देवांनाही दुर्लभ असा मानव जन्म मिळाल्यावर जीवनाचे सार्थक कशा प्रकारचे करावयाचे, हे ज्याच्या त्याच्या हाती असते. पण आजकाल शेतकरी असो वा विद्यार्थी, नोकरदार असो वा बिझनेसमॅन, अगदी कुमारवयीन मुले-मुलीही आत्महत्या करू लागले आहेत. हे पाहून मन विषण्ण होते. एक भीती दाटते...काय होईल या पुढच्या पिढ्यांचे...तुमच्या आमच्या लहानग्यांचे..यांच्यावर आहे त्या परिस्थितीत जीवनातील आनंद लुटण्याचे संस्कार कसे होणार…की आयुष्य कळण्याच्या आतच त्यांची जीवनज्योत मालवणार.
खरेतर या जगात असे कधीही घडत नव्हते. पूर्वी कष्टात, ज्ञानसंपादनात, आध्यात्मात, दैनंदिन व्यवहारात जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न होत असे. कुणी संपत्तीच्या शोधात तर कुणी परोपकाराच्या मार्गाने जीवनमार्ग पूर्ण करीत असे. एखाद्याला संतवृत्तीने स्वतःपुरतेच जगत आत्मशोध घ्यायला आवडते तर कोणाला गाडगेबाबा होऊन या जगाला स्वच्छेतेचे धडे देत नवा आदर्श ठेवून जावेसे वाटते. संत-महापुरुषांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आणि क्षण जीवनाचा खरा अर्थ स्पष्ट करणारा आहे.
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे...आपण जगतोय कशासाठी हे त्यांना कळलं होतं आणि ते तसं जगत गेले. आज मात्र मानवजन्माविषयी आणि एकूणच जीवनाविषयी आस्था कमी झालेली जाणवते. सामर्थ्यानिशी जीवनातील प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याचा विचार मागे पडला असून परिस्थितीला शरण जाण्याचा विचार अधिक होऊ लागला आहे. म्हणूनच मरण स्वस्त झालं आहे. मनाची मशागत कुठेच होताना दिसत नाही आणि भरकटलेलं मन शेवटी मृत्यूला कवटाळतंय.
मित्रांनो, जगावं कसं हे ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी...जगावं कशासाठी अन कोणासाठी हे सांगण्याची वेळ जरूर आलेली आहे. आई-बापाच्या कुशीतून, बालपणाच्या मुशीतून सावरत अलवारपणे बाहेरच्या जगात पाऊल ठेवलं की मनाचा गोंधळ सुरू होतो, कोलाहल माजतो. ब्ल्यू व्हेलसारख्या भयानक गेममध्ये स्वतःला अडकवून घेत नुकतंच मिसरूड फुटलेलं कोवळं पोरगं जेव्हा थेट आत्महत्या करतं तेव्हा काय कळालं होतं या मुलाला, कोणतं जग त्याच्या मनात आकार घेत होतं, असं कोणतं भय त्याला सतावत असावं की त्यानं एकदम हा टोकाचा निर्णय घ्यावा?
कान...मन...काळीज...सगळं सगळं कसं सुन्नं सुन्नं झालेलं आहे. कालपर्यंत माझ्याबरोबर माझ्या संगतीने ज्याने लोकांच्या हितासाठी आपले तंत्रकौशल्य वापरून वेगवेगळे ॲप डेव्हलप केले, तो धडाडीचा युवक एकदम असा नर्व्हस का झाला असेल, हा एकच प्रश्न माझ्या मनाला सतावतो आहे...माझ्याशी बोलताना..वावरताना तसं कुठलंही लक्षण त्याच्या वागण्यात काय पण मनात सुध्दा नव्हतं, असं मी ठामपणे सांगू शकतोय..पण....झालं तेदेखील खरं आहे...त्यानं आत्महत्या केलीय.
अर्थात ही काही माझ्या अनुभवास आलेली पहिलीच अशी घटना नाही. इतरही अशा अनेक घटना आहेत, ज्यांनी मला असेच अस्वस्थ केलेले होते...माझ्या आजवरच्या कारकिर्दीत घडलेल्या या प्रसंगांनी मला खूप काही शिकवले आहे. विशेषतः आजच्या तरूण पिढीकडे पाहिल्यानंतर मुळात त्यांची विचारांची बैठकच नसते, हे लक्षात आलेले आहे. पूर्वीचे जग समाजात घुसळलेले व मिसळलेले असे वेगळेच होते. टी.व्ही, दूरचित्रवाहिन्या, चॅनेल्स, मोबाईल, गेम्स, इंटरनेट, वगैरे बाबी तेव्हा नव्हत्या. त्यामुळे साहजिकच जुन्या पिढीकडे वाचन हाच एक पर्याय किंबहुना विरंगुळा होता. त्यामुळे खूप काही चांगलं वाचनात यायचं. त्यातून एका सुदृढ व्यक्तिमत्वाची जडणघडण व्हायची. एक वैचारिक बैठक वा पातळी आकारास यायची. मानसिकतेचे वेगवेगळे पैलू घडत जायचे.
आजकाल तसं काही घडतानाच दिसत नाही. वाचन हा शब्दच आजकालच्या तरूण पिढीच्या लाईफ डिक्शनरीतून कधीच हद्दपार वा नाहीसा झालेला आहे. त्यामुळे काय चांगलं काय वाईट हे त्यांना समजून घेणं जड जातं. माणसं व त्यांचे स्वभाव यांच्याशी जुळवून घेताना मनाचा जी तयारी, जी विचारांची खोली वा बैठक लागते ती नसते. त्यामुळे जीवनात असे काही बिकट वा बाका प्रसंग उभे राहिले की मग तारांबळ उडते. गोष्टी नकोनकोशा होतात, परिस्थितीवर मात करण्याची उमेद देणारे विचारांचे स्फुल्लिंग कमी पडते. अशा वेळेस कोणाजवळ मन मोकळं करावं तर आपलं म्हणावं असं या नव्या धावपळीच्या जगात कोणी उरलेलंच नाही, हे पण लक्षात येतं. मनाचा कोंडमारा वाढत जातो, स्वतःची समजूत घालणं अवघड होतं अन् मग एका क्षणी या सगळ्या जंजाळातून, कोंडीतून सुटका करून घेण्याचा तरूणांना एकच उपाय सापडत असावा....तो म्हणजे आत्महत्या....पण खरोखरच त्या मनाची सुटका होतच नाही मुळी...सुटका होते ती केवळ शरीराची..ज्याचा खरेतर तुमच्या मानसिक स्थितीशी तसे फारच थोडं घेणं-देणं असतं.
खरेतर अभ्यास, व्यासंग, वाचन, मनन, चिंतन व स्वतःची एक विचारधारा विकसित करणारे शिक्षण हे द्यायला हवे. पण तसे कुठेही होताना दिसत नाही, हीच तर खरी शोकांतिका आहे. आज असे शिक्षण देणारे गुरूकूल, गुरूजी, अभ्यासक, मार्गदर्शक उरलेच नाहीत…!!
कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींतच सांगायचे तर ‘पाठीवर हात ठेवू फक्त लढ म्हणा’ अशी उमेद, जिगर देणारे आशीर्वादरूपी हातच उरलेले नाहीत. मग अशा परिस्थितीत त्यांची कविता तर सोबत ठेवून, मनोमनी जागवत जीवनाची वाटचाल करण्याची गरज आहे, हेच खरं...आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधदिनी हे एवढं जरी कोणी वाचलं...मुलांना वाचायला लावलं...त्यांना काही यातून समजलं-उमगलं तरी पुष्कळ...!!!
लेखक: डॉ.रवींद्र सिंगल
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/11/2020