अनमोल खजिना !
माणसांपेक्षाही इतर प्राणी माणसांवर निस्वार्थी प्रेम करतात हे माझे ठाम मत आहे. प्राण्यांच्या डोळ्यांत निरखून पाहिलं, आत्मीयतेने त्यांच्याकडे टक लाऊन पाहिलं म्हणजे त्यांच्या डोळ्यांत त्यांच्या प्रामाणिक अंतरंगाचं प्रतिबिंब दिसतं. माणसांच्या डोळ्यांसारखे त्यांचे डोळे लबाड नसतात. त्यांच्या पाठीवरुन तुम्ही प्रेमाने हात फिरवलात की ते तुमचे कायमचे ऋणी होऊन जातात. माणसाच्या पाठीवरुन फिरणारा दुसर्या माणसाचा हात गळ्यापर्यंत केव्हा पोहोचेल याचा भरोसा नसतो.
आमच्या घरच्या गायीचा एक गोर्हा(मराठवाड्यात खोंड म्हणतात) फारच रुबाबदार होता. मी शाळेतून आलो की पेंडीचा एक खडा त्याला देत असे. काही कारणास्तव आमच्या घरच्यांनी तो गोर्हा गावातच विकून टाकला. काही दिवसांनी त्याच्या नव्या मालकाच्या शेतातील गुर्हाळात मी रस पिण्यासाठी गेलो असता त्याने मला पाहून जो हंबरडा फोडला तो आठवला की आजही माझे डोळे वाहू लागतात. पुढे बर्याच वर्षांनी मी प्राध्यापक म्हणून नगरमध्ये सहकुटुंब स्थायीक झाल्यानंतर एकदा मांजरीचे एक पिल्लू दरवाजातून सरळ आमच्या घरात आले. नवरात्रीचे उपवास असल्यामुळे आम्ही फराळ करित होतो. माझ्या ताटातील भगरीचा एक घास मी त्या पिल्लाला दिला आणि ते आमच्याच घरचे झाले. ती मांजरी होती. सहा सहा महिण्यांनी तिला पिल्लं होत गेली आणि आमचे घर मांजरांनी भरुन गेले. खास त्यांच्यासाठी एक लिटर दुध घ्यावे लागायचे. त्या मांजरीची आणि तिच्या पुढच्या सर्व पिढ्यांची सर्व बाळांतपणं माझ्या बायकोने अत्यंत आत्मीयतेने केली. प्रत्येक मांजराला स्वतंत्र नांव दिलेले असे आणि मी ज्या नावाने हाक मारील त्याच नावाचे मांजर माझ्या मांडीवर येऊन बसत असे. गोट्या, चिंटू, नानू, राणी चला फिरायला म्हणून मी हाक दिली की सर्वजन उड्या मारत माझ्याबरोबर येत असत. दूरवरुन माझ्या स्कुटरचा आवाज येताच ते सारे मला सामोरे येत असत. आमच्यासाठी काय खाऊ आणला असा प्रश्नार्थक भाव मला त्यांच्या निरागस डोळ्यांत जाणवत असे. जवळपास दहा वर्षे मांजराच्या अनेक पिढ्या आमच्या घरात नांदल्या. त्यांनी कधी कुणाला बोचकारले नाही की शेजार्यांच्या घरांत जाऊन दुध पिले नाही. आम्ही आमचे राहाते घर बदलले तरी सारेच्या सारे आमच्या सोबत आले. केवढी ही स्वामीनिष्ठा ? मी कॉलेजात गेलो की गोट्या दिवसभर माझ्या खुर्चीत बसायचा. इतरांना बसू देत नसे. ती खूर्ची मी अजून जपून ठेवली आहे. माझ्या तिन्ही मुलींना मांजरांचा खूप लळा होता. माझी बायको तर त्यांची आईच होती. त्यांनी एकही पिल्लू कधिही कुणालाही नेऊ दिले नाही. कदाचित आमची पुण्याई संपली असावी किंवा आमच्यावरचे अज्ञात कर्ज फिटले असावे म्हणून एक एक करित सर्व मांजरं आमचे घर सोडून निघून गेली. कधी मी उदास झालो की मांजरांच्या छायाचित्रांनी भरलेला भला मोठा अल्बम मी पहात बसतो. हा आमचा अनमोल खजिना आहे.
सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर,
भ्रमणध्वणी: ९७६३६२१८५६
.....................................................................................
अंतिम सुधारित : 7/27/2020