कोकण विभागातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे संबंधित लाभार्थ्यांना फायदा होऊन त्यांचा आर्थिक स्तर पर्यायाने सामाजिक स्तर उंचावण्यास निश्चितच चालना मिळू शकते.
या मंडळाची उद्दिष्टे
• राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास, पणन, संस्करण, कृषी उत्पादनाचा पुरवठा आणि साठवण, लघु उद्योग, इमारत बांधणी, परिवहन या कार्यक्रमाची आणि अन्य व्यवसाय (वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्रीय यासारखे) व्यापार किंवा उद्योग याची योजना आखणे, त्यांना चालना देणे, सहाय्य करणे, सल्ला देणे, मदत करणे, वित्त पुरवठा करणे, त्यांचे संरक्षण करणे.
• इतर मागासवर्गीयांची आर्थिक स्थिती, उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि पणन यांचा विकास करणे/त्यात सुधारणा करणे, त्यांचे कामकाज, व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना भांडवल, पत साधने, साधनसामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
• इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामग्री यांची बनावट, निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटनांबरोबर काम करणे आणि त्यांच्याकडील मागण्या हाती घेणे आणि त्या इतर मागासर्गीय लोकांना उपकंत्राटाने देऊन किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपुर्द करुन, त्यांच्याकडून कामे यथायोग्यरीतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
• राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे, या प्रयोजनासाठली अहवाल आणि लिनप्रती (ब्लू प्रिंट्स) तयार करणे, तयार करुन घेणे आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे.
• कोकणासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.
बीज भांडवल योजना-
तपशिल :- प्रकल्प मर्यादा रु. पाच लाखापर्यंत. लाभार्थींचा सहभाग ५%. महामंडळाच्या कर्जावर ६% व्याज. परतफेडीचा कालावधी पाच वर्षे. महामंडळाचा सहभाग २०%. बँकेचा सहभाग ७५%. ७५% रक्कमेवर बँकेच्या दराने व्याज (साधारणतः : १२ ते १४%)
थेट कर्ज योजना-
तपशिल :- प्रकल्प मर्यादा रु. २५,०००/- व्याजदर २%. परतफेड ३ वर्षे.
राष्ट्रीय महामंडळाची योजना
मुदती कर्ज योजना-
तपशिल :- प्रकल्प मर्यादा रु. तीन लाखापर्यंत. राज्य व महामंडळाचा सहभाग १०%. कर्जावर ६% दराने व्याज. राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ८५%. लाभार्थींचा सहभाग ५%. परतफेडीचा कालावधी ५ वर्षे.
अर्जदार लाभार्थीची अर्हता:
• लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.
• त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे.
• तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
• बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजना यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.1,00,000/- पेक्षा कमी असावे.
• राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.98,000/- पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.1,20,000/- पेक्षा कमी असावे.
• कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
• अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
• कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.
अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल
उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती. जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट साईज छायाचित्र. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, 7/12 चा उतारा. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/ जन्मतारखेख दाखला. दोन जामिनदारांची प्रमाणपत्रे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे. त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतीज्ञापत्र. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने/ लायसन्स. व्यवसाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामग्री इत्यादीचे दरपत्रक.
कोकण विभागामध्ये ठाणे जिल्ह्यात 20 टक्के बीज भाडवल योजनेमध्ये सन 2014-15 मध्ये 6 लाभार्थींना 3.85 लक्ष, सन 2015-16 मध्ये 2 लाभार्थींना 1.20 लक्ष, सन 2016-17 मध्ये 1 लाभार्थींना 60 हजार रक्कम वाटप करण्यात आली. तर रायगड जिल्ह्यामध्ये सन 2014-15 मध्ये 15 लाभार्थींना 7.79 लक्ष, सन 2015-16 मध्ये 09 लाभार्थींना 6.50 लक्ष, सन 2016-17 मध्ये 12 लाभार्थींना 8.13 लक्ष रक्कम वाटप करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन 2014-15 मध्ये 9 लाभार्थींना 5.89 लक्ष, सन 2015-16 मध्ये 05 लाभार्थींना 2.59 लक्ष, सन 2016-17 मध्ये 4 लाभार्थींना 2.39 लक्ष रक्कम वाटप करण्यात आली. पालघर जिल्ह्यामध्ये सन 2015-16 मध्ये 02 लाभार्थींना 7.50 लक्ष, सन 2016-17 मध्ये 1 लाभार्थींना 4.50 लक्ष रक्कम वाटप करण्यात आली.
राष्ट्रीय महामंडळ योजना दीर्घ मुदत योजनेंतर्गत- रायगड जिल्ह्यामध्ये सन 2014-15 मध्ये 3 लाभार्थींना 4.88 लक्ष, सन 2015-16 मध्ये 1 लाभार्थींना 75 हजार रक्कम वाटप करण्यात आली.
थेट कर्ज योजनेमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सन 2015-16 मध्ये 1 लाभार्थींना 25 हजार, सन 2016-17 मध्ये 2 लाभार्थींना 50 हजार रक्कम वाटप करण्यात आली. रायगड जिल्ह्यामध्ये सन 2015-16 मध्ये 16 लाभार्थींना 4 लक्ष, सन 2016-17 मध्ये 17 लाभार्थींना 4.25 लक्ष रक्कम वाटप करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन 2015-16 मध्ये 2 लाभार्थींना 50 हजार, सन 2016-17 मध्ये 23 लाभार्थींना 5.75 लक्ष रक्कम वाटप करण्यात आली. पालघर जिल्ह्यामध्ये सन 2015-16 मध्ये 1 लाभार्थींना 25 हजार, सन 2016-17 मध्ये 55 लाभार्थींना 13.75 लक्ष रक्कम वाटप करण्यात आली.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त संबंधित लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, कोकण विभाग, ठाणे जिल्हा कार्यालय- श्री चिंतामणी को.ऑप.हौ.सोसायटी, ए-5, रुम नं.9 सिद्धार्थनगर, चिंधी मार्केट जवळ, कोपरी, ठाणे (पूर्व) (400603), पालघर जिल्हा- खोली क्र.102, मॉक्स गोकुळ बिल्डिंग, सर्व्हेनं.78, प्लॉट नं.7, पालघर (पूर्व) (401404), रायगड जिल्हा- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोली क्र.3, तळमजला, गोंधळपाडा, तालुका अलिबाग, जिल्हा-रायगड-402201, रत्नागिरी जिल्हा- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, (मधली इमारत), 1, मजला पाटबंधारे स्टॉप, कुंवारबाव, जिल्हा रत्नागिरी-415639 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
लेखक: राजेंद्र मोहिते
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/15/2020