहे. ती मिळविण्यासाठी कुठलाही विधीनिषेध बाळगला जात नाही. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून पुन्हा सत्ता या दुष्टचक्रात आजचे राजकारण अडकले आहे. पैसे देऊन मते विकत घेतली जातात. तसेच ती विकलीही जातात. हिंदूस्थान सोडताना चर्चिलने याचे भाकीत केले होते कारण त्यांना ठाऊक होते की १८३५ मध्ये मेकॉलेने फेकलेल्या जाळ्यात अडकलेले भारतीय त्यातून बाहेर येण्याचा कधीच प्रयत्न करणार नाहीत. धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात भ्रष्ट राजकीय प्रवृत्ती धुडगूस घालत आहेत. ज्या माध्यमांनी समाजाला योग्य दिशा देऊन, मार्गदर्शन करुन सामाजिक बांधिलकी व एकोपा जोपासायचा, वाढवायचा असतो तीच आज नैतिक, व्यावसायीक मूल्ये पायदळी तुडऊन केवळ आर्थीक लोभापायी दिशाहीन भरकटत आहेत. बाह्यसौंदर्य प्रसाधनांच्या, वस्त्रप्रावनांच्या उत्तान शृंगारिक जाहिरातींनी उच्छाद मांडला आहे. संपूर्ण जीवनच जाहिरातप्रधान झाले आहे. समाजस्वास्थ्य नासऊन टाकणार्या बातम्या, अग्रलेख, स्तंभलेख, मालिका इत्यादींचा महापूर लोटला आहे. लैंगिक अत्याचारात निष्पाप बालिकांची आयुष्ये बरबाद होत आहेत. समाज संवेदनाहीन मृतप्राय अवस्थेला पोहचला आहे. पुढच्या पिढ्यांसमोर आजची पिढी काय आदर्श ठेवणार आहे ? जरा जगातील इतर देशांकडे पहा. काय दिसते ? जगात जे जे चांगले असेल, माझ्या देशाच्या भल्यासाठी असेल तर त्याचा जरुर स्वीकार करा. प्रगतीच्या सर्वोच्च शिखराकडे झेपावणार्या चीन, जपान सारख्या देशांच्या नागरिकांची आपापल्या संस्कृती, मातृभाषा, मातृभूमीवर अढळ श्रद्धा आहे. या सर्व देशात शिक्षण, संशोधन, राजकारण, समाजकारण, दैनंदिन खाजगी व सरकारी व्यवहार या सार्यांचे माध्यम हे मातृभाषाच आहेत. उदाहरणादाखल जपान. जपान मुळातच प्रखर राष्ट्रप्रेम व कार्यनिष्ठा असणार्या नागरिकांचा स्वाभिमानी देश आहे. त्यामुळेच दुसर्या महायुद्धात बेचिराख झालेला जपान नुसताच उठुन उभा राहिला असे नाही तर अमेरिकेसारख्या महासत्तेला टक्कर देण्यास समर्थ झाला. जपानच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांनी अमेरिकेच्या बाजारपेठा काबीज केल्या. चीन अमेरिकेसारख्या महासत्तांना मागे टाकण्याची दुर्दम्य महत्वाकांक्षा बाळगणार्या जपानच्या यशाचे रहस्य आहे त्याची आपल्या जपानी मातृभाषेवर असलेली अढळ श्रद्धा व अपार प्रेम. म्हणूनच जपानी चॅनलवरच्या कार्यक्रमातील इंग्रजी शब्दांच्या वापरांमुळे मला भावनिक त्रास होतो असे म्हणून ७१ वर्षीय जपानी होजी आजोबा बंड करुन उठतात, खटला दाखल करतात. हा जपानी संस्कृती रक्षणाचा विषय आहे. जपानच्या अस्मितेचा विषय आहे अशी आपली बाजू मांडतात. त्याला समाजाच्या सर्वच स्तरातून उत्स्फूर्त पाठींबा मिळतो. संस्कृतीचे ठेकेदार, सांस्कृतिक घुसखोरी, संस्कृती म्हणजे काय रे भाऊ असे म्हणून त्यांना कोणी नाउमेद करत नाही. भारतीय लोकांत एक फार मोठा दोष आढळतो. जगातील अन्य देशातील लोकांपेक्षा भारतीयांचे राष्ट्रप्रेम अत्यंत क्षीण आहे. भारतीय लोक आपल्याच जातीमध्ये, आपल्याच समाजामध्ये, आपल्याच कुटुंबामध्ये आणि मुख्यत: स्वत:तच गुरफटलेले असतात. भारतीय लोक कुठलेही काम मी माझ्या देशाचे काम करतो आहे या भावनेपेक्षा ते भाडोत्री वृतीने करतात. अशा भाडोत्री कामात स्वाभीमानाची प्रेरणा नसते. म्हणूनच आज संपूर्ण भारतीय बाजारपेठा व लोकांची घरे चायना मेड वस्तूंनी ओसंडून वाहत आहेत. या सार्यांना काही अपवाद असतीलही. त्यांची क्षमा मागून म्हणतो की प्रथम आपल्याला स्वत:मध्ये मोठेपणा निर्माण करावा लागेल आणि मग तो मोठेपणा आपण करीत असलेल्या कामात आणावा लागेल. यालाच राष्ट्रीय चारीत्र्य म्हणतात. असो. कदाचित आम्ही तुमच्यावर सुसंस्कार करण्यात कमी पडलो असू. आम्हाला माफ करा. आमच्या पिढीचे दुर्दैव असे की आम्ही आमच्या मागच्या पिढीकडून चांगल्या वर्तणुकीसाठी थपडा खाल्या आहेत व आता गप्प राहण्यासाठी तुमच्याकडूनही थपडा खात आहोत. आम्ही तुम्हाला अती लाडात वाढविल्याचे हे परिणाम असावेत. आम्ही अनवाणी फिरलो, आमच्या पायात काटे मोडले तसे तुमचे होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यावरील मायेपोटी हे सर्व केले, त्यात आमचे काय चुकले ? तुमच्या सुखासाठी आम्ही वृद्धाश्रमात राहू, तुमच्या अलिशान बंगल्याच्या वळचणीला राहू, परंतू वाट चुकलेल्या लेकरांनो मृगजळाच्या मागे धाऊ नका. परत फिरा. आपल्या पूर्वजांच्या समृद्ध वैभवशाली वारस्याचे जतन करुन तो तुमच्या पुढील पिढीच्या हवाली करा. एवढे कराल ना ?
माहिती संकलन - सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर,
भ्रमणध्वणी: ९७६३६२१८५६
अंतिम सुधारित : 7/23/2020